आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नारबाची वाडी'... गुजरा हुआ जमाना, पण आहे खरा खजाना !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जुन्या उत्कृष्ट साहित्य कृतीवर काढलेला उत्कृष्ट चित्रपट ही पावती मिळवणारा चित्रपट म्हणजे 'नारबाची वाडी'. 'शाज्जनो बागान' या बंगाली नाट्यकृती आधारित या चित्रपटाची गोष्ट जुन्या काळातील आणि उत्कृष्ट मराठी-कोकणी साहित्य म्हणूनच ओळखली जाणारी आहे. पटकथाकार संवाद लेखक गुरु ठाकूर यांनी आपल्या संवाद लेखणीतून आणि गीत लेखणीतून हुबेहूब 'तो काळ'पकडला आहे. मनोज जोशी, दिलीप प्रभावळकर हे दोन्ही अभिनेते ताकदीचे अभिनेते आहेत, यात शंका असण्याचे कारण नाही. प्रभावळकरांचा 'नारबा' आणि मनोज जोशींनी साकारलेला मल्हारराव-रंगराव यांनी कथेतील संवादाचे सोने केले आहेच पण त्याबरोबरच 'पंढरी' साकारणारा विकास कदम 'मंजू' साकारणारी ज्योती मालशे, रंगरावाची पत्नी साकारणारी किशोरी शहाणे, 'बेरक्या'साकारणारा निखिल रत्नपारखी, 'लिंगाप्पा'साकारणारा अतुल परचुरे या सर्वानीच आपापल्या भूमिका चोख पार पाडून कथेचे, संवादाचे सोने केले आहे.

उत्कृष्ट लोकेशन्स, उत्कृष्ट कास्टिंग, उत्कृष्ट कथा, संवाद आणि दिग्दर्शन, संगीत अशा सर्वच पातळीवर हा चित्रपट यशस्वी ठरतो. आणि सिनेमाच्या आर्थिक गणिताचा विचार केला तर सर्वात स्वस्तात काढलेला मस्त चित्रपट असेही या चित्रपटाचे वर्णन करता येईल. साहित्याची आवड असलेले, युवक, रसिक याला चांगली दाद देतील.

उरफाट्या गावाचा, उरफाटा चाळा
पिंडाचा इथे, कावळ्यावर डोळा
सशाने शिकार केली वाघाची ,
सिंव्हाला भिडे गाय ….
या टायटल साँगने सुरु होणारी गोष्ट आहे ती वाडीची, जी नारबाची आहे. कोकणातील निसर्गरम्य परिसरात ब्रिटीश कालातच कथेला प्रारंभ होतो. सुंदर, सुरेख अशी ही वाडी इंग्रजाच्या काळात मस्तवाल बनलेल्या मल्हार राव खोत यांच्या नजरेत पडते आणि मग सुरु होतो ही वाडी बळकावण्याचा प्रवास. एकीकडे अगदी असहाय्य असा नारबा तर दुसरीकडे शक्तिशाली, मस्तवाल खोत. यात खोतापासून वाचविण्यासाठी नारबाचे सत्कर्म म्हणून क्रांतिकारक वाटेल असा डाकू सत्तू त्याच्यासाठी धावून येतो. आणि हा धसका मल्हार रावाच्या पचनी पडत नाही त्यात त्याचा अंत होतो आणि मग सुरु होतो त्याचा मुलगा रंगराव याचा प्रवास.

डाकू सत्तूला पोलिसांनी पकडल्यानंतर रंगराव आपल्या बापाची अपुरी इच्छा पूर्ण करण्याच्या, पण आपल्या वेगळ्या शैलीने ती हाताळण्याचा प्रयत्न सुरु करतो. आणि सुरु होते गोष्ट ती प्रामाणिक पण कधी इरसाल वागणारा नारबा आणि कंजूष पण हव्यासी रंगराव यांच्या कुरघोडीची. ज्यात नारबाचा वारसदार असलेला त्याचा नातू पंढरी, त्याच्या प्रेमात पडून घरातून पळून आलेली मंजू , हव्यासी रंगरावाची पत्नी आणि उधळ्या मुलगा, ज्योतिषी लिंगाप्पा, मल्हार राव आणि रंगराव या दोघांचा सहकारी बनलेला बेरक्या यांच्यासह नारबाच्या वाडीतला छोटासा चोर, रंगरावाचा न्हावी, डॉक्टर यासर्वांनीच आपली भूमिका चोख बजावली आहे.