आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : लेकर हम दिवाना दिल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपटसृष्टीत माइलस्टोन ठरलेल्या कपूर घराण्याशी संबंध सांगितला की सगळेच आपसूक होऊन जाते. मात्र, अभिनयात दम नसेल तर प्रेक्षक कुणालाही थारा देत नाहीत, याचा अनुभव अरमान जैनला येणार आहे. अतिशय ठोकळेबाज अभिनय, भावशून्य चेहर्‍याने चित्रपटभर वावरणारा अरमान प्रेक्षकांच्या मनात घर करू शकत नाही. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या 'लेकर हम दिवाना दिल'मधून इंडस्ट्रीला दीक्षा सेठच्या निमित्ताने नवा चेहरा मिळाला हे मात्र नक्की. निरागस चेहरा, बर्‍यापैकी अभिनय आणि परफेक्ट हीरोइन मटेरिअल असलेली ही अभिनेत्री आगामी काळात प्रस्थापितांना आव्हान देऊ शकते.
शीर्षकातून नवीकोरी प्रेमकहाणी हे स्पष्ट होते, मात्र प्रत्यक्षात चित्रपट पाहतानाचा अनुभव वेगळाच आहे. दिग्दर्शकाने नवे चेहरे आणि नवा विषय घेतला, पण अभिनय करवून घेता आला नाही. चित्रपटातील प्रेम आणि विरह या भावना अशा पद्धतीने दाखवल्या आहेत की त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतच नाहीत. चित्रपटातील संगीताची बाजू कमकुवत आहे. चित्रीकरणावर प्रचंड खर्च असला, तरीही प्रेमकहाणी काही रंगली नाही. दीक्षा मात्र चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममध्ये लक्ष वेधून जाते. इतर सहायक कलावंतांतील एकही आपल्या अभिनय, संवादातून प्रेक्षकांचे लक्ष वेधू शकत नाही.
कथा :
करिश्मा शेट्टी ऊर्फ के आणि दिनेश निगम ऊर्फ दिनो या दोघा मित्र-मैत्रिणीची ही कहाणी आहे. दोघांचा एकमेकांत खूप जीव. केचे कुटुंब टिपिकल साऊथ इंडियन. ते केचे लग्न पारंपरिक पद्धतीने ठरवू पाहतात. मोकळ्या आणि स्वतंत्र विचारात वाढलेली के यामुळे दु:खी होते, पण विरोध करू शकत नसते. दिनोचे आणि केचे प्रेम असल्याची चर्चा पूर्ण कॉलेजात असते. दिनोलाही केला गमवायचे नसते म्हणून ते दोघे घरातून पळून जातात. लग्न करतात. वेगवेगळ्या वळणांनी प्रवास करत दोघांमध्ये भांडणही पेटते. घरचे त्यांच्या मागावर असतातच, मग दोघे आपापल्या घरी परततात. भांडणामुळे आपण दोघे ऐकमेकांसाठी नाही आणि कुटुंबालाही मान्य नाही म्हणून घटस्फोट घ्यायचे ठरवतात. या कोर्टकेसदरम्यान त्यांना प्रेमाची जाणीव होते, पुढे ते एकत्र येतात का हे पडद्यावर पाहायला हवे.
अभिनय :
कपूर घराण्याशी संबंध असल्याने अरमानच्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संपूर्ण कपूर घराणे पूर्ण ताकदीनिशी प्रचारात उतरले होते. मात्र, गोरेपणा वगळता इतर कुठलाही कपूर घराण्याचा ठेवा त्याच्याकडे नाही. दीक्षाचा अभिनय चांगला आहे. तिच्या रूपाने मिळालेला नवा चेहरा इंडस्ट्रीत चुणूक दाखवेल. सहकलाकारांचा अभिनय जेमतेम होता. छोट्या पडद्यावरील हे सहकलाकार चांगले अभिनेते आहेत, मात्र दिग्दर्शकाला त्यांचा वापर करता आला नाही.
संगीत :
ए. आर. रहमानचे संगीत चित्रपटाला असूनही एकही गाणे ओठांवर रुळणारे नाही, ही विलक्षण बाब या चित्रपटात आहे.
संवाद :
चित्रपटात एकही असा संवाद नाही जो टाळ्या मिळवेल. चित्रपटातील संवाद म्हणजे वेगळे आकर्षण असते. विशेषत: नव्याने लाँच होणार्‍या कलावंतांसाठी संवाद ही जमेची बाजू असते. या चित्रपटात संवादही तारू शकत नाहीत.
सार :
वेगळा विषय असला, तरीही चित्रपट प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचणारा नाही. प्रेमकहाणी ही तरुण मनाला साद घालणारी, भावनांना हात घालणारी असते, मात्र ही प्रेमकहाणी पुढे सरकताना पोरखेळ चालला आहे, असे प्रेक्षकांना वाटते, तर चित्रपटातील अनेक प्रसंग उगाचच घातल्यासारखे असल्याने त्यांची लिंक लागत नाही. माओवाद्यांच्या तावडीत सापडलेले दोघे अगदी सहजपणे मनाला वाटेल तसे निघून येतात. या गोष्टी सामान्य प्रेक्षकांच्या बुद्धीला पटणार्‍या नाहीत. अरमान आपला प्रभाव पाडू शकला नाही, तर दीक्षा मात्र सर्वांचे लक्ष वेधून गेली.