आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कर ले प्यार कर ले' बाष्कळ प्रेमपट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही वर्षांपूर्वी प्रेमाला रंजक नाट्याची जोड देणारे चित्रपट काढण्याची एक टूम बॉलिवूडमध्ये आली होती. सुनील दर्शन हा निर्माता- दिग्दर्शक त्यात आघाडीवर होता. जानवर, बरसात, एक रिश्ता, अंदाज असे अनेक चित्रपट त्याने त्या वेळी दिले. त्यातील काही लक्षात राहिले, तर काही डब्यात गेले. सुनील दर्शन याने आपल्या मुलाचे दर्शन प्रेक्षकांना घडवण्यासाठी याच टूमचा वापर ताज्या 'कर ले प्यार कर ले' या चित्रपटात केला आहे. शिव दर्शनने या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर एंट्री केली आहे. सहा फुटांची ताडमाड उंची आणि अश्वमुखी चेहरा असणार्‍या आपल्या मुलाला हीरो करण्यासाठी निर्माता पिता सुनील दर्शनने तीन लेखक आणि पाच-सहा संगीतकारांची फौज उभी केली असली तरी 'कर ले प्यार कर ले'ची भरकटणारी पटकथा आणि कशाला कशाचा पायपोस नसणारे प्रेम पाहता शिवचे दर्शन चित्रपटगृहातील बहुतांश रिकाम्या खुर्च्यांना घडणार असे दिसते.
कथा : कबीर (शिव दर्शन) आणि प्रीत (हसलीन कौर-आणखी एक नवा चेहरा) यांच्यात लहानपणापासूनचे प्रेम असते. ते सतत कोणता तरी गेम खेळत असतात. प्रीतचे सावत्र वडील तिच्या आईचा अतोनात छळ करत असतात. कबीरला ते पाहवत नाही. तो त्यांना जखमी करतो. त्यानंतर दोन्ही कुटुंबांत वाद होतो. कबीरचे आई-वडील कबीरसह ते शहर सोडून जातात. वीस वर्षांनंतर कबीर आणि प्रीतची नव्या शहरात भेट होते. मात्र, प्रीत कबीरला ओळखत नाही.(वा रे.प्रेम). प्रीतला आता एक नवा जॉज नावाचा बॉयफ्रेंडही असतो. जॉजचे वडील डीजी त्या शहराचे डॉन असतात. कबीर प्रीतचे प्रेम मिळवण्यासाठी वाटेल ते करण्यास तयार असतो. त्यातच जॉजचा संशयास्पद अपघाती मृत्यू होतो. डीजी हात धुऊन कबीरच्या मागे लागतो. जॉजचा खून कोणी केलेला असतो? प्रीत आणि जॉज यांच्यातील प्रेमाचे रहस्य काय? कबीर आणि प्रीतचे मनोमिलन होते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे म्हणजे कर ले प्यार कर ले.
पटकथा-संवाद : राजेश पांडे, रेशू नाथ आणि राहुल पटेल या तिघांनी याची पटकथा लिहिली आहे. ‘तीन तिघाडे काम बिघाडे’ अशी म्हण आहे. म्हणी त्रिकालाबाधित सत्य असतात, याचा प्रत्यय कर ले प्यार कर लेच्या पटकथेवरून येतो. कथेचा मुख्य गाभा प्रेम असताना यात प्रेम सोडून नायक-नायिका व त्यांचे सहकारी भलतेच चाळे आणि गेम खेळतात. बरे लहानपणापासूनचे प्रेम म्हणावे तर नायिका वीस वर्षांनंतर नायकाला ओळखतही नाही. असे अनेक प्रश्न चित्रपटभर आपल्याला पडतात. त्याची बाळबोध आणि आजवर चोथा झालेली उत्तरेही पाहायला मिळतात. एकही व्यक्तिरेखा सशक्त नाही. सातत्याने गेम ऑन होत असल्याने प्रेक्षक वैतागतो.
संगीत : कथेची बोंबाबाब आणि तुटक व्यक्तिरेखा असल्या तरी ही प्रेमकहाणी श्रवणीय करण्यासाठी पाच ते सहा संगीतकारांची फौज आहे. त्यांनी बर्‍यापैकी काम केल्याने थोडासा दिलासा मिळतो. रायन अमीन, रशीद खान, प्रशांत सिंह आणि मीट ब्रदर्स अन्जान हे ते संगीतकार. दिल मेरा दिल्ली, तू सरकार है, आयी जो तेरी याद, तेरी साँसो में, कर ले प्यार कर ले, तनहाई, मुतासिर अशी गाणी यात आहेत. यापैकी तेरी साँसो में आणि आयी जो तेरी याद ही गाणी आधीच बर्‍यापैकी लोकप्रिय झाली आहेत.
अभिनय : शिव दर्शनचा चेहरा ग्लॅमरस नाही. निव्वळ उंची व शरीरयष्टीच्या जोरावर हीरो होता येत नाही, त्यासाठी अभिनयही लागतो हे शिवला कळेलच. हसलीन कौरला मोठा वाव आहे. मात्र, तिने अभिनयापेक्षा तोकडे कपडे घालण्याकडे जास्त लक्ष दिले आहे. या फेमिना 2011 च्या मिस इंडियाने चोखंदळपणे भूमिका निवडल्यास तिला स्कोप आहे. बाकी पात्रे ठीक.
सार - चांगली प्रेमकहाणी पाहण्याच्या अपेक्षेने गेलात तर तुमचा गेम होईल. मात्र लहान मुले आणि कुटुंबियांसह जाऊ नका. थायलंड, लवासा, दुबईतील नेत्रसुखद चित्रण आणि बाईक व इतर वाहनांचे स्टंट पाहण्याची आवड असेल तर दर्शन मंडळीचे दर्शन घेण्यापासून तुम्हाला अडवणारा मी कोण ?