आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: \'किक\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रवी तेजा या दाक्षिणात्य अभिनेत्याच्या 2009 मध्ये आलेल्या 'किक' या चित्रपटाचा हा रिमेक आहे. चकचकीत फ्रेम, उत्कंठावर्धक पाठलाग, रोमांचकारी स्टंट, प्रेमाची किनार, विनोदाचा शिडकावा, जबरदस्त हाणामारी, नाच-गाणी असा सर्व पैसा वसूल मसाला 'किक' मध्ये ठासून भरला आहे.
कथा :
देवीलाल सिंह ऊर्फ डेव्हिल (सलमान खान) हा अत्यंत हुशार, अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला युवक. सातत्याने किक मिळवण्यासाठी करामती करणारा. मित्राच्या लग्न लावून देण्याच्या प्रसंगी शायना (जॅकलिन फर्नांडिस)ही मानसोपचार डॉक्टर त्याच्या जीवनात येते. ती देवीच्या प्रेमात पडते. शायना आणि तिच्या वडिलांच्या पारंपरिक चौकटीत देवी न बसणारा असतो. तो शायनापासून दूर जातो. शायनाही वडिलांकडे पोलंडला जाते. दरम्यान इकडे दिल्लीत डेव्हिल नामक हायफाय चोरट्याने धुमाकूळ घातलेला असतो. त्याची केस हिमांशू (रणदीप हुडा) या पोलिस अधिका-याकडे येते. डेव्हिल पोलंडला असल्याचे समजल्यावरून हिमांशू पोलंडला जातो. हिमांशू शायनाच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा. त्याचा विवाह आपल्या कन्येशी व्हावा अशी शायनाच्या कुटूंबाची इच्छा असते. मात्र, शायना अद्याप देवीला विसरलेली नसते मग डेव्हिल, हिमांशू यांचा पोलंडमध्ये सामना रंगतो. आर्थिक अडचणीमुळे उपचार करू न शकणा-या लहान मुलांना मदत करण्यासाठी डेव्हिल हे सारे करत असतो. त्यानंतर काय होते हे पडद्यावर पाहणे उत्तम.
गीत-संगीत :
अनुनासिक स्वरभूषण हिमेश रेशमिया यांनी संगीताची बाजू सांभाळली आहे. सलमान खानेने गायलेले 'हँगओव्हर...', नर्गिस फाकरीचे किक नही मिलती...' हे आयटम साँग गाजते आहेच. यार ना मिले, तू ही तू, जम्मे की रात अशी गाणी आहेत, मात्र चाली जुन्याच असल्याने त्यात नाविन्य नाही.
कथा-पटकथा :
मूळ तामिळ चित्रपटाचा हा रिमेक आहे. तरी रजत अरोरा, किथ गोम्स, साजिद नाडियाडवाला आणि चेतन भगत या चार पटकथांकारांनी मूळ कथा फुलवली आहे. संवाद उत्तम आहेत. सलमान आणि नवाजुद्दीनच्या तोंडी असणारे संवाद दाद मिळवतात.
अभिनय :
सलमानने सुपर हीरो नेहमीच्या दबंगगिरीत रंगवला आहे. रणदीप हुडाने पोलिस अधिकारी टेचात सादर केला आहे. जॅकलिनने तिच्या वाट्याला आलेले प्रसंग बरे वठवले आहेत. लक्षात राहतो तो नवाजुद्दीन सिद्दिकी, त्याने रंगवलेला विक्षिप्त खलनायक मजा आणतो. विशेषत: त्याची टॉ..क.. करुन बोलण्याची लकब लाजवाब.
सार :
तुम्ही धूम एक, दोन, तीन आणि क्रिश 2, 3 पाहिले असतील तर 'किक' मध्ये तुम्हाला फारसे काही वेगळे आढळणार नाही. सलमानच्या फॅनसाठी मात्र, किक हा पैसा वसूल चित्रपट आहे.