आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्यांचे पारणं फेडणारी संजय लीला भन्साळी यांची \'राम-लीला\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चौदा वर्षांपूर्वी आलेला ‘खामोशी- द म्युझिकल’ किंवा त्यानंतर दोन वर्षांनी आलेला ‘हम दिल दे चुके सनम’ घ्या, दोन्ही चित्रपटांतून आपला वेगळा ठसा उमटवण्यात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यशस्वी ठरले होते. ‘देवदास’मधून भव्यदिव्य सेट्स आणि मल्टी स्टारकास्टसह प्रेमाचा अनोखा रंग त्यांनी पडद्यावर आणला होता. ‘राम-लीला’मधूनही त्यांनी तो प्रयत्न केला आहे. मात्र भन्साळींच्या याआधीच्या प्रेमकहाण्यांपेक्षा ‘राम-लीला’ वेगळा आहे. कारण यात प्रत्येक पात्राच्या हातात बंदूक आहे. चित्रपटभर रक्ताचे पाट वाहतात आणि त्या पाटात राम आणि लीलाची प्रेमकहाणी फुलत जाते. परंतु, होळीच्या रंगावर रक्ताचा रंग भारी ठरल्याने फारशी मजा येत नाही.
कथा : भारत-पाक सीमेवरील गुजरातच्या एका टोकाला असलेल्या गावात ही कहाणी घडते. या गावात राजडी आणि सानडा या दोन जमाती. या जमातीत 500 वर्षांपासूनचे हाडवैर. राम (रणवीरसिंह) हा सानडा जमातीच्या म्होरक्याचा मुलगा तर लीला (दीपिका पदुकोन) ही राजडी जमातीच्या प्रमुख बा (सुप्रिया पाठक) यांची मुलगी. बंदुकीचा अवैध व्यापार हा सानडांचा प्रमुख व्यवसाय, तर समुद्रमार्गे तस्करी हा राजडींचा प्रमुख व्यवसाय. या गावात कायदा नावाचा भागच अस्तित्वात नाही. हम करे सो कायदा अशी स्थिती. बंदुकीची भाषा हाच न्यायनिवाडाचा मार्ग. एका रंगपंचमीला राम आणि लीलाची भेट होते. पाहताक्षणीच ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. मग चोरून गाठीभेटीतून प्रेम बहरत राहते. मात्र दोन्ही जमातीतील वैर त्यांना सुखाने जगू देत नाही. लीलाच्या भावाकडून रामच्या भावाची हत्या होते. त्याच वेळी लीलाच्या भावाला राम ठार करतो. त्याच रात्री राम व लीला पळून जाऊन लग्न करतात. गावात हिंसाचाराचा आगडोंब उसळतो. रामचे मित्र आणि लीलाचा भाऊ या दोघांना शोधून वेगळे करतात. त्यातच ‘बा’च्या प्रमुखपदावर त्यांचा भाचा भवानीचा डोळा असतो. तो राम-लीलामध्ये गैरसमज घडवतो. ‘बा’वर रामच्या उपस्थितीत हल्ला होतो. नंतर ‘बा’ची जागा लीलाला मिळते, तर राम अगोदरच त्यांच्या जमातीचा डॉन बनलेला असतो. भवानीची कटकारस्थाने चालूच असतात. त्यातून पुढे अनेक प्रसंग घडतात. राम आणि लीलाचे मिलन होते का? दोन जमातीतील वैर कसे संपते ? हे पडद्यावर पाहणे योग्य.
संवाद : बंदुकीच्या टोकावर रंगणार्‍या या प्रेमकहाणीला खरे रंग भरले आहेत ते खटकेबाज, खुसखुशीत संवादांनी. यमक साधणारे कथेला साजेशे संवाद प्रत्येक पात्राच्या तोंडी आहेत.
गीत-संगीत : भन्साळींच्या चित्रपटात संगीताला महत्त्वाचे स्थान असते. राम-लीलाही त्याला अपवाद नाही. यातील ‘नगाडा संग ढोल बाजे’ आणि प्रियांका चोप्रावर चित्रित ‘राम चाहे लीला’ ही गाणी यापूर्वीच लोकप्रिय झालेली आहेत. पूर्वार्धात एकामागे एक येणारी गाणी चांगली झाली आहेत. लहू मुंह लग गया, आग लगा दे, मोर बनी, धूप, तडत तडत आणि इश्किया ढिशक्वाँय ही गाणी श्रवणीय तर आहेतच, ती प्रेक्षणीयही झाली आहेत. संजय लीला भन्साळी व माँटी शर्मा यांच्या संगीताने ही गाणी नटलेली आहेत.
अभिनय : गावातील एका सुंदर तरुणीला पडद्यावर कसे दाखवायला हवे ? याचे उत्तर भन्साळी यांच्या या चित्रपटातून मिळू शकेल. पहिल्याच भेटीत राम-लीला यांचा लिप-लॉक सीन चित्रीत करण्यात आला आहे. कठियावाड येथील लोकांना लीलाच्या रुपात पहिल्यांदाच आपल्या गावातील बोल्ड मुलगी बघायला मिळाली आहे. जी आपल्या प्रियकराबरोबर सेक्स करताना, लाज आणि भीतीला सोडून आपल्या मनाप्रमाणे बिनधास्त वागताना दिसली आहे. चित्रपटात लीलाने आपल्या प्रियकराला उत्तम साथ दिली आहे. दीपिकाने या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत पडद्यावर स्पष्ट झळकते. तिचे नृत्यकौशल्य उत्तम. तिचे हासणे, वावरणे, दिसणे, बोलणे,नाचणे एकदम झकास !
तर रणवीरचे सिक्स पॅक अँब्स एखाद्या जीममध्ये वर्कआऊट करणा-या तरुणाचे वाटत नसून गावातील तरुणाचे वाटतात. लुक्सव्यतिरिक्त आपल्या भूमिकेत मग्न होताना रणवीर दिसतो. या सिनेमानंतर रणवीरची नक्कीच उत्कृष्ट अभिनेत्यांच्या यादीत गणना केली जाईल. ‘बा’च्या भूमिकेचा बाज सुप्रिया पाठक यांनी चांगला वठवला आहे. रिचा चढ्ढा (रसिला), बरखा बिस्त (केसरी), गुलशन देवाह (भवानी) हेही लक्ष वेधतात.
दिग्दर्शन : चित्रपटात भव्यदिव्य सेट उभारणे संजय लीला भन्साळी यांचे वैशिष्ट्य आहे. 'हम दिले चुके सनम' या सिनेमानंतर भन्साळी यांच्या या चित्रपटात पुन्हा एकदा सुंदर फ्रेम्समध्ये तांत्रिकदृष्ट्या केलेली रंगसंगती आणि कलात्मकता याचे अद्भूत मिश्रण करण्यात बघायला मिळते. शानदार सेट, सुंदर गाणी, डान्स सीक्वेन्ससह गावातील नयनरम्य दृश्यं आणि पारंपरिक ढोलताश्यांच्या गजरात थिरकणारी पावलं, हे सर्व नक्कीच बघण्यासारखे आहे. भन्साळी यांची चित्रपट हाताळण्याची पद्धत नक्कीच कुणालाही आवडणारी आहे.
सार - रोमिओ-ज्युलिएटवर आधारित राम-लीला सादर करताना भन्साळींनी बंदुका आणि हिंसाचाराला मुक्त वाव दिला आहे. 'हम दिल दे चुके सनम'मध्ये हळुवार आणि भावनात्मक प्रेमाचा आविष्कार त्यांनी सादर केला होता. राम-लीलामध्ये प्रेमात शारीरिक आकर्षणाला झुकते माप दिले आहे. त्यामुळे काही प्रसंग सवंग झाले आहेत. राम-लीलासाठी 35 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यातील भव्य सेट्स आणि रंगीबेरंगी लोकेशनच्या वापरातून हा खर्च लक्षात येतो.
मात्र या सर्व गुणवैशिष्ट्यांबरोबरच काही खटकणा-या गोष्टीही सिनेमात आहेत. बंदुकांचा आवाज, काही ठिकाणी असलेली अस्पष्टता आणि गरज नसताना असलेला गाण्यांचा भडीमार या गोष्टी खटकणा-या आहेत. सिनेमात भन्साळी यांनी आणखी ड्रामा आणला असता, तर चित्रपट समीक्षकांच्या नजरेतही उत्कृष्ट ठरला असता.