आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MOVIE REVIEW : तुझी माझी लव्हस्टोरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेगळी परिकथेतील कल्पना घेऊन चित्रपट करण्याऐवजी तुमच्या आमच्या वावरणा-यांची कहाणी पडद्यावर आणण्याचा विचार ठेवणारे मोरे यांनी उत्तमपणे विषय निवडला आणि मांडला. पण पटकथेत मात्र अनेक ठिकाणी कमकुवत ठरले. चित्रपट काही जागांवर अचानक वेग धरतो तर काही ठिकाणी इतका हळूवार पूढे सरकतो की प्रेक्षकांचा संयम पणाला लागतो. ‘तुजविण सख्या रे’ या मालिकेतून घराघरात पोहचलेला गौरव घाटणेकर चित्रपटात आपल्या अभिनयाची चूणुक दाखविण्यात यशस्वी ठरला. तर श्रुती मराठे मात्र कृत्रिमपणे अभिनय करताना दिसली.
सोज्वळपणे चित्रपटभर वावरणारी श्रुती अनेकदा चित्रपटाचा भाग नसलेल्याप्रमाणे वावरल्याचे भासते. गौरव वगळता चित्रपटातील सर्वच कलावंतांची निवड चुकली आहे. कौटुंबिक नाते कृत्रिम वाटतात, जितके पैसे मिळाले तितकेच हावभाव करायचे असा कलावंतांचा दृष्टीकोण असल्याचे वाटते. पहिल्या भागात अतिशय कंटाळवाणा आणि असे कधी घडले असे प्रश्न प्रेक्षकांना अनेकदा पडतो. 'दिल चाहता है' या चित्रपटाचा अनुभव अनेकदा चित्रपट पाहताना होतो.

कथा
इंद्रनील हा एक स्वच्छंदी कलावंत. आयुष्यात नक्की काय करायचे याचा काहीही विचार मनात नसलेला पण गुणी कलावंत. मुंबईत राहणारी इंद्रनीलची बहीण संध्याची मैत्रिण आदिती गोव्याहून त्यांच्याकडे काही कामानिमित्त येते. चार दिवस इंद्रनील आणि आदिती सोबत घालवितात, त्यात इंद्रनील तिच्या प्रेमात पडतो. आपले आदितीवर प्रेम आहे, ही गोष्ट सांगण्यासाठी तो मुंबईहून ‘गोली’ या मित्राला घेऊन गोव्याला जातो. तिथे तो आदितीला प्रपोज करतो. मात्र आदिती त्याच्यापैक्षा वयाने पाच वर्षे मोठी असल्याचे स्पष्ट करत त्याला नकार देते. तरीही इंद्रनील पिच्छा सोडत नाही. हळूहळू आदितीही प्रेमात पडते. इकडे आदितीचे लग्न आधीच भावाच्या मित्राशी ठरलेले असते. तेव्हा ही कोंडी कशी सुटते याची रंजकता पाहण्यासारखी आहे. मारामारी, दबाव, घालमेल अशा भावना यातून मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
अभिनय
फारसे हीरो लूक नसलेला आणि अतिशय साधारण वाटणारा गौरव चित्रपट शेवटाला जाईपर्यंत प्रेक्षकांना आपलेसे करुन जातो. वयाने प्रौढ वाटणारी श्रुती चित्रपटात अतिशय कृत्रिमपणे वातरताना दिसते. इतर सहाय्यक कलावंत देखील फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. गौरव वगळता चित्रपटातून कुणीही प्रेक्षकांना भावणारे पात्र रंगवू शकले नाही.
संगीत
अश्विनी शेंडेने केलेले गीतलेखन मराठीतील चांगला प्रयोग आहे. हिंदी, इंग्रजीचा वापर असलेली गाणी तरुणांना आकर्षित करण्यासाठी रचलेली दिसतात. संगीताची बाजू चित्रपटाला वेगळे ठरविणारी आहे, तरीही ओठी रुळणारी गाणी नाहीत. बापी तूतुल यांचे संगीत मोरे यांनी वापरुन वेगळा प्रयोग केला.
संवाद
संवाद सहज सामान्य आहेत. दैनंदिन जीवनात तुम्ही आम्ही बोलू अशाच संवादाचा वापर चित्रपटात असल्याने ही आपल्याच आजूबाजूला घडणारी लव्ह स्टोरी असल्याचे जाणवते.
सार
चांगला विषय असला तरी तो चांगल्या पद्धतीने मांडता येणे महत्त्वाचे असते. या चित्रपटाचा विषय चांगला आहे, आपल्याच अवतीभोवती घडणारी कथा चित्रपटात पाहतोय असे भासत असले तरी कलावंतांची निवड साफ चुकली आहे. तांत्रिक कौशल्यांचा वापर चित्रपटात नाही. चित्रीकरण देखील उत्तम झालेले नाही. विषय आणि गौरवचा अभिनय वगळता चित्रपट प्रेक्षकांना भावेल असे काहीच नाही.