आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री वीणा मलिकची माजी प्रियकराला धमकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दुबईस्थित उद्योगपतीशी लग्न करून पुन्हा चर्चेत आलेली पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकविरोधात तिच्या माजी प्रियकराने तिच्याविरोधात फसवणुकीची पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. लग्नापूर्वी सुमारे दीड वर्ष लिव्ह इनमध्ये राहिलेल्या वीणाने लग्नानंतर मात्र आपल्याला व कुटुंबीयांना धमकी दिल्याचा आरोप प्रशांतसिंह याने शनिवारी आरे पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत केला आहे. ‘वीणाने गेल्या आठवड्यात उद्योजक असद बशीर खान याच्यासोबत दुबईत जाऊन लग्न केले. मात्र गेल्या दीड वर्षापासून आपल्याशी लिव्ह इन रिलेशनशिप ठेवलेल्या वीणाने याबाबत आपल्याला कोणतीही माहिती दिली नाही. जेव्हा मी याबाबत मीडियाशी बोलू लागलो, तेव्हा वीणाने तुला व तुझ्या कुटुंबीयांना पाहून घेईन अशी फोनवरून धमकी दिली,’ असे प्रशांतसिंह याने तक्रारीत नमूद केले आहे.
प्रशांतच्या कंपनीत वीणा भागीदार असून तिने आपली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचाही त्याचा दावा आहे. पोलिसांनी त्याची तक्रार दाखल करून घेतली असली तरी अद्याप एफआयआर दाखल झालेला नाही. वीणा भारताबाहेर असल्यामुळे तिच्यावर कारवाई शक्य आहे का याचीही पडताळणी पोलिस करत आहेत. पोलिसांनी प्रशांतला कोर्टात जाण्याचा सल्लाही दिला आहे. कोर्टाच्या आदेशानंतरच या प्रकरणात पोलिस कारवाई करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.