आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रागिनी एमएमएस 2

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुन्या काळातील भयपटांना विनोदपट म्हणून पाहणार्‍यांकडे पाहून ज्या प्रेक्षकांनी ‘जानी दुश्मन’, ‘बीस साल बाद’, ‘विराना’ हे चित्रपट बघितले असतील त्यांना ‘रागिणी एमएमएस-2’ हा भयपट असल्याचे पटणे शक्यच नाही. चित्रपटात तंत्रज्ञानाचा कितीही आविष्कार वापरण्यात आला तरी, दर्जा त्यावरून ठरत नाही. ‘रागिणी एमएमएस-2’ पाहिल्यानंतर प्रेक्षकांना सध्याच्या तुलनेत जुनेच चित्रपट अधिक भयावह असल्याचे जाणवू लागते. मागच्या दशकभरात राज, मर्डर-2 सारखे काही हॉररपट भाव खाऊन गेले; परंतु ‘13 बी’नंतरचे सिनेमे चित्रपटगृहात हजेरीच लावून जाण्याचे काम करून गेल्याचे जाणवते.
पॉर्न स्टार सनी लियोनला बॉलिवूडमध्ये स्थिरावण्यासाठी प्रयत्न करत असलेली निर्माती एकता कपूर पुन्हा एकदा या चित्रपटाच्या निर्मितीत फसल्याचे जाणवते. 1920- एव्हिल रिटर्न्‍समध्ये थोडाफार भाव खाऊन जाणारा दिग्दर्शक भूषण पटेल या चित्रपटाच्या दिग्दर्शनाच्या भानगडीत का पडला, हा प्रश्न ‘रागिणी एमएमएस-2’ पाहिल्यानंतर सामान्य प्रेक्षकांनाही पडू लागतो. इंटीमेट सीन्स आणि द्वयर्थी वाक्यांनी भरपूर असलेला हा चित्रपट शेवटपर्यंत हॉररपट असल्याचे जाणवतच नाही. बॅकग्राउंड साऊंड हा हॉररपटांचा आत्मा मानला जातो; परंतु या चित्रपटात त्याचा प्रभावी वापरच झालेला नाही.
कथा - रॉक्स (प्रवीण डबास) हा एक अयशस्वी दिग्दर्शक सनी लियोनला (स्वत:) घेऊन ‘रागिणी एमएमएस’चा सिक्वेल बनवत असतो. यासाठी सत्या (साहिल प्रेम) याच्या रागिणीच्या जीवनावरील कथानकाची निवड केली जाते. दरम्यान, डहाणूच्या ज्या बंगल्यात रागिणी एमएमएस कांड घडलेले असते तिथेच सिक्वेलचे चित्रीकरणाचे काम सुरू होते. पहिल्या भागातील रागिणी (कैनाज मोतीवाला) वेड्यांच्या दवाखान्यात दाखल झालेली असते. सनी तिथे रागिणीला भेटायला जाते आणि येथूनच भूतप्रेत, आत्म्यांचा खेळ सुरू होतो. मानसोपचारतज्ज्ञ मीरा (दिव्या दत्ता) रागिणी प्रकरणाचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करत असते. या ठिकाणी काही रंजक गोष्टी घडतात.
अभिनय - चित्रपटात एकही प्रसिद्ध नाव नाही. कामचलाऊ कलाकारांची फौज घेऊन हा चित्रपट बनवण्यात आला आहे. सनी लियोनला अभिनयाचा गंध नसल्याचे जाणवते. हिंदी उच्चार कमकुवत आहेत. त्यात डबिंगही फारसे चांगले नाही. ‘भाग मिल्खा भाग’मध्ये कसदार अभिनय करणारी दिव्या दत्ता सर्वाधिक भाव खाऊन गेली आहे. नवोदित साहिल प्रेमचा अभिनय चांगला आहे.
सारांश- एकंदरीत हा चित्रपट हॉरर आणि प्रौढ चित्रपट म्हणवून घेण्याच्या लायकीचाच नाही. खास सनी लियोनच्या आकर्षणाने चित्रपट पाहायला जाणार्‍या प्रेक्षकांचाही हिरमोड होऊ शकतो. मात्र, यो यो हनीसिंगचा ‘चार बोतल वोडका’ आणि कनिका कपूरने गायलेले ‘बेबी डॉल’ ही गाणी पाहण्याजोगी आहेत. रागिणीची भूमिका साकारणार्‍या कैनाज मोतीवालाने चेटकिणीची भूमिका छान केली आहे.