आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरकटलेला जुगारपट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कतरिना कैफला रुपेरी पडद्यावर आणणारा दिग्दर्शक म्हणून कैजाद गुस्ताद याची ओळख आहे. बूममधून त्याने ही तारका आणली. अमिताभसारखे खणखणीत नाणे बूममध्ये असतानाही तो फुस्स झाला. जॅकपॉटच्या बाबतीत ही हाच प्रकार होणार आहे. एकतर टीव्ही सिरीयल बनवायची होती की चित्रपट हा गोंधळ गुस्तादच्या मनात राहिला असावा किंवा आपल्याला खूपच काही कळतंय असा त्याचा गोड गैरसमज झाला असावा, नसता त्याने असा फुसका जॅकपॉट खेळला नसता. नसिरुद्दीन शहासारखा मातब्बर कलावंत सोबत असताना आणि सनी लिऑन नामक मदनिका जवळ असतानाही हा जॅकपॉट प्रेक्षकांना भावत नाही. कॅसिनोत जाणारे पट्टीचे खेळाडू ज्याला पंटर म्हणतात, ते चतुराईने आपली चाल खेळत असतात. गुस्तादला हे पंटर होणेच तर सोडा साधा ‘बदाम सात’चा खेळही पडद्यावर रंगवता आलेला नाही.
कथा : जी काय गोष्ट घडते (कथा नव्हे) ती गोव्यात (कॅसिनो म्हटले की गोवा आलाच.) बॉस (नसिरुद्दीन शहा) हा कॅसिनोचा मालक. तेथे माया (सनी लिओन) आणि फ्रान्सिस (सचिन जोशी) हे जुगार खेळायला येत असतात. (ते कोठून येतात, कसे येतात, का येतात असे प्रश्न विचारायचे नाहीत) ते मोठे पंटर असतात. आपल्या साथीदारांसह ते बॉसला गंडवण्याचा जुगार हाती घेतात. गोव्यात (नेमके कोठे हे गुस्ताद यांना कळाल्यानंतर तुम्हाला नक्की सांगतो) डिस्ने वर्ल्ड उभे करण्यासाठी 250 एकर जागा असल्याचे भासवून ते बॉसला 10 कोटींचा सौदा करण्याच्या जाळ्यात ओढतात. (बॉसला हे काहीच कळत नाही, असा कसा बॉस? हे गुस्तादच सांगू शकतील) मग फ्रान्सिस सारी बनावट पात्रे बॉसच्या भोवती उभी करतो. बॉस आपल्या कॅसिनोतर्फे 5 कोटींचा जॅकपॉट जाहीर करतो. माया आणि फ्रान्सिसचा खेळाडू जॅकपॉट जिंकतो. मात्र ती बॅग बक्षीस समारंभातच बॉसच्या समोरून फ्रान्सिस पळवतो. हेही अर्थात बॉसला काहीच कळत नाही (निर्बुद्ध कुठला). मग त्याभोवती गोष्ट फिरते आणि अपेक्षित शेवटाला येते. (आणि आपली मानसिक छळातून सुटका होते)
संवाद-पटकथा : मुळात चित्रपटाला कथाच नाही. त्यामुळे पटकथेचा प्रश्नच येत नाही. संवादाचे म्हणाल तर तद्दन बी ग्रेड चित्रपटात असतात तसे संवाद आहेत. मुळात व्यक्तीरेखाच संकुचित असल्याने आचार-विचारांचा कसलाच संबंध गुस्ताद यांनी ठेवलेला नाही. (गुस्ताखी माफ हो). निव्वळ भंकसगिरी करणारी पात्रे पडद्यावर धुमाकूळ घालतात. तुकड्या-तुकड्यात चित्रपट कधी फ्लॅशबॅक तर कधी वर्तमानात चालतो. प्रेक्षकांना काही मेंदूचा भाग असतो याचे भान पटकथाकारांना नसल्याचे जाणवते. (कथा-पटकथा गुस्ताद महाशयांचीच आहे.) कथा नाही तर नाही निदान गोवा दर्शन घडवले असते तरी चालले असते (मात्र येथेही गुस्तादजींचे घोडे पेंड खाते)
गीत-संगीत : गाणी फारशी नाही. मात्र, ‘कभी जो बादल बरसे’ हे गाणे चांगले आहे, ही त्यातल्या त्यात जमेची बाब. बाकी सगळी बोंबाबोबच आहे.
अभिनय : सनी लिओन नामक मदनिका अभिनय सोडून बाकी सर्व काम चोख बजावते. सनीबाईच्या चेहर्‍यावरची रेष हालेल तर शपथ!. सचिन जोशी निर्माते, उद्योजक, अभिनेते आणि बर्‍यात क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कोणत्याही एकाच क्षेत्रात काम करावे (अभिनय क्षेत्र वगळल्यास धन्यवाद). नसिरुद्दीन शहा सारख्या कलावंताने अशा चित्रपटात का काम करावे? असा प्रश्न चित्रपट पाहताना सतत मेंदू कुरतडतो. त्याचा तो ओंगळ गेट अप, त्याचे ते पडद्यावरचे वावरणे म्हणजे नुसती वैतागवाडी! मकरंद देशपांडे हा आणखी एक हुकुमी एक्का गुस्तादजींनी वाया घालवला आहे. तुमच्यात अभिनय क्षमता आहे, मात्र व्यक्तिरेखाच तोकडी असेल तर काय होते याचे जॅकपॉट हे उत्तम उदाहरण.
सार : कशाचा कशाला नाही मेळ अन् डोक्याचा पोरखेळ करून घ्यायचा असेल तर गुस्तादजींच्या जॅकपॉटची वारी करा. सनी लिओन नावाच्या आर्कषणाला भुलून जाल तर पस्तवाल. चित्रपट बनवायचा की डॉक्युमेंटरी की टीव्ही सिरीयल याबाबत गुस्तादजींच्या मनात प्रचंड गोंधळ उडाला आहे.(त्यामुळे आपल्याही डोक्याला ताप) त्यातूनच जॅकपॉट नावाचा टुकारपट पडद्यावर अवतरला आहे. जॅकपॉट अवघ्या 92 मिनिटांचा आहे. चित्रपट चटकन संपतो ही जॅकपॉटची सर्वात चांगली बाब, यातच सारे काही आले.