आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मसालाच मसाला... तरीही बेचव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला कडकडून भूक लागली आहे. त्याच वेळी तुमच्यासमोर पंचपक्वान्नांनी भरलेली थाळी आली आणि चार-दोन घासातच तुम्हाला ती बेचव असल्याचे समजल्यावर जे होते, तसेच काहीसे प्रभू देवाचा ताजा आर.राजकुमार पाहिल्यावर होते. प्रभू देवा नृत्यातला मास्टर असला तरी दिग्दर्शनाचा मास्टर बनण्यासाठी त्याला आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. मुळात सकस चित्रपटासाठी आशयघन कथा महत्त्वाची हे या देवाला कुणीतरी सांगायला हवे. शाहिद कपूरला रॅम्बो करण्याचा त्याचा प्रयत्न स्तुत्य असला तरी मायबाप प्रेक्षकांना तो कितपत रुचतो हेदेखील महत्त्वाचे आहे. वाँटेड, राउडी राठोड आणि रमय्या वस्तावय्या चित्रपटानंतर त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र त्याच्यावरचा दाक्षिणात्य चित्रपटांचा प्रभाव कमी होण्याची चिन्हे नाहीत. ‘राजकुमार’मध्ये श्रवणीय (किमान एक आठवडा लक्षात राहतील अशी) गाणी आहेत, नृत्ये आहेत, प्रेम आहे, मारामारी तर पदोपदी आहे, विनोद आहे. असा सारा मसाला ठासून भरला आहे. मात्र त्यात चव टाकायची देवा विसरला की काय असे वाटते.
कथा : मध्य प्रदेशातील माफिया हा कथेचा केंद्रबिंदू आहे. (वा देवा! काय विषय निवडला). शिवराज (सोनू सूद) हा इथल्या अफीम आणि अफूच्या तस्करीचा सम्राट. परमार (आशिष विद्यार्थी) हा शिवराजचा या धंद्यातला प्रतिस्पर्धी. या दोघांचा वचक एवढा की तिसर्‍याला येथे पाय ठेवायचीही हिंमत नाही. रोमिओ ऊर्फ राजकुमार (शाहिद कपूर) हा असाच बेकार तरुण. हाँगकॉँगमधून तस्करी करणार्‍या टिक्काची (श्रीहरी) शिवराजच्या साम्राज्यावर नजर असते. तो राजकुमारला हे साम्राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी पाठवतो. (आले देवाच्या मना.) येथे आल्यावर राजकुमारची भेट परमारची भाची चंदाशी (सोनाक्षी सिन्हा) होते. तो तिच्या प्रेमात पडतो (ये तो होना ही था). आपल्या कर्तृत्वाच्या बळावर राजकुमार शिवराजचा खास माणूस बनतो. (पुन्हा देवाची करणी.) मग शिवराजची नजर चंदावर पडते. (अरेरे! देवा..देवा..) तो परमारच्या हातमिळवणीने तिच्याशी लग्न करू इच्छितो. मग चंदासाठी राजकुमार आणि शिवराज यांच्याच जुंपते. अनेक प्रसंग (खास ‘देवा’टच असणारे.) घडतात. टिक्काही शिवराजशी हातमिळवणी करतो. राजकुमार एकटा पडतो. राजकुमारला त्याची चंदा मिळते का, हे पडद्यावर पाहा. (‘देवा’च्या कृपेने बोअर होऊ नका )
संवाद : पटकथा, पात्रे विजोड असली तरी चटकदार संवादांनी मजा आणली आहे. मेरे जीवन में बस्स दो ही चीजे हैं. प्यार.प्यार या मार. मार किंवा सायलेंट हो जा, नहीं तो मैं व्हॉयलेंट हो जाऊंगा किंवा मेरे मुंह मत लगना, मैं सेहत के लिए बहुत हानिकारक हूँ असे खुसखुशीत संवाद प्रत्येक पात्राच्या तोंडी आहेत.
गीत संगीत : हा प्रभू देवाचा चित्रपट असल्याने गाणी आणि नृत्याला महत्त्व आहे. प्रीतमच्या संगीताने नटलेली गंदी बात, साडी के फॉल सा, मत मारी ही गाणी प्रदर्शनापूर्वीच हिट झाली आहेत. शाहिदकडून उत्तम नृत्य करून घेण्याबद्दल प्रभू देवाचे आभार मानायले हवेत. इतर गाणीही चांगली जमली आहेत. मात्र आयटम साँग रसभंग करणारे आहे. ‘उड गये तोते रे.’ गाण्यात सोनाक्षीच्या साड्या आणि शाहिदचे शर्ट प्रेक्षणीय.
अभिनय : राजकुमार या रॅम्बो स्टाइल भूमिकेत शाहिदने जान ओतली आहे. चॉकलेट हीरोची प्रतिमा मोडण्यासाठी त्याने घेतलेली मेहनत जाणवते. तो नाचलायही बेभान. शाहिदची देहबोली आणि आत्मविश्वास दाद देण्याजोगा. सोनाक्षीने नेहमीच्या टेचात तिची भूमिका साकारली आहे. पण शाहिदची छोटी अंगकाठी आणि सोनाक्षीची उंची यामुळे जोडी अनेकदा विजोड वाटते. त्यामुळे ‘हाइट, वेट, कलर से नहीं, प्यार दिल से होता है’ असे त्याचे स्पष्टीकरणही द्यावे लागले आहे. सोनू सूदने चांगला अभिनय केला आहे. असरानी, आशिष विद्यार्थी नेहमीप्रमाणे उत्तम.
सार : ड्रग माफिया आणि नायक-नायिकेचे प्रेम अशा कथानकाचे ढीगभर चित्रपट दरवर्षी येतात अन् जातात. प्रभू देवाने प्रेम फुलवण्यासाठी असे कथानक कसे निवडले असावे, असा प्रश्न पडतो. बरे नायक-नायिकेचे प्रेम खुलण्यासाठी त्याने पुरेसा वेळही दिलेला नाही. ‘प्यार.प्यार. या मार.मार’ च्या नादात नाच.नाच आणि मार.मारच जास्त झाला आहे. पटकथेवरचे सुटलेले नियंत्रण आणि लांबलेला क्लायमॅक्स यामुळेही जांभया यायला लागतात. चांगली नृत्ये, शाहिद-सोनाक्षी असा मिसमॅच जोडा व खुमासदार संवाद पाहण्याची आणि ऐकण्याची फारच इच्छा असेल तरच राजकुमारची वारी करा..