आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'जय हो\' म्हणजे 100% मनोरंजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंजन, मंजन आणि रंजन हे कोणत्याही माध्यमाचे उद्देश आहेत. चित्रपट हे दृकश्राव्य माध्यम भारतीय जनमानसात चांगलेच रुळलेले आहे. त्याचा चांगला वापर आतापर्यंत अनेक दिग्दर्शकांनी केला आहे. सोहेल खान दिग्दर्शित बहुचर्चित ‘जय हो’ हा चित्रपट याच सदरात मोडणारा आहे. एखाद्या हिंदी चित्रपटात आवश्यक असतो तो सर्व मसाला ‘जय हो’मध्ये ठासून भरलेला आहे. जय होमध्ये प्रेम आहे, विनोद आहे, मारामारी तर प्रेक्षणीय आहे. मात्र, त्यातून देशाच्या भल्यासाठी देण्यात आलेला एकमेकां साह्य करूचा नारा जय होला एका वेगळ्या उंचीवर नेणारा आहे. सलमान आणि सोहेल या बंधूंनी अत्यंत विचारपूर्वक या चित्रपटाची मांडणी केल्याचे जाणवते. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर तो पडद्यावर झळकावण्यातही या दोघांनी हुशारी दाखवली आहे.
कथा : मेजर जय अग्निहोत्री (सलमान खान) हा लष्करातील देशभक्त जवान. काही अतिरेक्यांनी मुलांचे अपहरण केल्यानंतर जय जिवाची बाजी लावून व वरिष्ठांचे आदेश झुगारून या मुलांची अतिरेक्यांच्या तावडीतून सुटका करतो. या घटनेत काही लष्करी जवान मृत्युमुखी पडतात. त्याचा ठपका ठेवून जयला लष्करातून निलंबित केले जाते. मात्र, जय निराश होत नाही. समाजातील भ्रष्टाचार आणि अत्याचाराविरुद्ध लढायचे तो ठरवतो. या कामी त्याला त्याची बहीण रिया (तब्बू), तिचे पती रेहान (महेश ठाकूर) व जयचे मित्र साथ देतात. जय नडलेल्यांना वेळोवेळी मदत करत असतो आणि प्रत्येकाने केवळ धन्यवाद देण्यापेक्षा तिघांना मदत करण्याचे आवाहन करत असतो. त्याची ही चळवळ सर्वांनाच भावते. त्याउलट गृहमंत्री दशरथसिंह पाटील (डॅनी) व त्याचे कुटुंबीय मात्र सत्तेचा माज दाखवत समाजावर अन्याय करत असतात. जय आणि गृहमंत्री आमने-सामने येतात. मुख्यमंत्री प्रधान (मोहनीश बहल) त्या दोघांत समेट घडवून आणण्याच्या प्रयत्नात असताना गृहमंत्री मुख्यमंत्र्यांवर प्राणघातक हल्ला करून जयवर आळ आणतो व जयला अतिरेकी घोषित करतो. मात्र, जय मुख्यमंत्र्यांचे प्राण वाचवतो व गृहमंत्र्याचे काळे साम्राज्य धुळीस मिळवतो.
पटकथा - संवाद : हा चित्रपट स्टॅलिन या तामिळ चित्रपटावरून बनवलेला आहे. दिलीप शुक्ला यांनी पटकथा चांगली बांधली आहे. तिघांना मदत करण्याची कन्सेप्ट व त्यानुसार घडणारे प्रसंग यांची मांडणी उत्तम जमली आहे. संवादही प्रभावी आहेत. ‘आम आदमी सोता हुआ शेर है, उंगली मत करो, जाग जाए तो खैर नही’सारखे संवाद प्रदर्शनापूर्वीच लोकप्रिय झाले आहेत.
गीत - संगीत : पटकथा सशक्त असल्याने गाण्यांना फारसा वाव नसतानाही पाच-सात गाणी चित्रपटात आहेत. ‘तेरे नैना मार ही डालेंगे’ आणि ‘लव्ह यू’ ही गाणी चांगली जमली आहेत. संदीप शिरोडकर यांनी दिलेले पार्श्वसंगीत कथेला साजेसे आहे.
अभिनय : सलमान नेहमीप्रमाणे जोशात वावरला आहे. बर्‍याच कालवधीनंतर घडणारे तब्बूचे दर्शन, डॅनीचा दमदार अभिनय मजा आणतात. महेश मांजरेकर, मुकुल देव, सुनील शेट्टी, खोपडी फेम समीर खक्कर, नादिरा बब्बर, सना खान यांनी आपापली कामे उत्तम वठवली आहेत. डेझी शहाच्या वाट्याला आलेले चार-दोन प्रसंग तिने चांगले साकारले आहेत. मात्र, तिला फारसा वाव नाही.
सार : मळलेल्या वाटेवरुन जाणा-या त्याच त्या प्रेमकथा आणि बाष्फळ मारधाडपटांच्या तुलनेत जय हो उजवा आहे. समाजात घडणा-या गोष्टी कॅमेरा कसा टिपू शकतो याचे चांगले चित्रण यात आहे. करमणुकीबरोबरच एक छोटी शिकवण देणारा जय हो कुटुंबीयांसह पाहण्यासारखा आहे.