आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive: बिग बी म्हणतात,\' तरुणांनी राजकारणात येऊच नये, माता-पित्याची सेवा, हेच आद्य कर्तव्य\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - तरुण कमवायला लागला की माता-पित्याची सेवा करणे हे त्याचे कर्तव्य आहे. तीच आपली परंपरा. माता-पित्याने कष्ट करून मुलांना वाढवलेले असते. परंतु वयोवृद्ध माता-पित्याला मुले सांभाळत नाहीत तेव्हा मला मनस्वी दुःख होते... या भावना आहेत "बिग बी' अमिताभ बच्चन यांच्या. ७२ व्या वाढदिवसानिमित्त "दिव्य मराठी'तर्फे शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. तरुणांनी राजकारणात येऊ नये, असेही ते म्हणाले. चित्रपटाचा विषय निघाला म्हणून... बॉलीवूड आज कुठे आहे असे वाटते? : बॉलीवूड या शब्दालाच माझा आक्षेप आहे.
हिंदी चित्रपटसृष्टी आज खूप पुढे गेली आहे आणि संपूर्ण जगात चित्रपटसृष्टीचा डंका वाजत आहे. २०-२५ वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही परदेशात जात असू तेव्हा आमच्याकडे नाचगाणेवाले आले अशा नजरेने पाहिले जात असे. आज हॉलीवूडची मंडळी हीच नाचगाणी डोक्यावर घेत आहेत. जगभरातील चित्रपट महोत्सवाचे आयोजक अनेक महिने आपल्याकडे येतात, चित्रपट पाहतात आणि निवडतात. आम्हालाही परदेशात आता प्रचंड मान-सन्मान मिळतो. हॉलीवूडच्या चित्रपटांनी अनेक देशांतील चित्रपटसृष्टीला टाळे लावणे भाग पाडले असले तरी भारतीय चित्रपटसृष्टी ते संपवू शकणार नाहीत. आपली पाच हजार वर्षांची संस्कृती कोणीही नष्ट करू शकणार नाही. आपल्याकडे मराठीपासून, बांगला, तामिळ, तेलगू भाषेत दर्जेदार संस्कृतिसंपन्न चित्रपट तयार होतात.
हॉलीवूडवाले असे चित्रपट बनवूच शकत नाहीत. मागे एकदा स्टीव्हन स्पीलबर्ग आले होते. मी त्यांची एका कार्यक्रमात मुलाखत घेतली तेव्हा मी त्यांना भारताकडे हॉलीवूडचे लक्ष का, असा प्रश्न केला होता. त्यांनी त्याचे उत्तर गोलगोल दिले. आपल्या अनेक परंपरा आता पाश्चात्त्य देश स्वीकारू लागले आहेत हेच आपले यश आहे. आपला देश १२५ कोटी ग्राहकांचा देश आहे हे पाश्चात्त्य देशांना कळून चुकले आहे.

मागे वळून पाहताना...?
मी मागे वळून कधीच पाहत नाही. मागे जे झाले ते झाले. आता पुढे काय करायचे त्याकडे मी लक्ष देतो. मागे पाहताना मला फक्त बाबूजी आणि आईची आठवण येते आणि त्यांनी घेतलेले कष्ट आठवतात. मी काय केले त्याऐवजी मी आता पुढे काय करेन, याकडे जास्त लक्ष देतो.

तरुणांनी राजकारणात जावे का?
माझे तर स्पष्ट मत आहे की तरुणांनी राजकारणात जाऊ नये.
तुम्ही स्वतःला आजही अँग्री यंग मॅन मानता का?
मी मानणारा कोण? हा किताब मला मीडियानेच दिला आहे. त्यामुळे आता ते जो किताब देतील तो मला मान्य असेल.

... तर आपले अस्तित्व काय?
आपली संस्कृती उच्च आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये मुलगा अठरा वर्षांचा झाला की बाहेर पडतो. आपल्याकडे मुलगा स्थिरस्थावर होईपर्यंत आई-वडील सांभाळतात. त्याच्या कुटुंबालाही सांभाळत असतात. आई-वडील नसते तर आपलेही अस्तित्व काहीच नसले असते. "बागबान' चित्रपटात आम्ही हीच समस्या मांडली. तुम्ही म्हणाल की, चित्रपटाचा समाजावर परिणाम होतो का? नक्कीच होतो. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर दिग्दर्शक रवी चोप्रा यांना लंडनवरून रात्री फोन आला. त्या व्यक्तीने सांगितले, लंडनमध्येच माझे आई-वडील राहातात, परंतु मी त्यांना अनेक महिन्यांपासून भेटलो नाही. मात्र आता त्यांना मी त्यांना लगेच फोन करेन.
देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यांच्या समस्याही खूप आहेत. तुम्ही काय संदेश द्याल?
- आपल्या देशात ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आहेत हे खरे. परंतु त्या फक्त शहरातच आहेत. गावांमध्ये अजूनही आपली परंपरा, संस्कृती जोपासली जाते. तरुण पिढी आई-वडिलांची अजूनही सेवा करते. मी आई-वडिलांचा संघर्ष पाहत होतो तेव्हा मला वाटे की मी कधी एकदा कमावण्यास सुरुवात करतो आणि आई-वडिलांना सुख देतो.

तरुण पिढीबाबत काय वाटते?
- आजचा जमाना फास्ट आहे. आज आत्ता आपण येथे बोलतोय. तुम्ही निघून गेलात की मी लगेच सोशल मीडियावर प्रतिक्रिया लिहू शकतो. आज तंत्रज्ञान बदलले. तुमचेच उदाहरण घ्या, अगोदर तुम्ही फक्त लिहून घेत असत. नंतर टेपरेकॉर्डर, डिक्टाफोन आणि आता तर स्मार्टफोन आले. या स्मार्टफोनमध्ये सगळ्या सोयी आहेत. आजच्या तरुण पिढीकडे आधुनिक तंत्रज्ञान आलेले आहे. त्याचा योग्य आणि चांगला वापर तरुण करत आहेत...

मॅडिसन स्क्वेअरमध्ये नरेंद्र मोदी यांचे भाषण याचाच परिणाम वाटतो?
- हो निश्चितच. १२५ कोटी जनतेचीच ही ताकद आहे. आज आपण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहोत. त्यामुळे जग आपल्याकडे बघत आहे. आपला देश सुपरपॉवर होईल असे मला मनोमन वाटते. मी त्या नजरेनेच आपल्या देशाकडे पाहत आहे.

पाच दिवसांनंतर आराध्याला पाहिले
माझी नात आराध्याबरोबर मी वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो. परंतु कामाच्या व्यापामुळे ते शक्य होत नाही. घरात असूनही आज पाच दिवसांनंतर मी तिला भेटलो.