आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौ. शशी देवधर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक वैविध्यपूर्ण पैलू असलेल्या मनाचा गुंता सोडवणे हे दर वेळी नवे आव्हान असते. मानवी मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञ करत आहेत. हे आव्हान अतिशय सशक्तपणे पेलणारा चित्रपट म्हणून ‘सौ. शशी देवधर’ या चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. सई ताम्हणकरची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट शेवटपर्यंत प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा आहे. अमोल शेटगेने दिग्दर्शक म्हणून केलेली ही कामगिरी नक्कीच दाद देण्यासारखी आहे.
आजवर ग्लॅमरस भूमिकांतून प्रेक्षकांसमोर वावरणारी सई प्रथमच अतिशय सोज्वळ अशा मध्यमर्गीय महिलेच्या भूमिकेत दिसते. प्रेक्षकांची उत्सुकता क्षणोक्षणी वाढवणारा हा चित्रपट, रहस्य उलगडल्यानंतर सुन्न करणारा आहे. नावापासूनच उत्सुकता वाढवणारा हा चित्रपट कुटुंब हरवलेल्या बाईची कथा मांडणारा आहे. शेवटी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचे किती पदर असू शकतात हे यातून दाखवण्यात दिग्दर्शकाला यश आले आहे. मनाच्या कोपर्‍यात घटना, विचार दाबून ठेवल्यास काय होऊ शकते याचा संदेशही चित्रपटाने दिला आहे.
कथा : डॉ. अजिंक्य वर्तक (अजिंक्य देव) एका पावसाळी रात्री मित्रांसोबत जेवायला घराबाहेर पडतो. एक बाई कारला धडकते. ते तिला दवाखान्यात दाखल केल्यावर ती स्वत:चे नाव सौ. शुभदा शशी देवधर सांगते. पोलिस आणि डॉ. अजिंक्य, शुभदाला तिने सांगितलेल्या पत्त्यावर घेऊन जातात. पण तिथे पती शशी देवधर (तुषार दळवी) आणि मुलगी अनुष्काचा पत्ताच नसतो. डेझी फर्नांडिस नावाची महिला तिथे गेल्या 6 वर्षांपासून राहत असते. त्यानंतर पोलिसांनी वृत्तपत्रात दिलेली जाहिरात पाहून निखिल ठाकूर नावाचा माणूस तिचा पती म्हणून येतो. मात्र, शुभदा ऐकायलाच तयार नसते. तेव्हा तिला काहीतरी मानसिक आजार असल्याचे डॉ. अजिंक्यच्या लक्षात येते आणि मग एक एक कोडे उलगडत जाते. सुन्न करणारी ही कहाणी मनाचे बारकावे, कोवळ्या मानसिकतेची बाजू आणि गंभीर अत्याचार झाल्यास काय होऊ शकते हे मांडणारी होती.
संवाद : चित्रपटाचे संवाद हे सहजरीत्या प्रेक्षकांच्या मनात उतरतील असे आहेत. कौस्तुभ सावरकरने लिहिलेले संवाद कृत्रिम नसल्याने त्यात नाटकीपणा जाणवत नाही.
अभिनय : सई ताम्हणकरचा अभिनय सशक्त असल्याने तिने शुभदा देवधर शेवटपर्यंत जिवंत ठेवली. तिच्या अभिनयात निरागसपणा, परिस्थितीच्या गुंत्यात पूर्णपणे अडकलेली महिला आणि गंभीर अत्याचार सहन करणारी सोशिकता उत्कटरीत्या प्रकट झाली आहे. तुषार दळवी आणि अजिंक्य देव यांचा अभिनय चित्रपटाला पुढे नेण्यात महत्त्वाचा ठरला आहे. इतर कलावंतांचा अभिनय सर्मपक आहे. शिल्पा शिरोडकर रणजितची मुलगी अनुष्का हिने या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच रुपेरी पडदा अनुभवला असला तरीही अतिशय उत्तमपणे भूमिका साकारली आहे.
संगीत : टी.बी. पारीख यांचे संगीत असलेल्या या चित्रपटातील गाणी आशयघन आहेत. अश्विनी शेंडे आणि आशिष कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ‘हाती तुझे गंध याचे, श्वासांनी थांबून जावे.. आपुल्या जुन्या ओळखीला नवेसे रंग चढावे’ हे गाणे महालक्ष्मी अय्यर यांनी गायले आहे. विचार करायला लावणारी गाणी आणि साजेसे संगीत चित्रपटाची जमेची बाजू आहे.
सार - चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे, या विधानाला हा चित्रपट सर्मपक आहे. सई ताम्हणकर वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे, सोबतच तिच्या अभिनयातील सशक्तपणाही यात जाणवतो. पटकथेवर प्रचंड मेहनत घेतली असल्याने चित्रपट एक सेकंदही भरकटत नाही. मोजक्याच लोकेशन्स, साधेपणाचा वापर करून महत्त्वपूर्ण विषय सोपा करून प्रेक्षकांच्या गळी उतरवला आहे. वंशाच्या दिव्यासाठी महिलांवर होणार्‍या अत्याचाराचे भीषण वास्तव यातून मांडले आहे. तर मानवी मनाचा वेध घेत एक वेगळा विषय समाजापुढे यातून मांडला आहे.