आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गँग्ज ऑफ घोस्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट म्हटले की मनोरंजन आणि संदेश यांची सांगड आलीच. एरव्ही भुतपट म्हटला, की त्यामध्ये मनाला धस्स करणारी दृष्ये, अफलातून कानामागून वाजणारे संगीत, काळजाचा ठोका चुकविणारी चत्मकृती अशा नेहमीच्या गणिताला छेद देत मनोरंजनाचा मसाला असलेला चित्रपट ‘गँग्ज ऑफ घोस्ट’ आज प्रदर्शित झाला. अनुपम खेर, सौरभ शुल्का, शर्मन जोशी या विनोदी भुतांच्या साथीने रंजक झालेला हा चित्रपट प्रेक्षकाला शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवणारा आहे. अतिशय सशक्त संवाद लेखनामुळे चित्रपटातील अनेक संवाद लक्षात राहण्याजोगे आहेत. असराणी यांच्या तोंडी असलेला ‘मैं तो गरीब आदमी हू साब’ प्रेक्षकांना पाठ होऊन जातो.
विनोदपट आणि प्रेमकथा हाताळण्यात हातखंडा असलेले दिग्दर्शक सतिश कौशिक यांचा गँग्ज ऑफ घोस्ट भयपट असल्याचे नाव आणि चित्रपटाच्या पोस्टरमधून जाणवते. मात्र, प्रत्यक्षात भुतांच्या समस्या हासत खेळत मांडणारा हा चित्रपट आहे. विशेष म्हणजे विविध काळांतील, विविध सामाजिक स्तरांतील आणि आर्थिक स्तरांतीलभुत एकोप्याने नांदतात आणि आलेले प्रत्येक संकट किती लकबीने परतवून लावतात ही गंमत पाहण्यासारखी आहे. शर्मन जोशीची भूमिका चित्रपट सातत्याने पूढे घेऊन जाणारी आहे. सतिश कौशिक यांनी अतिशय सुंदर पद्धतीने हा विषय हाताळला आहे. कल्पनावादी कथा असली तरीही मानवी आयुष्याच्या भावनांचा यातून भुतांनी वेध घेतला आहे. 1970 च्या दशकातील मनोरंजनाकुमारीच्या तोंडी असलेला ‘एन्टरटेंमेंट, एन्टरटेंमेंट, एन्टरटेंमेंट’ आणि राजपाल यादवच्या तोंडी असलेला ‘इतनी गोलिया लगी के खाये कहासे निकाले कहा से’ हे संवाद 'द डर्टी पिक्चर्स' आणि 'दबंग' चित्रपटातील लोकप्रिय संवादांची आठवण देणारे आहेत.
कथा - एक जाहिरात दिग्दर्शक आदित्य आणि त्याची सहकारी चित्रीकरणासाठी मुंबईतील एक जुना बंगला पाहण्यासाठी येतात. आदित्य काम करत बंगल्यात थांबतो आणि त्याला झोप लागते. इथूनच चित्रपटाची मुख्य कथा सुरु होते. राजू रायटर त्याच्या शेजारी येऊन बसतो. राजू उत्तम कथा, पटकथा लेखक आहे, पण त्याला कुणी संधीच देत नाही. तो आदित्यला पटवतो आणि कथा ऐकण्यास भाग पाडतो. रॉयल मेंशन या बंगल्यात राहणा-या भुतांची कहाणी सुरु होते. राय बहाद्दूर गेंदामल या मील मालकाचे बंगल्याला आग लागल्याने निधन होते. त्याचे भूत त्याच्याच बंगल्यात म्हणजे रॉयल मेंशनमध्ये राहू लागते, ही घटना 1940च्या आसपास घडते. 1950 ला जवळच असलेल्या इंपिरियल मिलचे गर्व्हनर जनरल रामसे यांचा मृत्यू होतो, त्यांचा बंगला विकला जातो. त्यांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण होतो, म्हणून ते गेंदामलच्या रॉयल मेंशनमध्ये राहू लागतात. चित्रपट अभिनेत्री मनोरंजनाकुमारीही मृत्यूनंतर बंगल्यात राहण्याची विनंती करते. आता हे तिघे भूत राहू लागतात. मात्र, मुंबईतील जागेच्या टंचाईमुळे जुनेवाडे, बंगले विकले जातात आणि त्यामध्ये वास्तव्य करणा-या भुतांचा प्रश्न निर्माण होतो. सर्व भूत गेंदामलकडे येतात, तेव्हा इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आलेल्या भुतांची बंगल्यात राहण्यासाठी निवड केली जाते. अकबर खानसमा, आत्मराम पासवान डायव्हर, भूतनाथ, रॉबिन हुडा, टिना अशी सर्व भुत मंडळी गुण्यागोविंदाने धमाल करत बंगल्यात राहू लागतात. चित्रपट कंपनीवाले बंगल्यात शुटिंगला येतात, तेव्हा भुतमंडळी सर्वांना पळवून लावते. तर भूतेरिया बिल्डर बंगला विकत घेऊन तिथे मॉल बनविण्याची योजना आखतो. तेव्हा भुत युनियन पुन्हा एक जबरदस्त प्लॅन करते आणि त्याला पिटाळून लावते. अशी चित्रपटाची कथा ऐकवून झाल्यावर राजू स्वत:चा मृत्यू कसा झाला, हे गुपित आदित्यला सांगतो. आदित्यला ही कथा आवडते आणि तो चित्रीकरण सुरु करतो, तेव्हा सर्व भुत खुप आनंदी होतात, कारण चित्रपटाच्या माध्यमातून भुतांच्या वास्तव्याची समस्या, त्यांच्या भावभावना सर्वांपर्यंत पोहचणार असतात.
संवाद - सतिश कौशिक आणि राजेश चावला यांनी लिहीलेला प्रत्येक संवाद लक्षणिय आहे. टॅक्सी ड्रायव्हरच्या तोंडी दिलेला ‘मै तो गरीब आदमी हू, साब’ तर जॅकी श्रॉफच्या तोंडी असलेला ‘ना रहेम ना माफी, सिर्फ एक हाथ काफी’ असे संवाद प्रेक्षकांनाही पाठ होतात. तर कथेला पुढे नेणारा प्रत्येक संवाद मनोरंजन करणारा, हास्य फुलविणारा आहे. राजवीर यादवने वठवलेला खानसमा उर्दू शब्दांचा वापर करणारा तर सौरभ शुल्का, भूतनाथच्या तोंडी दिलेले बंगाली संवाद मजा आणतात.
अभिनय - अनुपम खेर, सौरभ शुक्ला, परंब्रता चॅटर्जी, माहि गिल, जे ब्रँन्डोन हिल, राजेश खत्तर, राजपाल यादव, यशपाल शर्मा, माहि गिल, मीरा चोप्रा, विजय शर्मा, चंकी पांडे आणि जॅकी श्रॉफ या सर्वांचा आपल्या भूमिका उत्तमपणे निभावल्या आहेत. सौरभ शुक्ला आणि राजपाल यादव यांच्या विनोदाने चित्रपटात रंगत आणली तर आसराणींच्या एकाच संवादाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले. माहि गील, शर्मन जोशी यांच्या अभिनयाला फारसा वाव नव्हता, तरीही त्यांचा चित्रपटातील वावर प्रेक्षकांना बांधून ठेवणारा आहे.
संगीत - धरम-संदीप यांचे संगीत श्रवणीय आहे. विविध कालखंडांतील भुत चित्रपटात असल्याने 1940 पासूनच्या चित्रपट संगीताचा वापर केल्याने गाणी आपला वेगळेपणा दाखविणारी आहेत. मनोरंजनाकुमारीवर चित्रीत केलेले ‘नही दुंगी नही दुंगी फोकट मे नही दुंगी रे’ आणि ‘सांसो का धडकन से रिश्ता टूट गया’ ही गाणी 40 च्या दशकातील गाणी वाटतात. तर चित्रपटात गुंफलेले एक मेलडी गाणे, साजन, आँखे, धडकन, राजाबाबू, मोहरा, अशा 80/ 90 च्या दशकातील विविध चित्रपटांतील गाजलेल्या गाण्यांची आठवण ताजी करणारे आहे. तर चित्रपटातील आयटम साँगही ठेका धरायला लावणारे आहे.
सार -विविध काळातील माणसे त्यांचे विचार आणि भुत बनल्यावरही एकोप्याने राहण्याची त्यांची भावना यातून दाखविली आहे. मनोरंजनाचे परफेक्ट पॅकेज असलेल्या या चित्रपटातून अतिशय उत्तमपणे मनोरंजन करण्यात आले आहे. आजच्या मानवी समाजाला विनोदी अंगाने विचार करायला लावणारे विषय कौशिक यांनी मांडले आहे, त्याच धाटणीतील हा विषय असला तरीही भुतांच्या समस्या वेगळेपणाने मांडून त्यांनी प्रेक्षकांना मनोरंजनाचा सुखद धक्का दिला आहे. ऐतिहासिक वास्तुंचे रुपांतरण चकचकीत इमारतींमध्ये करण्याचा सपाटा आजच्या समाजाने लावला आहे, यावरही पुर्नविचार करण्याकडे यातून लक्ष वेधले आहे. भुतांच्या भावभावना मांडणारा हा विनोदपट प्रेक्षकांनी पहावा असाच आहे.