आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शादी के साइड इफेक्ट्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विवाह हा दोन मनांचे मिलन साधणारा सोहळा. भारतीय समाजात विवाह संस्थेला मोठा इतिहास आहे. आपल्या संस्कृतीत विवाहाचे बंधन काटेकोरपणे पाळले जाते. मात्र, काळ बदलला. जीवन धकाधकीचे बनले. काळानुरूप पती-पत्नीच्या या मंगल नात्यात अनेक ताणतणाव दिसून येत आहेत. व्यक्तिस्वातंत्र्याचा उदो उदो होत असल्याने अनेक शतकांपासून अभेद्य असणारी ही सामाजिक संस्था एका वेगळ्या वळणावर आली आहे काय, असा प्रश्न समाजधुरीणांना सतावतो आहे. ‘नव्याचे नऊ दिवस’ या म्हणीचा प्रत्यय लग्नाचे काही दिवस अनुभवल्यानंतर नवदांपत्याच्या संसाराला सुरुवात होते. नवरा-बायकोतल्या कुरबुरी, रुसवेफुगवे, भांडणे आणि पुन्हा गुण्यागोविंदाने नांदणे हा रुटीन होऊन बसतो. यावरच दिग्दर्शक साकेत चौधरीचा ताजा ‘शादी के साइड इफेक्ट’ हा चुरचुरीत भाष्य करणारा चित्रपट आहे. ‘प्यार के साइड इफेक्ट’नंतर विद्या बालन आणि फरहान अख्तर या नव्या जोडीसह अवतरलेला हा चित्रपट रटाळ गतीमुळे आणि पोकळ पटकथेमुळे फारसा परिणाम साधत नाही.
कथा : सिद रॉय (फरहान अख्तर) आणि त्रिशा मलिक (विद्या बालन) या नवरा-बायकोंची ही कथा आहे. लग्नानंतरचे नव्याचे नऊ दिवस संपल्यानंतर वैवाहिक नाते सातत्याने फ्रेश राहावे यासाठी हे जोडपे अनेकदा अनोळखी असल्याप्रमाणे भेटत असते, त्यानुसार वागत असते. त्यातच नव्या पाहुण्याची चाहूल त्यांच्या घरात लागते. तेथून या दोघांच्या वैचारिक गोंधळाला सुरुवात होते. आपण पिता म्हणून चांगली जबाबदारी निभावू का, असा प्रश्न सिदला सतावत असतो, तर आई झाल्यानंतर आपण अपत्य आणि पती यांच्याकडे पुरेसे लक्ष देऊ शकू का, असा गोंधळ त्रिशाच्या डोक्यात असतो. अशा स्थितीत गोंडस मुलगी त्यांच्या घरी जन्माला येते. त्यानंतर त्रिशाचे सर्व लक्ष तिच्या पालनपोषणाकडे लागते. सिद स्वत:ला एकटे समजू लागतो.
त्यातून तो त्याच्या साडूला (राम कपूर) आदर्श पिता-नवरा होण्याचे सूत्र विचारतो. त्याच्या सांगण्यानुसार वागत राहतो व घरच्या सर्व जबाबदार्‍या विसरतो. मग सिद आणि त्रिशातील अंतर वाढत जाते. शेवटी ते दोघे आदर्श पती-पत्नी कसे बनतात, हे पडद्यावर पाहणे जास्त चांगले.
संवाद- पटकथा : दिग्दर्शक साकेत चौधरी यांनीच कथा लिहिली आहे. पटकथेत फारसा दम नाही. नवरा-बायकोचे नाते उलगडून दाखवणारे काही प्रसंग चांगले जमले आहेत. मात्र, पटकथेला वेगच नाही. संथ गतीमुळे वैताग येतो. प्रत्येकाच्या घरात दररोज घडणार्‍या प्रसंगांची मांडणी आणखी सशक्तपणे करायला हवी होती. ती व्यवस्थित न झाल्यामुळे चित्रपट रेंगाळतो. कौटुंबिक कथेला पडद्यावर आणताना त्यात नाट्य असणे आवश्यक असते. घटना, प्रसंगांची मांडणी प्रेक्षकांना बांधून ठेवणारी हवी. नेमका त्याचा अभाव जाणवतो. पूर्वार्धातील काही संवाद हशा वसूल करतात.
गीत-संगीत : प्रीतमच्या संगीताने नटलेली दोन-तीन गाणी आहेत. मात्र, थिएटरबाहेर पडल्यानंतर ती लक्षात न राहणारी आहेत.
अभिनय : विद्या बालन आणि फरहान अख्तर यांचा हा चित्रपट आहे. विद्या बालन आता फार जाड दिसते. तिने अभिनय मात्र चांगला केला आहे. पती आणि मुलगी यांच्यामध्ये अडकलेली पत्नी आणि आई ही तारेवरची कसरत तिने चांगली व्यक्त केली आहे. फरहानने सिद चांगला वठवला आहे. मात्र, भावनिक प्रसंगांत तो कमी पडतो. रती अग्निहोत्री बर्‍याच दिवसांनी पडद्यावर दिसली आहे. हीच का ती ‘ एक दुजे के लिए’मधली सपना, असा प्रश्न पडावा इतपत ती जाडजूड झाली आहे. राम कपूर, इला अरुण यांनी त्यांच्या भूमिका समरसून केल्या आहेत.
सार : संसाराच्या भवसागरात नवरा-बायकोच्या कुरबुरी प्रेक्षकांसाठी नव्या नाहीत. मात्र, त्या ज्या खुबीने मांडायला हव्या होत्या, तशी मांडणी नसल्याने फार मजा येत नाही. नव्या पिढीच्या पती-पत्नींत कशा प्रकारे नाते असू शकते, ते कसे डेव्हलप करावे, हे सांगायचा प्रयत्न असला, तरी तो फारसा इफेक्ट साधत नाही. टीव्हीवर सासू-सुनेच्या नात्यावरील मालिका बनवणे वेगळे आणि पडद्यावर नवरा-बायकोचे नाते उलगडून दाखवणे वेगळे. हा फरक ज्या वेळी एकता कपूरच्या लक्षात येईल, त्या वेळी तिचे असे चित्रपट खरा इफेक्ट साधतील. एवढे सगळे पुराण सांगितल्यावर आता तुम्ही काय करायचे हे आवर्जून सांगायला हवे का?