आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

29 दिवस... 120 किमी.चा भन्नाट प्रवास म्हणजे \'आजोबा\', उर्मिलाची मराठीत एन्ट्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2009मध्ये पुण्यात जुन्नरमध्ये घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारित 'आजोबा' हा सिनेमा येत्या 9 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. या सिनेमाद्वारे बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर मराठी पदार्पण करत आहे.
'आजोबा' ही कथा आहे एका बिबट्याची. कुत्र्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या एका बिबट्याला वनविभागाच्या कर्मचा-यांनी सुखरुप बाहेर काढलं. विद्या अत्रे या वन्यजीव अभ्यासिकेनं या बिबट्याच्या अंगावर एक चीप बसवून जीपीएसच्या साह्याने त्याचा प्रवास टिपण्याचा प्रयत्न केला. त्या चीपवर नाव दिलं गेलं ते म्हणजे 'आजोबा'. पुढे माळशेजच्या घाटात आजोबाला सोडण्यात आलं. पण सह्याद्रीच्या रांगा ओलांडत हा आजोबा निघाला मुंबईच्या दिशेने. माळशेज घाट ते मुंबईतील नॅशनल पार्क हे अंतर बरंच लांब पल्ल्याचं. मात्र या आजोबाने चक्क 29 दिवस 120 किलोमीटरचा हा रोमांचित करणारा धाडसी प्रवास केला. जीपीएस तंत्रज्ञाचा आधार घेत वन्य अभ्यासिकेला बिबट्याचा पाठलाग करताना आलेला थ्रिलींग अनुभव प्रेक्षकांना या चित्रपटात पाहता येणार आहे.
या सिनेमाच्या निमित्ताने उर्मिला मातोंडकर हिने मराठीत दमदार प्रवेश केला आहे. डोंगरद-यातून फिरत, प्रतिकुल हवामानाशी सामना करीत दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर बिबट्यावर संशोधन करणा-या वन्यजीव अभ्यासिकेची व्यक्तिरेखा उर्मिलाने साकारली आहे.
माणसाने आपल्या भौतिक सुखाच्या हव्यासापायी जंगलाची सीमारेषा केव्हाच ओलांडली आहे. त्यामुळे प्राण्यांना देखील स्वतःचं अस्तित्व टिकविण्यासाठी झगडावं लागतंय. याच सामाजिक विषमतेवर 'आजोबा' भाष्य करतो.
या सिनेमाची कथा गौरी बापट यांनी लिहिली आहे. तर साकेत कानेटकर यांनी सिनेमातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. वन्य प्राण्यांवर चित्रीकरण करताना काही ठिकणी मर्यादा येतात. त्याठिकाणी व्हिज्युअल इफेक्ट्सची कमाल पहायला मिळेल. पुण्याच्या इल्युशन इथेरियल या कंपनीने व्हिज्युअल इफेक्ट्सचे काम केले असून आतंरराष्ट्रीय दर्जाचे ग्राफिक्स प्रेक्षकांना यात बघायला मिळतील.
उर्मिला मातोंडकरसह यशपाल शर्मा, ऋषिकेश जोशी, दिलीप प्रभावळकर, श्रीकांत यादव, ओम भुटकर, नेहा महाजन, गणेश मयेकर, शशांक शेंडे, अनिता दाते, चिन्मय केळकर, विराट मुडके, अनुया काळसेकर यांच्या अभिनयाने साकारलेला 'आजोबा' प्रेक्षकांसाठी निश्चितच एक भन्नाट ट्रिट ठरणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा या सिनेमाची एक छोटीशी झलक...