आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: \'टू स्टेट्स\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाच वर्षांपूर्वी चेतन भगत यांचे '2 स्टेट्स' नावाचे पुस्तक फार गाजले होते. आयआयएमचे शिक्षण घेत असताना एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या, दोन भिन्न संस्कृतीत वाढलेल्या या प्रेमवीरांची प्रेमकहाणी त्या वेळी तरुणाईत विशेष गाजली होती. आजही त्याची चर्चा कॉलेज कॅम्पसमध्ये होत असते. कॉफी पिता पिता आपल्या करण बाबाच्या डोक्यात हा विषय शिरला. त्याने त्यावर चित्रपट काढायचा ठरवला. जोडीला साजिद नाडियादवाला होताच. त्यांनी अभिषेक वर्मन या दिग्दर्शकाकडे हा विषय सोपवला. त्याने '2 स्टेट्स' नावानेच तो चित्रित केला आणि शुक्रवारी तो पडद्यावर झळकला. आई-वडील, पती-पत्नी, मुलगा-आई, बाप-लेक, प्रियकर-प्रेयसी, सासू-सासरे, जावई आणि सून या नात्यांची वीण उलगडून दाखवणारा 2 स्टेट्स दोन भिन्न संस्कृती, पंथ, त्यातील रीतिरिवाज यावरही प्रकाश टाकतो. चेतन भगतच्या पुस्तकाचा टीजी लक्षात घेऊन '2 स्टेट्स'चा बाज विणण्यात आला आहे. मूळ कादंबरीत फारसे बदल न करता तो पडद्यावर मांडण्यात आला आहे.
कथा : क्रिश मल्होत्रा (अर्जुन कपूर) आणि अनन्या स्वामिनाथन (आलिया भट) हे दोघे अहमदाबादेतील आयआयएम कॉलेजात शिकत असतात. शिकता-शिकता ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. क्रिश पंजाबचा तर आलिया तामिळनाडूतील कर्मठ ब्राम्हण कुटुंबातील. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या प्रेमवीरांच्या लग्नात अडथळा येतो तो दोघांच्याही कुटुंबांचा. क्रिशची आई कविता (अमृता सिंग) पंजाबी संस्कृतीचा अभिमान असणारी, त्याला चिकटून राहणारी. अनन्याची आई राधा (रेवती) आणि वडील शिव (शिवकुमार सुब्रमण्यम) हे दाक्षिणात्य कुटुंब, शाकाहार, सर्व रीतिरिवाज व्यवस्थित पाळणारे. मग या प्रेमवीरांचा लग्न जुळवण्यासाठीचा आटापिटा सुरू होतो. पालकांना खुश करूनच यांना लग्नाच्या बोहल्यावर चढायचे असते. त्यातून मग दोन्ही संस्कृतींच्या मिलनासाठीची धडपड, त्यात क्रिशचे वडील विक्रम (रोनित रॉय) यांनी बजावलेली भूमिका यामुळे शेवट गोड होतो.
संवाद- पटकथा : मुळात चेतन भगतच्या कादंबरीचे हे पडद्यावरील रूपांतर आहे. त्यात फारसा बदल केलेला नाही. संवाद हलकेफुलके, प्रसंगानुरूप रचलेले आहेत. सहा प्रमुख व्यक्तिरेखा आहेत. प्रत्येक व्यक्तिरेखेचा स्वभाव योग्य रीतीने विकसित करण्यात आला आहे.
गीत- संगीत : पाच-सहा गाणी आहेत. शंकर एहसान लॉय यांच्या संगीताने ती नटली आहेत. मस्त मगन, इसकी उसकी ही गाणी बरी जमली आहेत.
अभिनय : लेखक होण्याची इच्छा असणारा आयआयएमचा विद्यार्थी ते आईचा प्रेमळ मुलगा व प्रियकर असा प्रवास असणारा क्रिश अर्जुन कपूरने संयमाने साकारला आहे. बर्‍याच दिवसांनंतर पडद्यावर आलेल्या रेवती आणि अमृता सिंग धमाल आणतात. खरी मजा आणते ती अनन्या अर्थात आलिया भट. 'हायवे'मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेणार्‍या आलियाने '2 स्टेट्स'मध्ये मॉर्डन विचारांची व संस्कृती जपणारी मुलगी ते प्रेयसी ही भूमिका आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयरंगाने चांगली फुलवली आहे.
सार : चेतन भगत यांच्या जीवनावर आधारित 2 स्टेट्स काही तरुणांना तोंडपाठ आहे. आयआयएमचा चकचकीतपणा, तेथील विद्यार्थी जीवन, तेथे तनमनधनाने फुलणारे नायक-नायिकेचे प्रेम, गाणी, मस्ती आणि नंतर सुरू होणारा नात्यांचा शोध हे सर्व भावनिकदृष्ट्या खिळवून ठेवणारे असले तरी चित्रपटाचा संथ वेग आणि लांबलेला शेवट रसभंग करतो. राजकीय आखाड्यात नात्यांवरील चिखलफेक रंगलेली असताना रुपेरी पडद्यावरील हा नात्यांचा प्रवास एन्जॉय करायला काहीच हरकत नाही.