आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेक्षकच क्लीन बोल्ड !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सयाजी शिंदेसारख्या दिग्गज अभिनेत्याची भूमिका असलेला चित्रपट पाहणे प्रेक्षकांसाठी पर्वणीच असते. त्यात सध्या संपूर्ण विश्वाला तेंडुलकर फीव्हर चढलेला असताना ‘तेंडुलकर आऊट’ हा सिनेमा येणे हे प्रेक्षकांसाठी सुखद असले तरीही मनोरंजनाच्या खेळीत हा सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षांना क्लीन बोल्ड करतो.
सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीमुळे संपूर्ण विश्वाची नजर त्याच्याकडे लागली आहे. त्यात या सिनेमाचे नाव ‘तेंडुलकर आऊट’ असल्याने क्रिकेट रसिक आणि प्रेक्षक असा दुहेरी फायदा घेता येईल, असा दिग्दर्शकाचा अंदाज असावा. तेंडुलकर हे नाव वगळता सिनेमाचा आणि सचिनचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. विनोद, थरार, मानवी भावना अशा कुठल्याही बाजूने प्रेक्षकांना आकर्षित करण्यात सिनेमा अयशस्वी ठरला आहे. नीलम शिर्के, अतुल परचुरे, संतोष जुवेकर, सई ताम्हणकर, अनिकेत विश्वासराव अशी तगडी कलावंत मंडळी असूनही पटकथा, कथा संवाद यात दम नसल्याने सिनेमा सर्वार्थाने अपयशी ठरतो. वास्तविक, गेल्या दोन वर्षांपासून हा सिनेमा रखडला होता; पण सचिनच्या निवृत्तीचा फायदा सिनेमाला होईल या उद्देशाने तातडीने प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या पदरात मायबाप प्रेक्षक किती माप टाकतात याबाबत शंका आहे.
कथा: सिनेनिर्माता असलेल्या तेंडुलकरचे (सयाजी शिंदे) अनेक अभिनेत्रींशी विवाहबाह्य संबंध असतात. बायको सुनंदा (नीलम शिर्के) आणि तो सचिनचे चाहते. सुनंदाचे अफेअर धनुशी (अतुल परचुरे) आहे. सुनंदाचे डिलिव्हरीचे दिवस पूर्ण होत आलेले असतात आणि सचिनच्या वाढदिवशीच मुलगा जन्माला यावा अशी दोघांची इच्छा. तेंडुलकर सिनेनिर्मितीसाठी अंडरवर्ल्डकडून पैसा घेत असतो. एकामागे एक सिनेमे अपयशी ठरल्याने तो कर्जबाजारी होतो. अंडरवर्ल्ड डॉन त्याला पैशांसाठी मारून टाकण्याची सुपारी नायर (संतोष जुवेकर), अब्बास (विजय मौर्य) आणि लेफ्टी (अनिकेत विश्वासराव) यांना देतो. एका रात्री हे तिघे तेंडुलकरला मारण्यासाठी निघतात. रात्रीच्या वेळी तेंडुलकर अभिनेत्री आणि त्याची प्रेयसी असलेल्या वेल्वेटला (सई ताम्हणकर) भेटण्यासाठी पबमध्ये जातो. तिथेच त्याचा गेम करायचा असतो, पण या तिघांना ते जमते का? याची ही कहाणी आहे.
अभिनय : ‘साऊथ’मध्ये ज्याच्या अभिनयाचा डंका आहे, असा सयाजी शिंदे आणि इतरही तगडी स्टार कास्ट असतानाही अभिनयाची बाजू फारशी जमली नाही. कलावंतांना अभिनय करण्यास वाव मिळेल, असे प्रसंग सिनेमात नाहीत. त्यामुळे प्रतिभेचे कलावंत असतानाही अभिनय सुमार आहे. नीलम शिर्केने ओव्हरअँक्टिंग केली आहे.
संवाद : सिनेमात लक्षेवधी ठरेल असा एकही संवाद नाही. मुळात कथा प्रेक्षकांना बांधून ठेवणारी नाही तसेच संवादही मुंबई स्टाइल आणि फारसे भावनिक, विनोदी नाहीत. त्यामुळ प्रेक्षक संवादांशी जोडला जात नाही.
संगीत : तृतीय दर्जाचे आहे. संपूर्ण सिनेमात एकच गाणे आहे, तेदेखील हिंदी भाषेत आहे. पबमध्ये चित्रित करण्यात आलेले गाणेही सुमार आहे.