आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायवे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समाजात सर्व काही आलबेल चालावे यासाठी सामाजिक नियंत्रण नामक व्यवस्था असते. भारतीय समाजात या व्यवस्थेचे बंध अधिक घट्ट असल्याचे मानले जाते. मात्र, हीच चौकट एखाद्याच्या आयुष्याचे मातेरे करते. ती व्यक्ती स्त्री असेल तर त्याचे परिणाम जास्त गंभीर असतात. ‘जब वुई मेट’, ‘सोचा ना था’ आणि ‘रॉकस्टार’सारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट देणार्‍या दिग्दर्शक इम्तियाज अलीचा ‘नवा हायवे’ या सामाजिक चौकटीचा बुरखा टराटरा फाडतो. अल्पवयात जवळच्या व्यक्तीकडून झालेले मुलीचे शोषण हा ‘हायवे’चा विषय आहे. अत्यंत संवेदनशील विषयाला अलीने प्रगल्भरीत्या रुपेरी पडद्यावर मांडले आहे. ‘हायवे’ हा समाजातील एका समस्येचा एक्स-रे आहे. आयटम साँग, मारामारी, झाडामागे धावत गाणी गाणारे नायक-नायिका, त्यांच्या प्रेमात बिबा घालणारा खलनायक, मग नायकाचा फिल्मी त्याग व गोड शेवट या हिंदीत रुजलेल्या समीकरणाची चौकट मोडणारा ‘हायवे’ हा चाकोरीबाहेरचा चित्रपट आहे. अलिया भट्ट या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने त्यात जे रंग भरले आहेत ते निव्वळ अप्रतिम. सुखाच्या शोधात निघालेली ‘वीरा’ तिने लीलया वठवली आहे. छायाचित्रकार अनिल मेहता यांनी त्यांच्या कॅमेर्‍यातून टिपलेला महामार्ग आणि त्याभोवतीचा निसर्ग ‘हायवे’ला चार चांद लावतो.
कथा : ही कथा आहे वीरा (अलिया भट्ट) या मुलीची. एम. पी. त्रिपाठी हे दिल्लीतले बडे प्रस्थ. वीरा त्यांची मुलगी. तिचे लग्न ठरले आहे. लग्नाची तयारी सुरू असताना, आपल्या नियोजित वराबरोबर हायवेवर फिरत असताना वीराचे अपहरण होते. महावीर भाटी (रणदीप हुडा) व त्याचे साथीदार हे पैशासाठी अपहरण करणारे कंत्राटी गुंड आहेत. वीराचे अपहरण होते आणि मग सुरू होतो हायवेवरचा प्रवास. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी वीराला सातत्याने फिरवत राहणे, ठिकाणे बदलणे महावीरसाठी अपरिहार्य असते. याच प्रवासात वीरावर लहानपणी तिच्या कुटुंबाच्या जवळचे मित्र असणार्‍यांकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती महावीरला होते. मग त्या दोघांत भावनिक नाते निर्माण होते. पुढे काय होते ते पडद्यावर पाहणे जास्त रंजक.
संवाद - पटकथा : एकाच सूत्रात बांधलेली पटकथा असल्याने हायवेवरील हा प्रवास रंजक ठरतो. मोजकीच पात्रे आणि त्याभोवती फिरणारे कथानक यामुळे एकजिनसीपणा जाणवतो. इम्तियाज अलीनेच कथा लिहिली असल्यामुळे नेमके काय दाखवायचे आहे याचे गणित त्याच्या डोक्यात पक्के असल्याने प्रेक्षकांचा हिरमोड होत नाही. संवाद कथेला साजेसे आहेत.
गीत- संगीत : गाणी फारशी नाहीत. जी आहेत ती ए. आर. रेहमानने चांगली सजवली आहेत.
अभिनय : ‘हायवे’ हा खरे तर अलिया भट्टचा चित्रपट आहे. वीराची भूमिका तिने समरसून वठवली आहे. अलियाचा निरागस, निष्पाप चेहरा सहानुभूती मिळवतो. लैंगिक अत्याचारामुळे झालेली घुसमट, अपहरण, हायवेवरचा अनुभव, त्यामुळे मोकळे झालेले साचलेपण आणि गुंडाशी जुळणारे भावनिक बंध हे सर्व पैलू अलियाने उत्तमरीत्या सादर केले आहेत. तशीच साथ रणदीप हुडाने तिला दिली आहे. रणदीपचा चेहरा महावीरच्या भूमिकेला सूट झाला आहे. कंत्राटी गुंड, गुंडरूपी जनावर ते मानव असा प्रवास त्याने मुद्राभिनयातून, देहबोलीतून चांगला साकारला आहे. बाकी पात्रांना जास्त वाव नाही.
सार : मुलींवर होणार्‍या लैंगिक अत्याचारासारखा विषय घेऊन चित्रपट बनवायला मोठे धाडस लागते. ते अली आणि साजिद नाडियादवाला यांनी दाखवले आहे. मानवी भावभावनांबरोबरच उत्तराखंड, राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली, पंजाब-हरियाणा या राज्यांतील अप्रतिम लोकेशनचे नेत्रसुखद दर्शन ‘हायवे’तून घडते. अनिल मेहतांच्या कॅमेर्‍याने टिपलेली सर्व निसर्गदृश्ये प्रसन्न करणारी आहेत. रूढ समीकरणाची चौकट मोडणारा आणि गंभीर विषयाची प्रगल्भ मांडणी असणारा हा क्लासिक चित्रपट आहे. पिटातल्या प्रेक्षकवर्गाला ‘हायवे’ फारसा भावणारा नसला तरी क्लासिक पाहण्याची आवड असणार्‍यांनी हायवेवरचा हा प्रवास चुकवू नये.