आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Movie Review: Yashwantrao Chavan bakhar Eka Vadlachi

उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची धगधगती जीवनकहाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिमालयाच्या पाठीशी सह्याद्री भक्कमपणे उभा आहे, असे ठणकावून सांगत चिनी हल्ला परतवून लावणारे खंबीर संरक्षणमंत्री आणि संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ‘यशवंतराव चव्हाण’ यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भारावून टाकणारा प्रवास मांडणारा चित्रपट ‘यशवंतराव चव्हाण-बखर एका वादळाची’ शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची धगधगती जीवनकहाणी असलेला हा चित्रपट प्रत्येक मराठीजनाने पाहावा असा आहे.
मातब्बर दिग्दर्शक जब्बार पटेल आणि अभिनेता नाना पाटेकर यांच्या दृष्टीतून उलगडलेल्या ‘कृष्णाकाठ’चा हा प्रवास अद्वितीय अनुभव देतो. कराडसारख्या छोट्याशा गावातून समाजसेवेची सुरुवात करणार्‍या यशवंतरावांनी संरक्षण मंत्रालयाची सूत्रे स्वीकारण्यापर्यंत मारलेली मजल मराठी मनाची मान उंचावते. जुन्या व्हिडिओंचा वापर, वृत्तपत्रांतून बोलणारे आचार्य अत्रेंचे व्हिडिओ आणि रेखाटनांतून बोलणारे नेते, विचारवंत अशी चित्रपटाची आखणी असाधारण आहे. ज्येष्ठ पत्रकार अरुण साधूंची सशक्त पटकथा आणि संवाद चित्रपटाचा आत्मा आहेत. अशोक लोखंडे, ओम भुतकर यांनी अभिनयातून जिवंत केलेले यशवंतराव चित्रपटभर वावरताना खोलवर रुतून बसतात.
संवादफेकीतून विचारांची स्पष्टता, दूरदृष्टीतून भविष्याचा वेध हे देहबोलीतून उभे करण्याचे तंत्र दिग्दर्शकाने कलावंतांकडून अचूक करवून घेतले. इंदिरा गांधींसोबत खटके उडाल्यावर यशवंतरावांची राजकीय अस्वस्थता पडद्यावर पाहून आपणही अस्वस्थ होतो. इतके बलाढय़ व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राच्या मातीत जन्मले या अभिमानाने प्रेक्षकांना गहिवरून आल्याशिवाय राहत नाही.
कथा : एवढया उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची पडद्यावर मांडणी करण्याचे शिवधनुष्य साधूंनी ताकदीने पेलले आहे. यशवंतरावांच्या जीवनातील प्रत्येक बारकावा त्यांनी अचूकपणे मांडला आहे. काँग्रेस श्रेष्ठींविषयी निष्ठा आणि सर्मपणाच्या भावनेमुळे पंतप्रधानपदाची लालसा न बाळगण्याचा संस्कार त्यांच्यावर झाला नव्हता, असा पैलूही यात उलगडला आहे. पत्नीला कधीही मूल होऊ शकणार नाही, ते कळल्यावरही एकपत्नीत्व पाळणार्‍या या नेत्यांचे आगळेवेगळेपणही संवेदनशीलतेने, प्रवाहीपणे आले आहे.
संवाद : प्रत्येक संवाद भारावून टाकणारा आहे. सर्व व्यक्तिरेखांचे संवाद त्यांच्या प्रदेशानुरूप लहेजा असलेले आहेत. यशवंतरावांच्या संवादातूनही त्यांचे व्यक्तिमत्त्व उलगडण्यात साधू यशस्वी झाले आहेत.
अभिनय : यशवंतरावांचे तरुणपणीचे कर्तृत्व दाखवणारा ओम भुतकर आणि द्रष्ट्या नेत्याचे विचारीपण दाखवणारे अशोक लोखंडे यांनी अतिशय चपखल अभिनय करत, खर्‍या यशवंतरावांना आपण भेटत असल्याचा अनुभव दिला आहे. आत्मकथनात्मक असलेल्या या चित्रपटाचा प्रवास क्षणोक्षणी पुढे नेण्याचे काम निवेदकाच्या भूमिकेतून नाना पाटेकरने गोळीबंद आवाजात केले आहे. यशवंतरावांच्या पत्नी वेणू यांची तरुणपणीची भूमिका साकारणारी लुब्ना सलीम, वैशाली दाभाडे तसेच विठाबाईच्या भूमिकेतील मीना नाईक यांचा अभिनयही लक्षवेधी.
संगीत : आनंद मोडक यांचे परिपूर्ण संगीत चित्रपटाला अधिक उंचीवर नेऊन ठेवणारे आहे. यशवंतराव चव्हाणांना असलेली शास्त्रीय संगीताची आवड लक्षात घेता चित्रपटातील 16 गाणी गुंफण्यात आली आहेत. प्रसंगानुरूप असलेल्या गाण्यांमध्ये अतिशय गहन अर्थ दडलेला आहे. राग ‘पुरिया कल्याण’ची झलक, कुमार गंधर्वांची बंदिश अतिशय अचूकरीत्या पेरली आहे. यशवंतरावांच्या अखेरच्या काळातील त्यांच्या मनातील उत्कट भाव दाखवताना बेगम अख्तर यांनी गायलेली ‘उलटी हो गई सब तस्वीरें..आखिर काम तमाम किया’ ही ओळ हळवी करून जाते. आरती अंकलीकर, नंदेश उमप यांची गाणी र्शवणीय आहेत. ना. धों. महानोर, कुसुमाग्रज, विठाबाई चव्हाण यांची आशयघन गाणी चित्रपटाला संपन्न करणारी आहेत.
सार : दिल्लीच्या राजकीय तख्तावर बेजोड कामगिरी करणार्‍या आणि महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या नेत्याला अनुभवण्याची संधी चित्रपटातून नव्या पिढीसाठी जब्बार पटेलांनी दिली आहे. प्रत्येक व्यक्तीने विशेषत: तरुणाईने आवर्जून पाहावी, अशी ही परिपूर्ण कलाकृती आहे. दमदार पटकथा, सर्मपक दिग्दर्शन, परिपूर्ण अभिनय आणि साजेसे संगीत अशा सर्वच बाबी चित्रपटात जुळून आल्या आहेत.