आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हंसी तो फंसी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेम. मानवी भावनांचा एक उत्कृष्ट आविष्कार. प्रेमाला उपमा नाही असे म्हणतात. प्रेम म्हणजे हिंदी चित्रपटांचा आत्मा. प्रेमाभोवती गुंफलेले चित्रपट वर्षाकाठी खंडीने येत असतात. त्यातील मोजकेच क्लिक होतात. करण जोहर, अनुराग कश्यप निर्मित व विनिल मॅथ्यू दिग्दर्शित ताजा चित्रपट 'हंसी तो फंसी' हा प्रेमाच्या नाजूक नात्याचे नितांतसुंदर दर्शन घडवतो. आजच्या पिढीला समोर ठेवून गुंफलेली कथा त्याला दिलेली दज्रेदार संवादात्मक विनोदाची झालर निश्चितच करमणूक करणारी आहे. सध्याच्या इझी गोइंग आणि धावपळीच्या जीवनशैलीत पालकांनी, तरुणांनी काय भान राखावे याचे चांगले चित्रण 'हंसी तो फंसी'मध्ये आहे.
कथा : निखिल (सिद्धार्थ मल्होत्रा) हा इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करणारा उद्योजक. एखाद्याला शब्द दिला तर तो पाळावा हे त्याचे तत्त्व. करिश्मा (अदा शर्मा) ही त्याची मैत्रीण. एका कोट्यधीश साडी उद्योजकाची (मनोज जोशी) मुलगी. लग्नापूर्वी पाच कोटी रुपये जमा कर असे ती निखिलला सांगते. लग्न सात दिवसांवर राहिले असताना करिश्माची बहीण मिता (परिणीती चोप्रा) निखिलच्या आयुष्यात येते. केमिकल इंजिनिअरिंगमधून आयआयटी झालेली मिता घरातून पळून गेलेली असते. मोठय़ा बहिणीच्या लग्नात मिता वडिलांकडे प्रोजेक्टसाठी पैसे मागते. काकाला मिताची जीवनशैली पटत नसते. ते नकार देतात. मिताच्या वडिलांचा नाइलाज होतो. शेवटी मिता घरात चोरी करून चीनला प्रयाण करते. तिथे पीएच.डी. करते व स्वत:ची लॅब उघडते. सात वर्षांनंतर ती भारतात परतते. करिश्मा तिला सांभाळण्याची जबाबदारी निखिलकडे सोपवते. सात दिवसांतील सहवासात अनेक घटना घडतात. निखिल आणि मिता यांच्यात प्रेमाचे नाजूक बंध निर्माण होतात. मिताला प्रचंड नैराश्य आलेले असते त्यातून बाहेर येण्यासाठी ती गोळ्या खात असते व वेड्यासारखी वागत असते. निखिल तिला यातून बाहेर कसा काढतो? त्या दोघांचे पुढे काय होते हे पडद्यावर पाहणे अधिक रंजक.
संवाद : पटकथा हर्षवर्धन कुलकर्णी या मराठमोळ्या माणसाने या चित्रपटाची कथा-पटकथा लिहिली आहे. मानवी भावनांवर आधारीत या कथेला अनेक पदर आहेत. सर्व कंगोरे व्यवस्थित मांडण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तिरेखा जिवंत वाटते. पटकथेला दिलेला दर्जेदार विनोदी बाज झकास जमला आहे. पिता-मुलगी, मित्र-मैत्रीण,प्रियकर-प्रेयसी असे नात्यांचे बंध उलगडणारे प्रसंग हंसी तो फंसीची यूएसपी आहे. आशयघन संवाद हशा वसूल करतात. ऋषीकेश मुखर्जींच्या चित्रपटाची आठवण देतात.
गीत : संगीत विशाल -शेखर यांच्या संगीताने नटलेली चार- पाच गाणी चित्रपटांत आहेत. मनचला, जहनशीब गाणी बरी आहेत.
अभिनय : परिणीती चोप्राने मिता ही व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीने उभी केली आहे. तिची घुसमट, नैराश्य, बेताल वागणे, प्रेमात पडल्यानंतरचा बदल परिणीतीने उत्तम मुद्राभिनयाने दर्जेदार वठवला आहे. परिणीतीच्या कारकीर्दीत हा रोल उत्कृष्ट ठरावा. सिद्धार्थने निखिलचे व्यक्तिमत्त्व चांगले सादर केले आहे. त्याचे बेअरिंग उत्तम. बाकी पात्रे ठीक.
सार : धकाधकीच्या जीवनात कुटुंबातील सदस्यांकडे, त्यांच्या भावना, मते जाणून घेण्याइतका वेळ आहे कोणाकडे? मात्र तसे करू नका, एकमेकांची मते जाणून घ्या. भावना समजून घ्या. भावनांच्या बंधामुळेच नाती घट्ट होत असतात. पैसा हे सर्वस्व नव्हे, प्रेमाने सर्व काही जिंकता येते, असा एक चांगला संदेश हसत हसत देणारा 'हंसी तो फंसी' एकदा आवर्जून पाहण्यासारखा आहे. पाहाल तरच हसाल आणि न पाहाल तर फसाल, बाकी तुमची मर्जी.