आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Movie Review Of Subodh Bhave Starer Marathi Film Lokmanya Ek Yugpurush

Movie Review: लोकमान्य एक युगपुरुष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कथा :
टिळकांविषयी बऱ्याच घटना बहुतेकांना माहिती आहेत. पडद्यावर सूत्रधार पत्रकार (चिन्मय मांडलेकर) आजच्या स्थितीशी तुलना करत त्यांचा जीवनपट उलगडत जातो. टिळकांवरील (सुबोध भावे) राजद्रोहाचा खटला, त्यांची व आगरकरांची (समीर विध्वंस) मैत्री, डेक्कन स्कूल, गणेशोत्सव व शिवजयंती, केसरी व मराठाचे युग, आधी राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा यावरून आगरकरांशी मतभेद, पुण्यातील प्लेग, रँडचा धुडगूस, रँडचा वध, बंगालची फाळणी, काळ्या पाण्याची शिक्षा ते सुटका असा सारा प्रवास यात चित्रित करण्यात आला आहे.

पटकथा -संवाद :
खरे तर लोकमान्यांचे चरित्र दोन तासांत पडद्यावर उलगडून दाखवणे अशक्य. मात्र, शतकापूर्वीची परिस्थिती व आताची स्थिती यातील साम्यातून घेतलेला घटनांचा आढावा यामुळे टिळकांची दूरदृष्टी स्पष्ट करण्यात यश आले आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? सारखे दमदार संवाद टिळकांच्या विचारसरणीचा पट उलगडून दाखवण्यास मदत करतात. ऐतिहासिक चित्रपटात महत्त्व असते ते वेशभूषा, केशभूषेला. महेश शेरला आणि विक्रम गायकवाड यांनी हे काम चोख बजावले आहे. लोकमान्यांसह सर्व पात्रे बहुतांश व्यक्तिमत्त्वांशी हुबेहूब जुळणारी वाटतात.

अभिनय :
सुबोध भावे यांनी लोकमान्यांची मध्यवर्ती भूमिका अत्यंत दमदारपणे सादर केली आहे. टिळकांचा बाणेदारपणा, देशभक्ती, जनसंघटन शक्ती, करारीपणा, वैचारिक बैठक असे सर्व पैलू सुबोधने उत्तम बेअरिंगसह पडद्यावर साकारले आहेत. त्याला तेवढीच उत्तम साथ आगरकर वठवणाऱ्या समीर विध्वंस, दाजी खरे झालेले अंगद म्हसकर आदींनी दिली आहे.

सार :
मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही हा लोकमान्यांचा बाणेदारपणा स्पष्ट करणारा प्रसंग मात्र चित्रपटात दिसत नाही. टिळकांच्या जीवनातील अनेक महत्त्वाचे प्रसंग गुंडाळल्यासारखे वाटतात. आताच्या स्थितीशी सांगड घालण्यात बरेच फुटेज वाया जातात. असे असले तरी लोकमान्यांच्या जहाल विचारांचा हा धगधगता अंगार पडद्यावर अनुभवणे चांगले.