आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : टपाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कथा:
कोकणातील गावात टपाल पोहोचवणारा मास्तर (नंदू माधव) आपल्या पत्नी (वीणा जामकर) शिवले येथे राहात असतो. रंग्या (रोहित उतेकर) हा शाळकरी, खोडकर मुलगा. मास्तर दाम्पत्य निपुत्रिक आहे. रंग्याचा लळा या जोडीला लागतो. रंग्याचे मन शाळेत जाणाऱ्या कुकीकडे आकर्षित झाले आहे. त्यातूनच तो कुकीला एक पत्र पाठवतो. नंतर हे पत्र कुकीपर्यंत पोहोचू नये यासाठी तो मास्तरच्या जास्त जवळ येतो. मास्तर त्याची पत्नी त्याला तालुक्याची गावी नेतात. इकडे रंग्याला पळवून नेल्याचा आरोप मास्तरवर ठेवून त्याला गावाबाहेर हाकलून देतात. पुढे काय होते हे पडद्यावर आवर्जून पाहा.
पटकथा-संवाद:
मंगेश हाडवळे यांनी कथा-पटकथा लिहिली आहे. तर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी संवाद रेखाटले आहेत. बांधेसूद पटकथा, सत्तरच्या दशकातील गाव आणि त्याला दर्जेदार संवादाची जोड यामुळे टपाल वाचनीय अर्थात प्रेक्षणीय झाले आहे.
गीत-संगीत:
प्रकाश होळकर यांनी कथेचा बाज लक्षात घेऊन गीतलेखन केले आहे. रोहित नागभिडेंनी ही आशयघन गाणी चांगली सजवली आहेत. ऊर्मिला कानेटकरवर चित्रित 'ऐवज ठेवला जपून...' ही लावणी ठसकेबाज झाली आहे. मन मोहरून आले हे गाणेही चांगले जमले आहे.
अभिनय:
नंदू माधवनी रंगवलेला मास्तर मास्टरपीस झाला आहे. सहज, नैसर्गिक देहबोली, सायकल चालवण्याची ढब यातून त्यांनी ही व्यक्तिरेखा अधिक सशक्त केली आहे. वीणा जामकरांनी अपत्य नसल्याचे दु:ख सल मुद्राभिनयातून उत्तम वठवली आहे. रंग्यात मूल पाहणारी त्याला जत्रेत फिरवणारी आई तिने दमदारपणे उभी केली आहे. खरी कमाल केली आहे ती रंग्या अर्थात रोहित उतेकरने. त्याचे ते बालवयातील फँटसी पाहणे, माळावर बसून तिला पत्र लिहिणे, मारुतीसमोरचे पैसे उचलणे सारे काही मनाला भिडते.
सार:
मानवी भावनांचा सुरेख मेळ साधणारे हे पत्र अर्थात टपाल आवर्जून पाहण्याजोगे आहे. यातील आशय सध्याच्या दांभिक, मतलबी ढोंगी जगाचा बुरखा फाडणारा तर आहेच, रंजनाबरोबरच माणूसपण जपायला सांगणारे अंजन देणाराही आहे.