मुंबई - ऑल टाइम हिट ‘शोले’ चित्रपटाने 38 वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या मनावर आपले राज्य अबाधित ठेवले आहे. शोलेचा पुढील टप्पा म्हणजे थ्री-डी व्हर्जनमधील हा चित्रपट 3 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे जय-वीरू, गब्बर, ठाकूर, बसंती, कालिया आणि इतर पात्रांची मेजवानी प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे.
शोले चित्रपटाचे निर्माता जी. पी. सिप्पी यांचे नातू साशा सिप्पी म्हणाले, ‘शोले’ हा भारताच्या चित्रपट इतिहासातील महत्त्वाचा टप्पा आहे. शोलेशिवाय चित्रपटसृष्टीचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. हा चित्रपट आजच्या पिढीसमोर आणण्याचे आम्ही ठरवले. सध्या थ्री-डीचा जमाना असल्याने हा ट्रेंड शोलेसाठी वापरात आणला. मूळ चित्रपटातील संवाद कायम ठेवून सर्व बाबी पुन्हा केल्या आहेत. पार्श्वसंगीत, शीर्षक नव्याने तयार केले. कॅमेरामन द्वारका दिवेचा यांनी भव्यतेने चित्रण केले असल्याने थ्री- डी रूपांतरण करताना जास्त त्रास झाला नाही. भारतभरात हजार चित्रपटगृहांत चित्रपट प्रदर्शित करणार असून, 500 प्रिंट थ्री- डी आणि 500 प्रिंट टू-डीमध्ये प्रदर्शित केल्या जातील. शोलेच्या थ्रीडीसाठी 25 कोटींचा खर्च आल्याचे ते म्हणाले. चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचा विक्रम करेल, असे जयंतीलाल गडा म्हणाले.