आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'खैरलांजीच्या माथ्यावर\' सत्यकथेतून सामाजिक विषमतेचे दर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी दलित हत्याकांडाने 2006-07 मध्ये देशातील समाजमन हळहळले. राजू मेर्शाम दिग्दर्शित 'खैरलांजीच्या माथ्यावर' या चित्रपटात या हत्याकांडाची सत्यकथा रुपेरी पडद्यावर झळकल्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन गहिवरले. जातीय द्वेषातून संपूर्ण कुटुंबांचे शिरकाण होत असल्याचा प्रसंग पाहताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. करमणूकच नव्हे, तर भीषण आणि बीभत्स सामजिक विषतमतेची दाहकता चित्रपटाने स्पष्ट केली.
मोहाडी तालुक्यातील 350 उंबर्‍यांच्या खैरलांजी गावात 29 सप्टेंबर 2006 रोजी घडलेल्या घटनेने सामाजिक विषमता नष्ट झालीच नसल्याचे सत्य समोर आले. या कथेला सिनेमात चित्रबद्ध करून मेर्शाम यांनी सवर्ण आणि दलित प्रेक्षकांना समानता आणि दारूबंदीचा संदेश दिला. के. एस. क्रिएशनच्या ज्योती रेड्डी निर्मित 'खैरलांजीच्या माथ्यावर' सिनेमात किशोरी शहाणेने पुन्हा एकदा मोठय़ा पडद्यावर एंट्री केली. शिवाय अनंत जोग, मिलिंद शिंदे यांच्या खलनायकीने सिनेमा हळुवार पुढे सरकतो. वास्तविकतेशी काहीच संबंध नसल्याचे सिनेमाच्या प्रारंभी सांगितले नाही.
पीडित बाबुलाल परसमांगेच्या (भय्यालाल भोतमांगे) कुटुंबीयांतील सदस्यांची (पात्रांची) नावे बदलली. वर्णश्रेष्ठवादी समाजरचनेत सुजाता परसमांगे (सुरेखा) या दलित महिलेने गावातील पाटलांना दिलेली एकाकी झुंज कथानकाचा मुख्य गाभा आहे.
नवरा बाबुलालच्या दारूतून सुटकेसाठी दारूबंदीचा पुकारलेला लढा ही सिनेमाची मध्यवर्ती भूमिका आहे. सूड उगवण्यासाठी गावगाडा चालवणारेच जेव्हा गावगुंड होऊन अंगावर धावून येऊ लागले अन् त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाईचा आग्रह धरणार्‍या नायिकेने प्रेक्षकांची करमणूक नव्हे तर त्यांच्यात प्रेरणेची बीजे रोवली. वैशाली (प्रियांका) या सतरावर्षीय मुलीने निरक्षर गावकर्‍यांच्या नाकावर टिच्चून शिक्षण घेण्याची दाखवलेली जिद्दही सिनेमात क्षणाक्षणाला टाळ्या मिळवते. वहिवाट नसताना गावकरी करत असलेली शेतातील रस्त्याची मागणी धुडकावून लावताना सुजाताच्या हिमतीला दाद मिळाली. अखेरीस मेश्राम यांनी केलेले सुजाता, वैशाली, सुधीर (दीपक) आणि रोशन (रवींद्र) यांच्या हत्याकांडाचे चित्रण जिवंत वाटणारे आहे. दोघी मायलेकींवर बलात्कार होताना सुजाताची वैशालीच्या मदतीसाठी दाखवलेली धडपड चीड निर्माण करते.
संपादन, संकलनात सिनेमा मागे
मध्यंतरापूर्वी सिनेमा फार संथ आहे. प्रारंभीचे 'फिलर' टाकण्यात वेळ आणि पैसा वाया घालवण्याऐवजी खून घडल्यानंतरचा न्यायालयीन लढा दाखवणे गरजेचे होते. मध्यंतरानंतर क्षणचित्रे पाहिल्यासारखा भास होतो. कथा दमदार असली तरी संकलन आणि संपादन धडपणे न झाल्याने चित्रीकरणाच्या भव्यतेचा अभाव आला.
कला दिग्दर्शकाचे कसब
खैरलांजी गावाचा हुबेहूब सेट उभा करण्यात कला दिग्दर्शक संजय पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बाबुलालचे घर, आंधळगाव पोलिस ठाणे, पोलिस अधीक्षक कार्यालय, शेतशिवार आदी ठिकाणे वास्तववादी घटनास्थळाशी साधर्म्य सांगणारी आहेत. त्याशिवाय आनंद मोडक यांचे संगीत आणि चित्रित एकमेव गीताने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.