आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिर खानची पोलिसांत तक्रार, प्रतिमा मलिन करण्याचा लावला आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता आमिर खानने अलीकडेच मुंबईत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून काही लोक आपली प्रतिमा मलिन करत असल्याचा आमिरचा आरोप आहे. आमिरने शनिवारी मुंबईचे पोलीस सहआयुक्त सदानंद दाते यांची भेट घेऊन ही तक्रार दाखल केली आहे.
सत्यमेव जयते कार्यक्रमाच्या माध्यमातून मदत करण्यात येणारी 'ह्य़ुमॅनिटी ट्रस्ट' ही संस्था विशिष्ट धर्माशी संबंधित नसून ती एका खेडेगावात सामाजिक काम करते. मात्र काही जण हेतुपुरस्सर या कार्यक्रमाबाबत चुकीचा संदेश पसरवत असल्याबाबत नाराजी व्यक्त करीत आमिरने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. गुन्हे शाखेची सायबर सेल या प्रकरणाचा तपास करणार आहे.
आमिर खानच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील गंभीर विषयावर भाष्य केले जाते. 2 मार्चपासून या कार्यक्रमाचे दुसरे पर्व सुरु झाले. कार्यक्रमाच्या पहिल्या भागात बलात्कार आणि दुस-या भागात पोलिसांची सद्यस्थती मांडली. या कार्यक्रमाच्या शेवटी आमिर 'ह्युमॅनिटी ट्रस्ट'च्या वतीने लोकांना मदतीचे आवाहन करत असतो.
मात्र, 'आमिर खानच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमामागचे सत्य जाणून घ्या.. आमिरच्या या कार्यक्रमामार्फत मदत करण्यात येणारी सेवाभावी संस्था ही एका विशिष्ट धार्मिक गटाला मदत करणारी आहे..' अशा प्रकारचा संदेश गेले काही दिवस व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल नेटवर्किंग साईट्सवर फिरत आहे. अशाप्रकारच्या संदेशामुळे आपली प्रतिमा मलिन होत असल्याचे आमिरचे म्हणणे आहे. अशा संदेशांमुळे त्याला धक्का बसला आहे.