आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पुणे ५२’ मधून उलगडणार एका गुप्तहेराची कहाणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मराठी चित्रपटसृष्टीमध्ये प्रयोगशीलता, वैविध्य आणि नावीन्यता जपण्याच्या उद्देशाने इंडियन मॅजिक आय मोशन पिक्चर्स आणि अरभाट निर्मिती या संस्थांनी संयुक्तपणे चित्रपट निर्मिती करण्याचे ठरविले असल्याची घोषणा इंडियन मॅजिक आय मोशन पिक्चर्सचे अध्यक्ष श्रीरंग गोडबोले यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. ‘पुणे 52’ या पहिल्या चित्रपटाची देखील घोषणा यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी अरभाट निर्मितीचे संस्थापक उमेश कुलकर्णी व गिरीश कुलकर्णी, इंडियन मॅजिक आय मोशन पिक्चर्सचे संचालक अभय गाडगीळ आणि ह्रषिकेश देशपांडे आदी उपस्थित होते. इंडियन मॅजिक आय मोशन पिक्चर्सचे संचालक अभय गाडगीळ म्हणाले की, या चित्रपटाचे मूल्य २.५ ते ३ कोटी रुपये असेल. इंडियन मॅजिक आय मोशन पिक्चर्स ही इंडियन मॅजिक आय या प्रतिष्ठीत माध्यम संस्थेचाच एक भाग आहे. अरभाट निर्मिती ही संस्था दिग्दर्शक उमेश कुलकर्णी व लेखक-कलाकार गिरीश कुलकर्णी यांनी स्थापन केली आहे. अरभाटच्या माध्यमातून मराठी चित्रपट निर्मितीमध्ये नवनवीन प्रयोग करीत उत्तमोत्तम दर्जाच्या कलाकृती साकारण्याचे त्यांनी ठरविले आहे. चित्रपटाची कथा १९९२ च्या सुमारास पुण्यात कार्यरत असलेल्या एका खासगी गुप्तहेराच्या आयुष्यावर आहे. ऑस्ट्रेलियातील प्रसिध्द सिडनी फिल्म स्कूलचे माजी विद्यार्थी असणारे निखिल महाजन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून गिरिश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, भारती आचरेकर, किरण करमरकर तसेच पाहुणे कलाकार आहेत.
या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे त्याचे पार्श्वसंगीत प्रसिध्द कोरिअन संगीतकार ह्युआन जंग शीन यांचे असेल. ‘ओल्ड बॉय’ या लोकप्रिय चित्रपटाचे संगीतकार म्हणून ह्युआन जंग शीन जगप्रसिध्द आहेत. याखेरीज, छायाचित्रणाची जबाबदारी न्यूझीलंड येथील जेरेमी रिगन यांनी सांभाळलेली आहे. ‘पुणे 52’ चित्रपटाच्या निर्मितीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून त्याचे निर्मितीपश्चात काम चालू झाले आहे. १२ डिसेंबर २०१२ रोजी चित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस आहे, अशी माहिती यावेळी श्रीरंग गोडबोले यांनी दिली.