आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie review: हीरोपंती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या आठवड्यात जॅकी श्रॉफ यांच्या मुलाचा 'हीरोपंती' हा पहिला सिनेमा मोठ्या पडद्यावर झळकला आहे. या सिनेमाची कथा 'परुगू' या तेलगू सिनेमावर आधारित आहे. दाक्षिणात्य स्टाइल हाणामारी असा सारा मसाला भरलेल्या 'हिरोपंती'मध्ये टायगरचं जोरदार प्रमोशन साजिद नाडियादवालाने केले आहे, अगदी वारंवार जॅकीच्या गाजलेल्या 'हीरो'ची धूनही त्याने बॅकग्राउंडला वापरली आहे. मात्र, टायगरचा एकूणच परफॉर्मन्स केविलवाणा झाला आहे. एका टिपिकल बॉलिवूडपटाचा फॉर्म्युला नाडियादवालाने येथे वापरला असला, तरीही जॅकीला ज्याप्रमाणे सुभाष घईंनी प्रमोट केले, ते काम नाडियादवालाने केलेले नाही.
कथा : जातीचे जोखड असलेल्या एका कुटुंबातील रेणू (संदिपा धर) प्रियकर राकेशबरोबर तिच्या लग्नाच्या दिवशीच पळून जाते. चौधरी खानदान असलेल्या या दहशत पसरलेल्या कुटुंबातील सदस्य राकेशच्या मित्रांना ताब्यात घेतात, त्यातीलच एक असतो बबलू (टायगर श्रॉफ). मैत्री आणि प्रेमावर सच्चा विश्वास ठेवणारा बबलू त्याच्या मित्रांना नेहमीच मदत करत असतो. तोही एका मुलीच्या प्रेमात पडतो, ती डिम्पी (कृती शैनोन) पण ती नेमकी या चौधरीचीच (शिरीष शर्मा) मुलगी असते. तिनेही रेणूला पळून जाण्यात मदत केलेली असते. रेणू आणि राकेशला शोधायला चौधरी खानदान जंग-जंग पछाडतात. दुसरीकडे बबलूचे आणि डिम्पीचे प्रेम फुलत असते, तर तिसरीकडे बबलू डिम्पीच्या पित्याची आपल्या मुलीसाठी होणारी अवस्था, घालमेल बघत असतो. अर्थातच शेवटी डिम्पीचे लग्न दुसर्‍याशी ठरते, बबलू लग्नात तिला पळविण्यासाठी पोहोचतो. हे चौधरीला कळतं; पण मुलगी घरातून पळून गेल्यावर वडिलांची समाजात काय अवस्था होते हे बबलूला जाणवते आणि तो डिम्पीला समजावून निघून जाण्याचा निर्णय घेतो. पण, पित्यालाही प्रेमातील ताकद कळते आणि तो डिम्पीला बबलूच्या स्वाधीन करतो, अशी साधी-सरळ, 'अॅक्शन' असलेली या सिनेमाची कथा.
संवाद : साधे, सरळ वाक्य सिनेमात खूप काही सांगून जातात. तरुणांना आकर्षित करणारे अनेक संवाद सिनेमात आहेत. 'हिरोपंती करता है.. क्या करे दुसरा कोई करता नही' किंवा पकडून आणलेल्या एका मित्राला निसटायचे असते आणि तो सारखे 'व्हॉट्स दी पोजिशन' विचारत असतो. तो पडद्यावर येताच रसिकच 'व्हॉट्स दी पोजिशन' म्हणतात. मुलगी लग्नाच्या दिवशी पळून गेल्यावर बापावर काय परिस्थिती ओढावते यासंदर्भातील चौधरीचे संवाद जमून आले आहेत.
अभिनय : टायगर श्रॉफने बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यास घाई केल्याचे जाणवते. टायगरचा हा सिनेमा बघून निराशा हाती येते. त्याची संवादफेक कमजोर आहे. अॅक्शन सीन्स चांगले आहेत. मात्र वारंवार येणारे एकाच धाटणीचे अॅक्शन सीन्स थोड्या वेळाने कंटाळवाणे वाटतात. टायगरपेक्षा कॉन्फिडेटं त्याची हिरोईन कृती शैनोन वाचते. तिने आपली भूमिका चोख बजावली आहे. या दोघांसह एकुण 21 चेहरे या सिनेमात नवीन आहेत. कमकुवत कथेमुळे एका विशिष्ट वेेळेनंतर या कलाकारांसाठी करण्यासारखे काही उरत नाही. प्रकाश राज यांचा व्हिलनच्या रुपातील ओव्हर मेलोड्रामा अंदाजसुद्धा बोअर करणारा आहे.

दिग्दर्शन - सब्बीर खानच्या दिग्दर्शनात दम नाहीये. सिनेमाचे एडिटिंग आणि स्क्रिन प्लेसुद्धा कमजोर आहे.
संगीत :सिनेमाची जमेची बाजू केवळ त्याचे संगीत आहे. साजीद-वाजीदने साजेसे संगीत दिले आहे. 'आ रात भर.. जाए ना घर..' हे अरजित सिंग आणि श्रेया घोषालने गायलेले गाणे विशेष लक्षात राहाते. तर जॅकी श्रॉफला प्रसिद्धी देणारी 'हिरो' सिनेमातील ट्यून यातही मॉडर्न लूकने देण्यात साजीद-वाजीद यशस्वी ठरले आहेत. 'मेरे नाल तू व्हिसल बजा..' असे शब्द देत ती ट्यून मंज आणि निन्दी कौर यांनी पुन्हा एकदा प्रसिद्धीस आणली आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. मोहित चौहानने गायलेले 'रब्बा रब्बा' हे गाणंही ओठांवर रेंगाळते.
वेगळे काही : स्टंट, कॉमेडी, लव्हस्टोरी, फॅमिली ड्रामा, दोस्ती, एंटरटेनमेंटचा मसाला या सिनेमात आहे खरा, मात्र सिनेमा पाहिल्यावरही चावून चोथा झालेली प्रेमकथा प्रेक्षकांच्या वाट्याला आली आहे. या सिनेमातून पुन्हा एकदा जॅकेटची फॅशन आणण्याचा प्रयत्नही झालेला दिसतो.
सार : अनेक प्रेमींच्या आयुष्यात येणारे क्षण यात वेगळ्या पद्धतीने टिपले आहेत. मात्र, प्रेमात आणि मैत्रीत आकंठ बुडालेले हे प्रियकर-प्रेयसी जे पाऊल उचलतात त्यामुळे आई-वडील आणि घरातील इतरांवर काय परिस्थिती ओढावते, असा संदेश हा सिनेमा देतो. हीरोपंतीची कथा यापूर्वीही प्रेक्षकांनी रुपेरी पडद्यावर बघितली आहे. त्यामुळे कथा प्रभावी नाहीये. अभिनयसुद्धा विशेष नाहीये. एकंदरीतच हा सिनेमा बघण्याची रिस्क न घेतलेलीच बरी.