आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: कँडल मार्च

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काळ कुठलाही असला, तरीही महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण कमी झालेले नाही. शिक्षणामुळे चित्र पालटेल, असा आशावाद फोल ठरला आहे. कुटुंबात आणि घराबाहेर होणाऱ्या अत्याचारांच्या जखमा फक्त शारीरिक नसून मानसिक आणि सामाजिक आहेत. त्यांचा मागोवा घेत समाजाने एक पाऊल पुढे टाकण्याची प्रेरणा देणारा ‘कँडल मार्च’ चित्रपट प्रशंसनीय आहे. यातील अनेक प्रसंग मनावर कोरले जातात. विषण्ण मनाने प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर पडतो. हीच ‘कँडल मार्च’ची ताकद आहे.
जळगाव वासनाकांड, कार्यालयात वरिष्ठाकडून होणारे लैंगिक शोषण, पतीकडून होणारा बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या वेगवेगळ्या पैलूंवर समर्पक भाष्य करणारा हा चित्रपट आहे.
पुुरुषाचा स्पर्श आणि नजर प्रत्येकीच्या लक्षात येते, मात्र वेळीच त्यावर अचूक पाऊल उचलण्याची सामाजिक मानसिकता आपल्याकडे नाही. अशा वेळी महिलेच्या पाठीशी कुणी उभे राहत नाही. त्यामुळे महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण समाजात वाढले आहे, हे यामध्ये मांडण्यात आले आहे. दिग्दर्शक सचिन दरेकर यांनी महिलांवरील अत्याचार आणि त्यानंतरची समाजाची मानसिकता याची अचूक गुंफण केली आहे. अत्याचार सहन करताना गळचेपी कुठे, कशी होते, त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणत्या बाबी बदलायला हव्यात, ज्या सहज बदलता येण्याजोग्या आहेत, ही उत्तरेही त्यांनी दिली आहेत. पटकथा उत्तमपणे लिहिल्याने प्रत्येक वेगवेगळी कथा अलगदपणे जोडता आली आहे. चित्रीकरण वास्तववादी आहे. सर्वांचे अभिनय कथेच्या मागणीप्रमाणे आजूबाजूला वावरणाऱ्यांप्रमाणे असल्याने आपली कथा वाटते.
कथा:
सादिकनावाचा टॅक्सी ड्रायव्हर आणि त्याची पत्नी यांच्यापासून कथेची सुरुवात होते. कायम दारूच्या व्यसनात, पत्नीवर वाटेल तेव्हा येऊन बळजबरी करणारा हा माणूस, ती मात्र कर्तव्य म्हणत सर्वकाही मुकाट सहन करते. एका वृत्तवाहिनीत काम करणारी विद्या, तिचा बॉस अभिजित पठारे तिच्यावर वाईट नजर ठेवून असतो. अशा ठिकाणी काम करणे दिवसेंदिवस तिच्यासाठी कठीण होत जाते. नोकरी सोडून देण्यासाठी नवरा दबाव टाकू लागतो; पण विद्याला ते मान्य नसते.
इकडे एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून जळगावची प्रा. अनुराधा जोगळेकर येते. त्याच महाविद्यालयातील एक मुलगी सखीवर सामूहिक बलात्कार होतो. अनुराधा तिला रुग्णालयात दाखल करते. सखीचे आई-वडील कुठलीही तक्रार करता, गावाकडे परतण्याचा विचार करतात; पण अनुराधा त्यांना थांबवते आणि लढा देण्यासाठी भाग पाडते. समाजाला पाठीशी उभी करते. विद्याचे आणि बॉसचे पुढे काय होते, सादिकची पत्नी काय करते हे प्रत्येकाने पाहावे असे आहे. चित्रपटात अनेक प्रश्नांची उकल होऊन पुढील दिशेत आपले योगदान काय असावे, याविषयीचा संदेश आहे.
अभिनय:
तेजस्विनीपंडित, स्मिता तांबे, मनवा नाईक, सायली सहस्रबुद्धे, आशिष पठाडे, नीलेश दिवेकर यांनी दमदार अभिनय करत महिलांच्या समस्यांमागील विचार मांडले आहेत. स्मिताचा अभिनय अधिक भरीव आहे. मनवाने वृत्तवाहिनीतील महिला रिपोर्टरची घुसमट योग्यरीत्या मांडली आहे.
संवाद:
चित्रपटातीलसंवाद वास्तववादी आहेत, कुठेही नाटकीपणा दिसत नाही.
सार:
महिलांवरवेगवेगळ्या नात्यांत, वेगवेगळ्या स्तरांवर होणारे अन्याय, अत्याचार दिग्दर्शकाने आणि लेखकाने उत्तमरीत्या मांडले. कँडल मार्च या शीर्षकाचा उलगडा मात्र शेवटपर्यंत तसा होत नाही. चित्रपटाच्या शेवटी निघालेल्या कँडल मार्चचे तसे फारसे महत्त्व दाखवलेले नाही. असे असले तरीही संवेदनशील विषय ताकदीने मांडताना, फक्त समाजाची मानसिकता बदलायला हवी एवढा पोकळ आशावाद यामध्ये नाही, तर प्रत्यक्ष काय आणि कोणते बदल व्हावेत याचीही दिशा देण्यात आली आहे.