आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Movie Review Of Marathi Film Punha Gondhal Punha Mujara

Movie Review : पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा गाजल्यानंतर त्याचा हा पुढचा भागही तेवढाच दमदार आहे. विशेषतः मतदान काही दिवसांवर आले असताना पुन्हा गोंधळने उत्तम टायमिंग साधले आहे. यात विनोदातून केलेले राजकारणावरील भाष्य निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. अरविंद जगताप यांची कथा-पटकथा व संवाद, बाळकृष्ण शिंदे यांचे लाभलेले दिग्दर्शन व सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे यांची रंगलेली जुगलबंदी अशी उत्तम भट्टी पुन्हा गोंधळ.. मध्ये जमली आहे. त्यामुळे राजकीय व्यवस्थेतील ढोंगीपणाचा बुरखा टराटरा फाडत पडद्यावर अवतरणारा हा मार्मिक गोंधळ त्यामुळेच त्रिवार मुजऱ्यास पात्र आहे.
कथा -
नारायण वाघ (मकरंद अनासपुरे) आता अपक्ष आमदार झाले आहेत. विश्वास टोपे (सयाजी शिंदे) यांना हा पराभव फारच जिव्हारी लागला आहे. त्यातून हायकमांडची (अलोकनाथ) नजर गावातील जमीनीवर आहे. सीएम मते (विलास उजवणे) यांच्या माध्यमातून नारायण व विश्वास यांचा वापर करत ही जमीन आपल्या भाच्याच्या खाती जमा करण्याचा हायकमांडचा डाव आहे. मात्र नारायणला आता मंत्रीपदाचे वेध लागले आहेत तर विश्वासरावांना आमदारकीचे. त्यातून हे दोघे एकमेकांना शह-काटशह देताहेत. त्यात विश्वासराव आमदार होतात व मंत्रीपदाच्या शयर्तीत येतात. मग नारायण अपक्ष असल्याचा फायदा उठवत आदर्श सिटी घोटाळ्यात सीएम, तसेच टोपेसह अडकतो. मध्येच सेरेनाला (मेलेडिना अलेक्झांड्रा) संत बनवून गावात धुमाकूळ घालतो. नारायणचे मंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण होते का ? टोपेचे शेवटी काय होते? हे सर्व पडद्यावर अनुभवणे उत्तम.
पटकथा-संवाद -
अरविंद जगताप यांनी पटकथा उत्तम बांधली आहे. राजकीय पुढाऱ्यांचा व्यवस्थीत अभ्यास करुन प्रसंगांची पेरणी केली आहे. त्याला उत्तम संवादाची जोड दिली आहे.
गीत-संगीत -
अमितराज यांनी संगीत दिलेली दोन गाणी यात आहेत. दोन्ही गाणी मुजरा या सदरात मोडणारी असून त्यापैकी होऊ द्या खर्च गाजते आहेच, दुसरे राघू पिंजऱ्यात हेही बरे आहे.
अभिनय -
सयाजी शिंदेंनी टोपेंचा आततायीपणा, निष्ठूरता, तोंडावर पडल्यानंतरची अवस्था आपल्या अभिनयातून उत्तम उभे केले आहे. अलोकनाथ, आशिष विद्यार्थी, डॉ. विलास उजवणे, स्वप्नील राजशेखर, सिद्धेश्वर झाडबुके आदींनी उत्तम साथ दिली आहे. खरी मजा आणतो तो मकरंद अनासपुरे. नारायणची व्यक्तीरेखा त्यांनी आपल्या नैसर्गिक अभिनयाने जीवंत केली आहे. नारायणचा बेरकीपणा, मिश्किलता, ढोंगीपणा व आमदारकीचा रूबाब त्यांनी झोकात सादर केला आहे. विशेषतः मकरंद व सयाजी यांचा दारू पिण्याचा प्रसंग अप्रतिम रंगला आहे. त्यातील मकरंदची देहबोली अत्यंत सूचक आहे.
सार-
बरबटलेल्या राजकीय व्यवस्थेवर विनोदी अंगाने प्रकाश टाकण्यात पुन्हा गोंधळ... यशस्वी झाला आहे. आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या पुढाऱ्यांचा खरा चेहरा कसा असू शकतो याचे विविधांगी चित्रण नवमतदारांना बरेच काही सांगून जाणारे आहे. सध्या सुरू असलेल्या राजकीय गोंधळात, थिएटरमध्ये रंगणारा पुन्हा गोंधळ.. एकदा तरी आवर्जून अनुभवण्यासारखाच आहे.