आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Movie Review Of Marathi Film Elizabeth Ekadashi, Directed By Paresh Mokashi

Movie Review: एलिझाबेथ एकादशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'हरिश्चंद्राची फॅक्टरी' चित्रपटातून विविध पुरस्कार मिळवत मराठी चित्रपट सृष्टीचा इतिहास मोकाशी यांनी उत्तमपणे मांडला होता. तशाच कामगिरीची अपेक्षा त्यांच्याकडून याही चित्रपटात होती, ती त्यांनी पूर्ण केली. छोट्या बालकलावंतांनी चित्रपटात मातब्बर कलावंतांच्या तोडीचा अभिनय करत प्रेक्षकांना जिंकले आहे. अर्थात, याचे श्रेय दिग्दर्शकाला जाते. चित्रीकरणात कॅमेऱ्याचा अँगल वेगळेपणाने वापरला आहे. संवाद अफलातून आहेत. संत आणि देवादिकांनी दिलेला संदेश न्यूटनच्या नियमात बसवून दिला गेल्याने मनोरंजनासोबतच निखळ आयुष्य जगण्याचा संदेशही यामध्ये दिला आहे. गाणी आशयघन आणि साधी आहेत, त्यामुळे सहजच क्लिक होतात.
कथा:
पंढरपुरात राहणाऱ्या कुटुंबाची ही गोष्ट आहे. आई, आजी यांच्यासह राहणारा ज्ञानेश आणि झेंडू ही भावा-बहिणीची गोंडस जोडी आहे. वडिलांचे निधन झालेले आहे. आई स्वेटर विणून घर चालवत असते. स्वेटरचे मशीन बँकेकडून कर्ज घेऊन खरेदी केलेले असते, मात्र हप्ते फेडता येत नाही म्हणून बँकेवाले ते जप्त करतात. पाच हजार रुपये भरा आणि मशीन घेऊन जा, हा पर्याय असतो. आता पैसे उभे करायचे कसे? आई बरेच प्रयत्न करून यश येत नाही. कुटुंबाकडे एलिझाबेथ नावाची एक जुनी सायकल आहे. वडिलांनी स्वत: बनवलेली ही सायकल असल्याने कुटुंबाचे सायकलवर खूप प्रेम. पैशांची जुळवाजुळव काही केल्या होईना. तेव्हा एलिझाबेथ विकायचे ठरते. मात्र, मुलांना हे मान्य नाही. मग ते एकादशीला एक दुकान लावतात, तेही आईला चोरून. या एका दिवसात कशा चमत्कारिक घटना घडतात, ते एलिझाबेथला वाचवू शकतात का हे पाहणे हा एक सुरेख अनुभव ठरेल.
अभिनय:
श्रीरंग, सायली आणि पुष्कर या तिघा बालकलावंतांचा अभिनय अफलातून आहे. निरागसपणा, नैसर्गिक अभिनय, उत्तम संवादफेक चित्रपटाला आपलेसे करतात.
संवाद:
मोकाशी यांनी आजच्या काळाला लक्षात घेत पंढरपूरचा लहेजा असलेले संवाद लिहिले आहेत. सहजसोपे संवाद, त्यात पेरलेले उत्तम विनोद प्रेक्षकांची दाद मिळवून जातात. सायकलचे नाव बाबांनी एलिझाबेथ का ठेवले, या झेंडूच्या प्रश्नावर भाऊ ज्ञानेश म्हणतो, इंग्लडची राणी होती म्हणून, तर एलिझाबेथचा अर्थ काय? या प्रश्नावर तो म्हणतो टिकाऊ, झेंडू विचारते टिकाऊ कसे काय, तर ज्ञानेश सांगतो राणी खूप वर्षे टिकली ना. अशा अनेक संवादांवर हशा पिकतो.
सार:
परेश मोकाशी यांचे चित्रपट वास्तव वाटतात. कारण ते मातीशी नाळ जोडणारे आणि हलक्याफुलक्या प्रसंगांत आताच्या परिस्थितीशी सुसंगत वाटतात. चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे, याचा त्यांनी अचूक वापर केला आहे. तिघा बालकलावंतांनी केलेला सहजसुंदर अभिनय प्रेक्षकांना दिलखुलास अनुभव देऊन जातो. एखाद्या यशस्वी चित्रपटातील नायकाच्या तोंडी असलेले संवाद जसे हिट होतात, चर्चेत राहतात तसेच या चित्रपटातील संवाद लक्षात राहणारे आहेत. देव ही एक ऊर्जाशक्ती आहे जी नष्ट होत नाही, फक्त एका रूपातून दुसऱ्यात रूपांतरित होते. न्यूटनचा नियमही हेच सांगतो, ही बाब प्रेक्षकांच्या मनात ठसवण्यात यश आले आहे.