आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'संघर्ष' भरकटलेला अॅक्शनपट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संघर्ष म्हटले की 1999 ला प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमार, आशुतोष राणा आणि प्रीती झिंटा यांच्या 'संघर्ष' चित्रपटाची आठवण येते. शुक्रवारी मराठी 'संघर्ष' प्रदर्शित झाला. मल्टिस्टारर चित्रपट, हिंदीच्या तोडीसतोड अॅक्शन सीन्स असूनही भरकटलेली कथा, कमकुवत पटकथा आणि काही कलावंतांच्या सुमार-ठोकळेबाज अभिनयाने चित्रपट पाहणे म्हणजे प्रेक्षकांचा स्वत:शी 'संघर्ष'च आहे, असे म्हणावे लागेल. रोहित शेट्टीच्या चित्रपटांप्रमाणे धमाल अॅक्शन सिक्वेन्स 'संघर्ष'ची वैशिष्ट्ये आहेत. सुशांत शेलारने वठवलेला विक्षिप्त-विनोदी खलनायक हा मराठीतील नवा प्रकार त्याला शोभणारा आहे. चित्रपटाची कथा तीन जिवलग मित्रांभोवती गुंफण्यात आली आहे. मात्र, त्यांची घट्ट मैत्री दाखवणारा एकही प्रसंग चित्रपटात नाही.
कथा : गुणाजी चाळीत राहणारे भाऊ (राजेश), टवळ्या (अंशुमन) आणि मन्या (नकुल) हे तिघे मौजमस्ती करणारे आणि एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारे (असे निवेदनात म्हटले आहे). भाऊ बॅकबेल्ट चॅम्पियन. भाऊच्या घरात मावशी आणि बहीण राधिका (माधवी). मन्याचे बिजलीसोबत (प्राजक्ता) डान्समध्ये करिअर करण्याचे स्वप्न आहे. टवळ्याचा (अंशुमन) टवाळक्या करणे एवढाच उद्योग. गणेशोत्सवादरम्यान परिसरातील रघुभाईवर टवळ्याने केलेल्या स्किटमुळे रघुभाईचे गुंड आणि या मित्रांची जुंपते. साक्षी (संगीता) एक पत्रकार आहे - भाऊची प्रेयसी आहे. तिला अंडरवर्ल्ड आणि नेत्यांचे संबंध उघडकीस आणायचे असतात. रघुभाई आणि या तिघांचा लढा वाढत जातो. सर्वच यामध्ये ओढले जातात. प्रचंड गुंतागुंत वाढत जाते. पुढे काय होते ते पडद्यावर पाहा.
संवाद : सुशांत शेलार याला दिलेले विक्षिप्त खलनायकाचे संवाद उत्तम वाटतात. इतर पात्रांच्या तोंडी असलेले संवाद मात्र सुमार दर्जाचे आहेत.
अभिनय : सुशांत, अंशुमन यांचा अभिनय दर्जेदार आहे. सुशांतने पहिल्यांदाच केलेली खलनायकी भूमिका विशेष. त्यामानाने अंशुमनला अभिनयाची फारशी संधी नाही. माधवी आणि संगीता यांच्याकडे सौंदर्याशिवाय दाखवणयासारखे काहीच नाही. अतिशय कृत्रिमपणे त्या वावरतात. कलावंताने भूमिकेच्या आत शिरकाव केला तरच भूमिका प्रभावी होते, मग त्याची लांबी थोडी असली तरीही प्रेक्षकांच्या स्मरणात राहते. मात्र, सुशांतशिवाय कुणाचाही अभिनय लक्षात राहण्याजोगा नाही. राजेशने केलेला 'भाऊ' हा उगाचच भरदार आवाज काढण्याचा नादात फाटक्या स्पीकरच्या आवाजासारखा वाटतो. ठोकळेबाज अभिनयाने चित्रपटाची काही कलावंतांनी माती केली.
संगीत : चित्रपटाला पुढे सरकवण्यासाठी पेरण्यात आलेल्या चार गाण्यांपैकी एक आयटम साँग आहे. ज्यात थिल्लरपणा, बेभानपणाशिवाय काहीही नाही. गणेशोत्सवाचे गाणे धमाल असले तरीही प्रत्यक्ष गणेशोत्सवात कुणीही त्याची दखल घेईल असे वाटत नाही. रिअँलिटी शोमधील टस्सल दाखवणारे गाणे बरे आहे. प्रेमीयुगुलांचे एक गाणे लक्षात राहण्याजोगे असले तरी त्यात चित्रीकरणाची कमाल जास्त आहे.
सार : चित्रपटाचा हेतू सामान्य माणूस आणि सिस्टिम यांचा संघर्ष आणि एकजुटीच्या ताकदीतून लढा कसा जिंकता येतो हे दाखवणे होता. तो हेतू पूर्णपणे भरकटला. राजेशकडून करवून घेतलेले अँक्शन सीन्स चित्रपटाची जमेची बाजू असले तरी त्यातून काहीच साध्य झालेले नाही. उत्तम तांत्रिक कौशल्याचा वापर करण्यात आला आहे. चित्रपटातील प्रेमीयुगुलांवर चित्रित गाणे 'द डर्टी पिक्चर' चित्रपटातील 'इश्क सुफियाना' गाण्याच्या धर्तीवर केल्याने चित्रपटाकडून अपेक्षा होत्या. मात्र, ती फक्त नक्कल ठरली. कथा भरकटल्याने दिग्दर्शकाची (साईस्पर्श) पकड सुटली आहे. उत्तम तंत्रकौशल्य, चांगले कलावंत असूनही 'संघर्ष' फारसे समाधान करत नाही.