आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: प्रेमासाठी कमिंग सून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठीत अलीकडे खूप चांगले प्रयोग होत आहेत. गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही मराठी चित्रपटांनी ठसा उमटवला. मात्र,काही चित्रपट याला अपवाद असतात. दिग्दर्शक अंकुर काकटकर यांचा ताजा प्रेमासाठी कमिंग सून याच पंगतीत बसणारा आहे.
एखाद्याला जाळ्यात ओढून त्याच्याशी लग्न करून त्याची संपत्ती लूटून फसवणूक या मध्यवर्ती संकल्पनेभोवती हा चित्रपट फिरतो. मात्र कथा, पटकथा, संवाद, मांडणी, गीत-संगीत या सर्व पैलूंकडे दुर्लक्ष झाल्याने आपण प्रेक्षकांचीही फसवणूक करतो आहोत याकडेही दुर्लक्ष झाले आहे. पडद्यावर नायिका नायकांच्या फसवाफसवी हा न रंगलेला सोहळा पाहताना आपली मात्र फसवणूक झाल्याचे प्रेक्षकाच्या लक्षात येते.
कथा :
अदित्य (अदिनाथ कोठारे) हा एक होतकरू तरूण (तो पोटपाण्यासाठी नेमके काय करतो हे माहिती नाही). अदित्यच्या आजीने (सुहास जोशी) त्याच्यासाठी अंतराचे (नेहा पेंडसे) स्थळ आणले आहे. अंतराचा सांभाळ तिचे मामा (विजय पाटकर) व मामीने (रेशम टिपणीस) केलेला असतो. अदित्य व अंतराचा विवाह पार पडतो. लग्नाच्या पहिल्या सकाळीच अंतरा सोन्याचे दागिने घेऊन अदित्यच्या घरातून गायब होते. अदित्य शेवटी पोलिसांत जातो. तेथे अंतरा फसवेगिरीत अट्टल असल्याचे त्याच्या लक्षात येते. मग अदित्य याचा छडा लावण्याचे व अंतराला प्रेमाने जिंकण्याचे ठरवतो. दरम्यान अंतराने संग्राम कोलते पाटलांचे (जितेंद्र जोशी) स्थळ गाठलेले असते. अदित्य तेथे पोहोचतो. मग अंतराचे मनपरिवर्तन करून तिला प्रेमाने जिंकतो. शेवट गोड होतो.
पटकथा -संवाद :
पटकथेवर कामच न झाल्याने प्रेमासाठी...भरकटला आहे. अंतरा व तिचे मामा-मामी असा मार्ग का स्वीकारतात याचे कारण पटत नाही. संवाद खटकेबाज, यमक जुळवणारे व आहेत. विशेषतकरून संग्रामच्या तोंडी असलेले संवाद काही ठिकाणी पातळी सोडणारे आहेत.
गीत -संगीत :
असे कथानक खुलवण्यासाठी गाण्यांचा सुंदर वापर करता आला असता,परंतु पटकथेवर कामच न झाल्याने गाण्याच्या सिच्युएशन नाहीत. त्यामुळे आहेत ती गाणी ठिगळ लावल्यासारखी येतात. संगीतकार पंकज पडघन यांनी फारशी मेहनत न घेतल्याने ती लक्षात राहण्याचा प्रश्नच येत नाही.
अभिनय :
अदिनाथ कोठारेने अदित्यच्या भूमिकेत त्याच्या परीने रंग भरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. मात्र तो बऱ्याच ठिकाणी कमी पडतो. नेहा पेंडसेने अंतराची भूमिका समरसून पार पाडली आहे. मात्र अनेक अँगलमधून तिची आणि अदिनाथचा जोडी विजोड वाटते. खरी मजा आणतो तो जितेंद्र जोशी संग्रामचा कोल्हापुरी ठसका त्याने टेचात सादर केला आहे. बाकी पात्रे ठीक.
सार :
मराठीत विविध विषयांवरील अनेक सकस व आशयघन चित्रपटांच्या तुलनेत प्रेमासाठी... फारच कमी पडतो. तद्दन मसालापटाच्या धाटणीत आलेला हा फसवाफसवीचा खेळ पाहून फसायचे की नाही हे तुम्हीच ठरवा.