आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: \'ढिश्कियाऊं\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही वर्षांपूर्वी 'लव्ह स्टोरी 2050' नावाचा एक चित्रपट आला होता. हरी बावेजा यांनी तो दिग्दर्शित केला होता, तर पामी बावेजा यांनी त्याची निर्मिती केली होती. हरमन बावेजा नामक आपल्या पुत्राला त्यांनी या चित्रपटाद्वारे चमकवले होते; पण 2050 प्रेक्षकांनीही तो पाहिला नाही आणि मुलाला हीरो करण्याचे त्यांचे स्वप्न फुस्स झाले. त्यानंतर हरमनने अनेक चित्रपट केले; पण तेही फुस्स झाले. त्याचा ताजा 'ढिश्कियाऊं' शुक्रवारी पडद्यावर झळकला. एका निरागस मुलाचा गँगस्टर ते डॉन असा प्रवास यात चित्रित आहे. एक तर अशा कथानकाचे अनेक तगडे चित्रपट यापूर्वी येऊन गेले आहेत. 'दीवार' आणि 'सत्या' ही दोन उदाहरणे पुरेशी आहेत. या दोन्ही चित्रपटांनी अशा कथानकांचा एक बेंचमार्क तयार केला आहे. ताजा 'ढिश्कियाऊं' या बेंचमार्कच्या आसपासही फिरकत नाही. कधी काळी अभिनय करणारी ऊर्फ योगशास्त्रसंपन्न ऊर्फ क्रिकेटसम्राज्ञी शिल्पा शेट्टी-कुंद्रा यांनी 'ढिश्कियाऊं'ची निर्मिती केली आहे. सनमजितसिंग तलवार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात जुना मसाला नव्या शीर्षकासह पडद्यावर आणला आहे. एकूणच हरमनचे फुस्स. यापुढेही चालूच राहणार असून, 'ढिश्कियाऊं' हा फुस्सक्याँव ठरणारा आहे.
कथा -
विकी (हरमन बावेजा) हा आईविना वाढलेला मुलगा. शाळेत असताना त्याला काही मुलांकडून सातत्याने मारहाण होत असते, त्या मुलांचे प्रोजेक्ट, होमवर्क पूर्ण करून द्यावे लागत असतात. तो वडिलांना हे सर्व सांगतो. वडील गांधीजींचे तत्त्वज्ञान त्याला सुनावतात व दुर्लक्ष करतात. विकी त्या मुलांचा बदला घ्यायचे ठरवतो. गोदीतील दादा मोटा टोनीकडे (प्रशांत नारायणन) विकी मदत मागतो. टोनी त्याला गँगस्टर बनवतो. कालिफा हा अंडरवर्ल्डचा डॉन. विकीने कालिफाची जागा घ्यावी हे टोनीचे स्वप्न असते. दरम्यान, मीरा (आयेशा खन्ना) विक्कीच्या जीवनात येते. टोळीयुद्धात रॉकी (आनंद तिवारी) टोनीला ठार करतो. विकी टोनीच्या हत्येची जबाबदारी स्वीकारून तुरुंगात जातो. तेथे त्याला लकवा (सनी देओल) भेटतो. तो विकीला कालिफाची जागा घेण्यासाठी मदत करण्याचे वचन देतो. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर विकी अनेक क्लृप्त्या लढवून कालिफाच्या गँगमध्ये स्थान मिळवतो. तो कालिफाची जागा पटकावतो का, लकवा त्याला कशी मदत करतो, हे पडद्यावर पाहावे.
संवाद- पटकथा -
टोळीपटांसाठी आवश्यक असणारे चटकदार संवाद यात आहेत. पटकथेची मात्र बोंबाबोंब आहे. कोणत्याही व्यक्तिरेखेचा प्रवास पूर्ण होत नाही. चित्रपट अर्ध्यावर आल्यानंतर नायिकेची आठवण दिग्दर्शकाला होते. मग ते पात्र घुसडले. कोणत्याही पात्राचा आगापिछा कळत नाही. नायकाला गँगस्टर बनवण्यासाठी आवश्यक असणारी परिस्थिती पटत नाही. प्रेमकथा रंगवावी की टोळीयुद्धाला महत्त्व द्यावे की सामाजिक प्रश्नाला हात घालावा, याचा दिग्दर्शकाच्या मनातील गोंधळ पडद्यावर स्पष्ट दिसतो आणि 'ढिश्कियाऊं'मधील रंगत जाते.
गीत- संगीत -
चार-पाच गाणी आहेत. पलाश मुच्चल या 18 वर्षांच्या तरुण संगीतकाराने ती सजवली आहेत. तुटे,तुटे., तू ही आशिकी ही गाणी बरी जमली आहेत. मात्र, या गाण्यांच्या चाली जुन्याच आहेत.
अभिनय -
हरमन बावेजाने विकीची प्रमुख व्यक्तिरेखा साकारण्याचा प्रयत्न चांगला केला आहे. मात्र, त्याच्या तोंडावरच्या रेषा हलत नसतील त्याला आपण तरी काय करणार. आयेशा खन्ना हिचा हा पहिलाच चित्रपट. तिच्या वाट्याला तोकडी भूमिका आहे. तिनेही तोकडे कपडे वापरत ही भमिका निभावली आहे. तिचा फारसा प्रभाव जाणवत नाही. सनी देओलने लकवा नामक पात्र रंगवले आहे. यात त्याच्या उजव्या हाताला लकवा झालेला दाखवला आहे, आता सनीचा ढाई किलोचा हातच जायबंदी दाखवल्यावर पुढे काय सांगावे. सनीने अशा चित्रपटात काम तरी का केले? असा प्रश्न पडतो. इतर पात्रांनी कथेला साजेसा अभिनय करण्याचा प्रयत्न केला आहे.
सार -
टोळीयुद्धाच्या विषयावरील सत्या अजून सर्वांच्या मनात ताजा असल्यामुळे 'ढिश्कियाऊं' त्या तुलनेत अत्यंत तोकडा पडतो. एकामागे एक अशी अनेक पात्रे येतात आणि जातात, त्यामुळे गोंधळ उडतो. गुंतागुंत वाढते. कशाचा कशाला पायपोस राहत नाही आणि 'ढिश्कियाऊं' फुस्सक्याँवच्या दिशेने जातो. 'आदमी छोटा हो या बडा कोइ फर्क नही पडता, उसकी कहानी बडी होनी चाहिए', अशी कॅचलाइन असणार्‍या 'ढिश्कियाऊं'ला कथाच नसल्याने सारा आनंदीआनंद आहे. हा 'ढिश्कियाऊं' पाहण्यापेक्षा सध्या सुरू असलेली राजकीय आखाड्यातील 'ढिश्कियाऊं' घरबसल्या टीव्हीवर पाहणे केव्हाही चांगले.