आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : दुसरी गोष्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या जीवनावर आधारित ही गोष्ट आहे. दलित समाजातील एक जिद्दी, सुशील, चतुर मुलगा ते केंद्रीय गृहमंत्री असा राजकीय प्रवास दाखवणारी 'दुसरी गोष्ट' उत्तम राजकीय पट आहे. हे सत्य पडद्यावर आणताना दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी केलेली मेहनत स्पष्ट जाणवते. पन्नास वर्षांपूर्वीचा काळ, त्या वेळची राजकीय-सामाजिक परिस्थिती, महाविद्यालयीन वातावरण, रंगणार्‍या राजकीय खेळी यांचे सोलापूर आणि परिसरात केलेले नितांतसुंदर चित्रीकरण ही 'दुसरी गोष्ट'ची काही वैशिष्ट्ये. मुळात चंद्रकांत कुलकर्णी यांचा पिंड नाटकाचा आहे. मात्र, 'बिनधास्त' ते 'आजचा दिवस माझा' या प्रवासात त्यांची कॅमेर्‍यावरची पकड वरचेवर पक्की होत असल्याचे जाणवते.
कथा : दगडू ऊर्फ प्रसन्नजित शिंदे (सिद्धार्थ चांदेकर) हा दलित समाजातील मुलगा. खेडेगावातील एक शाळेत तो शिकत असतो. मित्रांसोबत अनेक उनाडक्या, उचापती करणे हा त्याचा नित्यनेम. त्याच्या घरात आई आणि काकू आहेत. आईपेक्षा काकूचा त्याच्यावर धाक व प्रेम. आई आणि काकूचे स्वप्न मात्र दगडूने शिकून मामलेदार होण्याचे. यथावकाश दगडूच्या खोड्या, चोर्‍या उघड्या पडतात. आई आणि काकू त्याला खडसावतात. दगडूचे डोळे उघडतात. तो मोठा माणूस होण्याचे मनावर घेतो. महाविद्यालयीन शिक्षणासाठी सोलापुरात येतो. तेथेच न्यायालयात पट्टेदाराची नोकरी करत शिक्षण घेतो. नाटके, वक्तृत्व स्पर्धांत भाग घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतो. दरम्यान, दलित समाजाचा असल्याने येणारी सामाजिक वागणूक त्याच्याही वाट्याला येते. त्यातून तो शिकत राहतो. स्वत:चे नाव बदलून प्रसन्नजित असे ठेवतो. पुढे फौजदार होतो. त्या वेळी त्याच्या जीवनात अंजली (नेहा पेंडसे) येते. दोघे आंतरजातीय विवाह करतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भरत परब (आनंद इंगळे) यांची नजर या तरुणावर जाते. ते त्याला राजकारणात आणतात. प्रसन्नजित मग राज्यमंत्री ते मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री अशी वाटचाल करतो. मध्ये अनेक राजकीय वळणे येतात. त्याला धीराने सामोरे जातो.
अभिनय : सिद्धार्थ चांदेकर यांनी मध्यवर्ती भूमिका उत्तम वठवली आहे. त्याची मिशी, घारे डोळे, चालण्याची-बोलण्याची लकब यातून पडद्यावरचे सुशीलकुमार चांगले साकारले आहेत. बाकी विक्रम गोखले, रेणुका शहाणे, प्रतीक्षा लोणकर आदी मंडळी नेहमीप्रमाणे उत्तम. आनंद इंगळेंनी साकारलेला भरत परब हुबेहूब शरद पवारांची आठवण करून देणारा आहे. पवार साहेबांची बोलण्याची, बसण्याची, पाठीवर थाप मारण्याची स्टाइल उत्तम.
पटकथा-संवाद : एका माजी मुख्यमंत्र्याच्या खर्‍याखुर्‍या जीवनाची कहाणी प्रशांत आणि अजित दळवी यांनी अनेक बारकाव्यांसह पटकथेत गुंफली आहे. जोडीला उत्तम संवादांची जोड आहे. प्रसन्नजितच्या एकूण जडणघडणीत बालपणाचा काळ अत्यंत महत्त्वाचा असल्याने तो भाग चित्रपटात चांगला ठसवला आहे. प्रसन्नजितच्या जीवनात विविध टप्पे साकारण्यासाठी वेगवेगळे अभिनेते वापरण्याची योजना उत्तम.
गीत-संगीत : गाणी फारशी नाहीत. मात्र, जी आहेत ती दासू यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली आहेत. आशयघन शब्दांतून नेमक्या भावना गाण्यांतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात ते यशस्वी ठरले आहेत. अशोक पत्की आणि मंगेश धाकडे यांचे संगीत सर्मपक.
सार : राजकीय नेत्याचा खराखुरा प्रवास पडद्यावर उत्तम साकारण्यात आला आहे. मात्र, कडक संकलन करून लांबलेली 'दुसरी गोष्ट' थोडी कमी केली असती तर आणखी मजा आली असती. शेवटी चंद्रकांत कुलकर्णी, दासू, अजित आणि प्रशांत दळवी ही औरंगाबादच्या मातीतील मंडळी एकत्र आल्यावर काय घडू शकते याचे प्रत्यंतर 'आजचा दिवस'. नंतर पुन्हा घ्यायचे असेल तर 'दुसरी गोष्ट' पाहण्यास हरकत नाही.