आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie review: कोच्चडियान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्टून मुव्ही आणि रजनीकांत असं कॉम्बिनेशन पाहण्याची राजेशाही मजा 'कोच्चडियान' या सिनेमात येते, सुटीच्या दिवसांत मुलांसाठी हा अॅक्शन अॅनिमेशनपट चांगला पर्याय ठरतो. भारतात पहिल्यांदाच वापरण्यात आलेलं व्हिज्युअल अॅनिमेशन टेक्निक बर्‍यापैकी यशस्वी ठरलं आहे. यापूर्वी हॉलिवूडच्या 'अवतार' सिनेमात हे पाहायला मिळालं होतं.
कथा : सुरुवातीला कलिंगपुरा राज्याचा सेनापती राणा (रजनीकांत) राणनीती वापरून राज्य जिंकण्यासाठी लढाई करतो. मुळात शत्रूराज्य कोट्टयीपटीनमचा असणारा राणा कपटनीतीने बदला घेण्यासाठी प्रयत्नात असतो. दोन राज्यांत असलेल्या पारंपरिक वैरावर हा चित्रपट आहे. यानंतर राणा आणि कोट्टयीपटीनमची राजकन्या यांच्यातील प्रेमकथा दाखवली आहे. दोन्ही राज्यांच्या राजांनी राणाचे वडील कोचडिया यांच्यावरील अन्यायाच्या बदल्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होतात. मधेच कोचडियाचा फ्लॅशबॅक सुरू होतो. कथेच्या मध्ये राजकुमारी वधना (दीपिका पदुकोण)ची एन्ट्री होते. सिनेमाची कथा समजून घेण्यात थोडा गोंधळ उडतो. पण, अॅनिमेशनमुळे त्याकडे लक्ष राहात नाही.
संवाद : सिनेमात, प्रत्येक वाक्यातून तत्त्वज्ञान शिकवण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रकर्षाने जाणवते. काही संवाद लक्षात राहातात, ते रजनीकांतच्या विशेष शैलीमुळेच. 'जो गुस्से मे उठता है, वो हार के बैठ जाता है' किंवा 'दुष्मन से खतरनाक तो झुठा दोस्त होता है' असे संवाद हीरोईक वाटतात. राजेशाही धाटणीतले संवाद न वापरल्याने वास्तविकता टिकून राहाते.
तंत्रज्ञान : या सिनेमात वापरलेले अॅक्शन अॅनिमेशन तंत्रज्ञान अधिक प्रभावी होऊ शकले असते. दीपिका पदुकोण आणि रजनीकांत यांच्या फाईट सिनमध्ये खूप मेहनत घेतल्याचे जाणवते. अवतार सिनेमात वापरलेले तंत्रज्ञान वापरून तयार केलेला हा सिनेमा चांगला प्रयत्न म्हणता येईल. पाणी किंवा घोडदळ, पायदळ दाखवण्याशिवाय इतरत्र कुठेच थ्री डी वापरण्याची गरज भासत नाही.
संगीत : ए. आर. रेहमानने दिलेल्या संगीताने सिनेमात खरा प्राण ओतला आहे. काही ठिकाणी संगीत नसून नुसतेच संवाद आहेत, त्या जागा भकास वाटतात. सिनेमातील 'दिलचस पिया', 'तेरे संग प्रेम रंग', 'सुख दुख मिलके बाटेंगे हम'सारखी गाणी श्रवणीय आहेत.
दिग्दर्शन आणि अभिनय : कोच्चडियान हा अॅनिमेटेडपट आहे, मात्र यासाठीसुद्धा रजनीकांत यांनी बरीच मेहनत घेतलेली दिसते. त्यामुळे त्यांच्या अभिनयाला पैकीच्या पैकी गुण दिले जाऊ शकतात. दीपिका पदुकोणविषयी सांगायचे झाल्यास, ती आपल्या अभिनयाच्या बळावरच बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान टिकवून आहे. या दोघांसह जॅकी श्रॉफ, नासर आणि आर. शरतकुमार यांनी प्रामाणिकपणे आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. कोच्चडियान हा सिनेमा रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या हिने दिग्दर्शित केला आहे. सौंदर्या ग्राफिक्स डिझायनरसुद्धा आहे. यापूर्वी तिने अनेक सिनेमांसाठी ग्राफिक्स वर्क केले आहे. तिचे दिग्दर्शन उत्तम आहे. यापूर्वी तिने रजनीकांत यांच्यासह 'शिवाजी द बॉस' या सिनेमासाठी काम केले होते.
सार : चित्रपटाचा सार सांगायचा झाला तर अॅनिमेशन खर्‍या व्यक्तींवरून केल्याने अति डिटेल झाल्याचा भास होतो. पात्रांच्या चेहर्‍यावरचे हावभाव पटकन बदलत नाहीत. खूप अपेक्षा ठेवून असणर्‍यांचा हिरमोड होऊ शकतो. मात्र, रजनीकांतची अॅक्शन आणि अॅनिमेशनसाठी सिनेमा एकदा जरूर पाहावा.