आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Movie Review: Ranveer Singh, Govinda, Parineeti Chopra Movie \'Kill Dill\'

Movie Review: किल दिल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मणिरत्नमचा सहायक म्हणून नाव कमावल्यानंतर दिग्दर्शक शाद अलीने साथिया, बंटी और बबली सारखे चित्रपट दिले. किल दिल मध्ये त्याचीही छाप दिसते. शार्प शूटरची प्रेमकथा हा नव्वदीच्या दशकात घासूनपूसून झालेला विषय किल दिल मधून रंजनाचे चिल (थंडगार) दर्शन घडवतो. गुलजार यांची गीते हे याचे मुख्य वैशिष्ट्य मानावे लागेल. शंकर एहसान लॉय या त्रयीने गुलजार यांच्या गीतांना योग्य तो न्याय दिल्याने किल दिल सुसह्य ठरतो.
कथा :
देव (रणवीर सिंह) आणि टूटू (अली जाफर)ही अनाथ मुले. भैय्याजीने (गोविंदा) त्याचंे पालनपोषण केले आहे. सुपारी घेऊन कोणालाही यमसदनी पाठवणे हा भैय्याजीचा व्यवसाय. देव आणि टुटू हे दोघेही त्याच वातावरणात लहानाचे मोठे झालेले , दोघेही निष्णात शार्पशूटर. भैय्याजींच्या इशारावर कोणालाही उडवणे हा त्यांचा रोजचा खेळ. हा खेळ सुरू असतानाच दि शा (परिणिता चोप्रा) देवच्या जीवनात येते व देवच्या जीवनाला वेगळी दिशा मिळते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात अडकतात. मग देवला हा धंदा नकोसा होतो. तर भैय्याजींना हे पसंत नसते. मग सुरू होतो प्रेम आणि बंदुकीचा खेळ. यात शेवटी अर्थातच प्रेम जिंकते, नेहमीप्रमाणे शेवट गोड होतो.
पटकथा -संवाद :
नितेश तिवारी, श्रेयस जैन आणि निखिल मेहरोत्रा यांनी किल दिलची पटकथा लिहिली आहे. तीन तिघाडा काम बिघाडा अशी एक म्हण आहे. त्याचे प्रत्यंतर यात येते. पटकथा आणखी मुद्देसुद, प्रसंगनिष्ठ,वेगळ्या घटनांची, पंचेसची असती तर किल दिलची उंची वाढली असती. असो, संवाद मात्र खटकेबाज आहेत.
अभिनय :
रणीवर सिंह दिसलाय छान, पण काही प्रसंगात तो लाउड वाटतो. अली जाफर ठीक. परिणिताने तिचा वाटा उत्तम वठवला आहे. गोविंदाने भैय्याजी टेचात सादर केला आहे.
संगीत :
गुलजार यांच्या सिध्दहस्त लेखणीतून उतरलेली गाणी किल दिलला चार चाँद लावतात. शंकर एहसान लॉय या त्रयीने त्याला योग्य न्याय दिला आहे. वेगळ्या चाली, ढब वापरत त्यांनी सुरांची गोडी कमी होऊ दिलेली नाही. किल-दिल, हॅपा बर्थडे, सजदे, बोल बेलिया, स्वीटहार्ट, दैया मैया, बावरा आणि नखरीले अशी गाणी गोडी वाढवतात. यातील अदनान सामीच्या आवाजातले, स्वीटहार्ट आणि नखरिले ही दोन गाणी आधीच लोकप्रिय झाली आहेत.
सार :
गुलजार यांच्या गाण्यात जसे नाविन्य झळकते तसे ते किल दिलच्या पटकथेत, मांडणीत ठळकपणे झळकत नाही. त्यामुळे जुनी बाटली, जुनाच मसाला असा प्रकार समोर येतो. बंदूक आणि प्रेमात चालणारी ही लढाई बॉलिवूडसाठी नवीन नाही. किल दिल नेहमीच्याच पठडीतील एक मसालापट आहे. यावर तुमची मर्जी.