देखणा आदिनाथ कोठारे, रेखीव फीचर्सची देणगी मिळालेली सुलग्ना पाणिग्रही यांची जोडी हाही इश्कवालाचा प्लस पॉइंट आहे. सुंदर अनुभव देणारी विनोद प्रधान यांची सिनेमॅटोग्राफी तसेच गायक स्वप्निल बांदोडकर, मंगेश बोरगावकर, गीतकार गुरू ठाकूर यांना अभिनय करताना पाहणे प्रेक्षकांना आवडेल.
कथा:
आधुनिक विचारांच्या कुटुंबातील ओवी (सुलग्ना) ही इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. चार मित्रांच्या ग्रुपमध्ये रमलेला, वकिली व्यवसाय करणारा अजिंक्य (आदिनाथ) गिटारही वाजवतो. वडील, आजीसोबत तो राहतो. मनोरंजनाचे शो करत असताना त्यांच्या ग्रुपला एका नव्या, सुंदर चेहऱ्याची गरज असते. सिनेमॅटिक लिबर्टीप्रमाणे ओवी अजिंक्यची रस्त्यावर भेट होते. मग अर्थात ते प्रेमात पडतात; पण ओवीला लिव्ह इन आवडते. लग्न म्हणजे प्रेमाचा शेवट असे तिचे मत असते. यामुळे दोघांमध्ये अंतर निर्माण होते. पुढे ते कमी होते का, ते लग्न करतात की लिव्ह इनमध्ये राहतात, हे चित्रपटात पाहण्यासारखे आहे.
अभिनय:
आदिनाथ आणि सुलग्नाने भूमिकेचे सर्व बारकावे साकारले आहेत. लग्नच करायचे असे म्हणणारा आदिनाथ पाहिल्यावर होणारी घालमेल सुलग्नाने संयमितपणे दाखवली आहे. भार्गवी चिरमुलेची व्यक्तिरेखाही लक्षात राहते.
संगीत:
अविनाश-विश्वजित,एस. जे.सूर्या आणि सागर-मधुर यांचे संगीत कर्णमधुर. हिंदी चित्रपटांना साजेशी गाणी सुखद वाटतात. चित्रपट संपल्यावर लुंगी डान्स गाण्याचा अनुभव ताजा होतो.
संवाद:
कथा,पटकथा आणि संवाद रेणूनेच लिहिले असल्याने ‘इश्कवाला लव्ह’चे सादरीकरण निखळ आनंद देत, विचार करण्यासही भाग पाडते.
सार:
दमदार कथा, पटकथा आणि उत्तम संवाद यासोबतच कॅमेऱ्याचा उत्तम अँगल या चित्रपटातील तांत्रिकदृष्ट्या जमेच्या बाजू आहेत, तर प्रेमात आकंठ बुडालेल्या दोघांनाही वेगवेगळ्या विचारधारांवर एकमेकांविरुद्ध उभे करण्याचा प्रयोग चपखल जुळून आला. आजच्या तरुणाईला अपील करेल, असा लिव्ह इन की लग्न, हा संघर्ष यामध्ये आहे. प्रत्येकाने पाहावा असा हा चित्रपट आहे. प्रेमाचा विषय वेगळेपणाने आणि अतिशय ताकदीने यामध्ये मांडला आहे.