आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Movie Review : बावरे प्रेम हे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्दर्शक अजय नाईक यांनी प्रेम आणि भावनिक गुंतागुंत हे दोन्ही पैलू चांगल्या पद्धतीने उलगडले आहेत. ऊर्मिला कानेटकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या अभिनयाने कथानक पुढे सरकते. निर्मात्यांना आव्हान देणाऱ्या प्रेमाभोवती गुंफणारा हा विषय नाईक यांनी निवडला. पटकथा अतिशय अचूकपणे लिहिल्याने प्रेक्षक प्रत्येक सेकंदाला चित्रपटाशी बांधलेला राहतो. सलील सहस्रबुद्धे यांनी वापरलेले कॅमेऱ्याचे कौशल्य दाद देण्याजोगे आहे. सहजसुंदर संवादातून आपणही कहाणीचा भाग असल्याचा भास होत असला, तरीही अस्सल शुद्ध मराठी संवाद गोव्याच्या पार्श्वभूमीवर विसंगत वाटतात.
कथा:
नील राजाध्यक्ष (सिद्धार्थ) हा पुण्यातील मुलगा गोव्यात मित्रांसोबत सुटी घालवण्यासाठी येतो. या सुटीवर अनन्या (ऊर्मिला) त्याला भेटते. अनन्याला रिसर्चसाठी ग्रेबी गोन्साल्विस मार्गदर्शन करत असतो. सुटी संपवून सर्व मित्र पुण्यात परततात, मात्र नीलला अस्वस्थ करतात, त्या गोव्यातील आठवणी आणि तो पुन्हा गोव्याला जातो. तिथे अनन्याच्या घरी पेइंग गेस्ट म्हणून राहतो. अनन्याचा मित्र रोहित कायम तिच्यासोबत असतो. नील तिच्यावर जिवापाड प्रेम करू लागतो. तिच्यावर एक कविता लिहितो. तेव्हा अनन्या त्याला मनापासून लिहिण्यासाठी प्रेरणा देते. तो लिहायला लागतो, इतके उत्तम लिहू लागतो की सर्वाधिक खपाच्या पुस्तकांचा लेखक होतो. त्याच्या एका पुस्तकाचे प्रकाशन गोव्यात करण्याचे ठरवतो. अनन्याच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करायचे असते. मात्र, ती येत नाही. का येत नाही अनन्या, याचे उत्तर चित्रपटातून पाहणे सुखद ठरेल.
अभिनय:
ऊर्मिला प्रत्येक प्रसंगातील अभिनयात उत्तम दिसली. हळव्या मनाचा प्रियकर रंगवताना कल्पनांचा आवेग असून वास्तवाचे भान ठेवणारा नील सिद्धार्थने उत्तम वठवला. चित्रपटातील सर्व सहकलावंतांचा अभिनय भूमिकांना न्याय देणारा होता.
संगीत:
अजय नाईक यांनी चित्रपटाला दिलेले संगीत उत्तम जमले आहे.
संवाद:
चिन्मय केळकर यांनी चित्रपटाचे संवाद अतिशय हलके-फुलके लिहिले आहेत. प्रत्येक जण चालता-बोलता जसे संवाद उच्चारतो, तसे संवाद यामध्ये आहेत. चित्रपटाची अभिनेत्री गोवन आहे, त्यामुळे कोकणी टोन मराठी पात्रांच्या तोंडी अपेक्षित होता. शुद्ध मराठीतील संवाद चित्रपट पाहताना खटकतात.
सार:
प्रेमाला हात घालणारा उत्तम विषय, अचूक पटकथा असलेला हा चित्रपट आहे. गोव्यातील निसर्गरम्य वातावरणात फुलणारी प्रेमकथा, उत्तम कलावंत यांची चित्रपटातील निवड प्रेक्षकांना चांगली कलाकृती देणारी आहे. सुंदर प्रेमकहाणी गुंफण्यासोबतच प्रेक्षकांना हळहळ व्यक्त करायला लावण्यात दिग्दर्शकाला यश आले.