आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरिणीता, द डर्टी पिक्चर, कहानी अशा गाजलेल्या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडणा-या बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या कान्स चित्रपट महोत्सवाच्या ज्युरी सदस्यांत विद्या बालनची निवड करण्यात आली आहे.
कान्स चित्रपट महोत्सवात नऊ ज्युरी सदस्य असणार आहेत. विद्या बालनबरोबर 'लाईफ ऑफ पायचे' दिग्दर्शक अँग ली यांचाही ज्युरी सदस्यांत समावेश झाला आहे. अमेरिकेतील दिग्दर्शक आणि निर्माते स्टीव्हन स्पिलबर्ग हे या ज्युरी मंडळाचे अध्यक्ष आहेत. या ज्युरींमध्ये विद्या बालनसह आणखी तीन महिलांचा समावेश झाला आहे. जपानमधील दिग्दर्शिका नाओमी कवासे, ऑस्ट्रेलियन अभिनेत्री निकोल किडमन, लेखक लॅनी रामसे या तिघीही विद्या बालनबरोबर परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यांच्यासह ऑस्कर विजेते ख्रिस्तोफ वॉल्त्स, फ्रेंच दिग्दर्शक डॅनियल ऑटील आणि रुमानियन दिग्दर्शक क्रश्तियन मुंग्यू हे ज्युरी मेंबर्स आहेत.
येत्या 15 मे पासून कान्स चित्रपट महोत्सवाला सुरुवात होणार असून 26 मे पर्यंत हा महोत्सव चालणार आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. 'बॉम्बे टॉकीज', 'गँग्ज ऑफ वासेपूर', 'मान्सून शुटआऊट' या सिनेमांना यंदाच्या कान्समध्ये स्थान मिळाले आहे.
विद्या बालनपूर्वी शेखर कपूर आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांना हा मान मिळाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.