आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मी आणि यू\' हलकीफुलकी प्रेमकहाणी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘मी आणि यू’ हा नावाप्रमाणेच दोघांचा चित्रपट आहे. संग्राम पाटील यांच्या कथेला तरुणाईचा बाज देऊन एक हलकेफुलके पॅकेज देण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न यशस्वी झाला आहे.
भूषण प्रधान आणि सई लोकूर या प्रेमी युगुलाभोवती फिरणारी ही कहाणी आहे. नव्या जोडीने प्रेक्षकांना सुखद अनुभव दिला आहे. भूषण आणि सईचे लुक्स प्रफुल्लित करणारे आहेत. पत्रकारांच्या भूमिकेत वावरणारे हे दोघे पत्रकारांच्या आयुष्याचा अचूक वेध घेणारे आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकाराची भूमिका, त्यातून होणारे विनोद कथेशी सुसंगत आहेत.
कथा : फेसबुकच्या माध्यमातून मित्र झालेले इरा आणि अभिषेक हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडतात. दोघांनीही एकमेकांना पाहिलेले नसते. एका वृत्तवाहिनीत पत्रकार म्हणून संधी मिळावी यासाठी दोघे प्रयत्न करतात. इरा हुशार असते, तिला नोकरी मिळते. मात्र, अभिषेक संपादकाला ब्लॅक मेल करणारा व्हिडिओ दाखवून इराची नोकरी स्वत: पटकावतो. याचा राग येऊन इरा वेगाने गाडी चालवते आणि तिचा अँक्सिडेंट होतो. मग तिचा भास अभिषेकला सगळीकडे होऊ लागतो. त्यातून पूर्वी प्रेमाबद्दल फार गंभीर नसलेला अभिषेक इराच्या प्रेमात आकंठ बुडतो. इराचे वडील बंदुकांचे दुकानदार, आपल्या एकुलत्या एक मुलीवर त्यांचे प्रचंड प्रेम असते. तिला बरी करण्यासाठी ते कासावीस होतात. अभिषेकमुळे तिची नोकरी गेलेली असल्याचे वाहिनीचे संपादक प्रायश्चित्त म्हणून अभिषेकला तिच्याजवळ थांबायला लावतात. यातूनच प्रेमकहाणी फुलते, बंध अधिक घट्ट होतात.
अभिनय : भूषण प्रधान आणि सई लोकूर या मुख्य कलावंतांबरोबरच इतर सर्वच कलावंतांनी प्रामाणिक अभिनय केल्याने चित्रपटाला सौंदर्य प्राप्त झाले आहे.
संवाद : चित्रपटातील मंगेश देसाईच्या तोंडी दिलेले महाराष्ट्राच्या विविध प्रांतांतील लहेजाचे संवाद प्रेक्षकांना भावणारे आहेत. इतर संवाद नेहमीप्रमाणे आहेत.
संगीत : चित्रपटातील प्रेमगीत अप्रतिम आहे. हे गाणे रुपेरी पडद्यावर पाहताना यशराज बॅनरचा चित्रपट आपण पाहत आहोत असा अनुभव येतो. संगीत ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे.
वैशिष्ट्य : प्रेमकहाणी, त्यातही मराठीत पहिल्यांदाच केलेला व्हिज्युएल इफेक्ट्सचा वापर हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य. सई लोकूर फक्त भूषणलाच दिसते, त्याच्याशी गप्पा मारते हे पाहणे रंजक आहे. एका प्रसंगात एकाच वेळी 15 सई दिसतात, हा प्रसंग पडद्यावर पाहणे हा वेगळा अनुभव ठरतो. याशिवाय डीडीएलजे, बॉडीगार्ड आणि राऊडी राठोड या चित्रपटांतील गाजलेल्या गाण्याचा गेटअप आणि तसेच नृत्य दाखवण्यात आल्याने मराठी चित्रपट तांत्रिक चौकट मोडत असल्याचे जाणवते.
मंगेश देसाई चित्रपटभर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषांतून निवेदन करत चित्रपटाची कथा पुढे सरकवतो. यातून विविध भाषांतून त्याने लीलया केलेला संचार आणि अचूक वेळी आलेली त्याची भूमिका प्रेक्षकांची दाद मिळवून जाते.
सार : इंटरनेटच्या माध्यमातून जुळणारी प्रेमप्रकरणे आणि त्यातून होणारे प्रकार आता सर्वसामान्यांच्या जीवनाचा भाग झाले आहेत. मात्र, या प्रेमातून फुलत गेलेली आणि यशस्वी झालेली ही प्रेमकहाणी कुठलाही संदेश देणारी नसून फक्त प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी आहे. सयाजी शिंदे आणि मोहन जोशींसारख्या दिग्गज कलावंतांनी आपल्या अभिनयाने चित्रपटात जीव ओतला आहे. अरविंद जगताप यांनी पटकथा लिहिली आहे. चित्रपटातील प्रसंगांमधील संवेदना प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्यात मात्र अपयश आले आहे. यामध्ये दिग्दर्शन आणि पटकथेचे अपयश आहे. मातब्बर कलावंत असताना चित्रपटातील प्रसंगातून प्रेक्षकांना खिळवून ठेवणे जमलेले नाही.