आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: \'तप्तपदी\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पती-पत्नीच्या नात्यातील भावबंध आणि मोहमयी जादूच्या वास्तवाची कहाणी मांडणारा ‘तप्तपदी’ चित्रपट ! वीणा जामकरचा दर्जेदार अभिनय, अप्रतिम तंत्रकौशल्य आणि छायाचित्रण असलेला हा चित्रपट. दिग्दर्शनातील पहिलाच प्रयत्न आणि रवींद्रनाथ टागोरांसारख्या महान साहित्यिकाच्या साहित्यकृतीला घातलेला हात, मात्र पेलला नाही. मूळ ‘दृष्टिदान’ या रवींद्रनाथांच्या कथेवर बेतलेला हा चित्रपट, कमकुवत पटकथेमुळे अनेकदा लय सोडतो.
कथा : बालवयात आई गेल्याने आत्याघरी राहायला आलेली मीरा ही चुणचुणीत पोर. आत्येभाऊ, माधवचीच स्वप्ने लहानपणापासून पाहणारी. माधवही मीराचा सखा-सोबती. पुण्यात वैद्यकीय शिक्षण घेणारा. माधव-मीरा विवाहबद्ध होतात. बाळाची चाहूल लागते. मात्र, बाळ जन्मण्याआधीच जगाचा निरोप घेते. हवापालटासाठी दोघे पुण्यात येतात. मीराला डोळ्यांची अॅलर्जी होते. माधव उपचार करतो. मीराचा भाऊ विनायक, माधव अजून डॉक्टर झाला नसल्याची जाणीव करून देतो. अहंकार दुखावलेला माधव आपल्याच इलाजावर ठाम राहतो. मात्र मीराला अंधत्व येते. यासाठी आपणच जबाबदार असल्याची सल माधवच्या मनात राहते. अपराधबोध माधवला अस्वस्थ करतो. हे दांपत्य सातार्‍याला वास्तव्याला येते. याच वेळी सुनंदा त्यांच्या जीवनात येते. सुनंदाच्या येण्याने मीरा अस्वस्थ होते. माधव सुनंदाकडे आकर्षिला जातोय, या भावनेने ती खचू लागते. पुनर्विवाहाच्या जाणिवेने मीराच्या काळजाचा ठोका चुकतो. नवर्‍याला जाब विचारल्यानंतर, दोघेही एकमेकांच्या भावना जाणून अंतर्मुख होतात. सहजीवनाचा अर्थ तपश्चर्येनंतर दोघांना कळतो. सुनंदा मीराच्या भावना जाणते आणि मीराचा भाऊ विनायकशी विवाहबद्ध होते.
संवाद : चित्रपटातील संवाद अतिशय चपखल आहेत. काळाला साजेसे संवाद असल्याने सर्वच पात्रे जिवंत वाटतात.
अभिनय : वीणा जामकर या गुणी अभिनेत्रीचा दर्जेदार अभिनय चित्रपटभर गारुड करतो. तिने बाजी मारली आहे. सुरुवातीला रंगवलेली देखणी मीरा आंधळेपणातही भाव खाऊन जाते. नवर्‍याला पूर्णपणे समर्पित मीरा त्याला देवाप्रमाणे पुजते, जिवापाड प्रेम करते. मात्र, सुनंदाच्या येण्याने अस्वस्थ झाल्यावर ‘शपथेवर नवरा बांधता येतो?’ असा सवाल करून सर्वांनाच अंतर्मुख होऊन विचार करायला लावते. नीना कुलकर्णीने वठवलेली दुर्वाआत्या चपखल. कश्यप परुळेकर कच्चा असल्याचे जाणवते.
संगीत : उमदा गीतकार वैभव जोशीने लिहिलेली गाणी काळाला साजेशी आहेत. अर्थपूर्ण, आशयसंपन्न गाणी आणि सावनी शेंडेच्या आवाजाची त्याला मिळालेली जोड चित्रपटाचा आत्मा आहेत. रोहित नागभिडे, सुमीर बेल्लारी यांनी दिलेले संगीत 1930-40 च्या काळाला साजेसे आहे. ‘ही गर्द अमावस नाही’ आणि ‘कुठवर तू सोबत ’ ही गाणी श्रवणीय आहेत.
सार : दर्जेदार कथा, मात्र पटकथेत महत्त्वाचा जागा सुटल्या आहेत. सचिन यांनी रवींद्रनाथांच्या कथेचे शिवधनुष्य घेतले असले तरीही ते म्हणावे तसे पेलले नाही. संगीत उत्तम आहे. चित्रीकरण, तांत्रिक कौशल्य दर्जेदार आहे. समीक्षक, रसिक एक कलाकृती म्हणून पाहतील. मात्र प्रेक्षकांना हवा असलेला मनोरंजनात्मक आशय यामध्ये नाही. संजय लीला भन्साळीसारख्या दिग्दर्शकाचे भव्यदिव्य महत्त्वाकांक्षी प्रयोग फसले, तसाच हा मराठीतील भव्यदिव्य फसलेला प्रयत्न आहे. वीणा जामकर, चित्रणकौशल्य वगळता प्रेक्षकांना खिळवून ठेवता येईल असे चित्रपटात फार काही नाही.