आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भाग मिल्खा भाग’ने जिंकली फिल्मफेअरची शर्यत, सहा पुरस्कारांची केली लयलूट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राकेश मेहरा यांच्या ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटाने 59 वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा व्यापून टाकला. सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट अभिनयासह या चित्रपटाने सहा विभागांत पुरस्कार पटकावले. दीपिका पदुकोनला ‘गोलियों की रासलीला रामलीला’ चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला. धावपटू मिल्खासिंग यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटातील अभिनयासाठी फरहान अख्तरला गौरवण्यात आले. ‘जिंदा है तो...’ या प्रेरणादायी गीतासाठी प्रसून जोशी, तर सर्वोत्कृष्ट वेशभूषेच्या विभागात डॉली अहलुवालिया यांनी हा सन्मान मिळवला.
या पुरस्कारांसाठी शर्यतीत असलेल्या ‘ये जवानी हैं दीवानी’ला नऊ विभागांत नामांकन होते. मात्र, एकाही विभागात पुरस्कार मिळू शकला नाही. 2013 मध्ये सलग चार सुपरहिट चित्रपट देणा-या दीपिका पदुकोनला संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलियों की रासलीला रामलीला’ चित्रपटातील अस्सल गुजराती तरुणीच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच चित्रपटात दीपिकाच्या आईची भूमिका वठवणा-या सुप्रिया पाठक-कपूर यांना सहअभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
अभिनेत्री तनुजा यांना जीवनगौरव
‘आशिकी-2’ ने संगीतात बाजी मारली
मोहित सुरी यांची ‘आशिकी-2’ ही प्रेमकहाणी संगीत विभागात अव्वल ठरली. अंकित तिवारी-मिथुन आणि जीत गांगुली यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा परस्कार मिळाला. ‘तुम ही हो...’ या नव्या पिढीच्या हृदयावर कोरल्या गेलेल्या गीतासाठी पार्श्वगायक अरजितसिंगला सन्मानित करण्यात आले. महिला गटातील पार्श्वगायनाचा पुरस्कार ‘लुटेरा’तील ‘संवर लू...’ गीतासाठी मोनाली ठाकूरला प्रदान करण्यात आला.
आज प्रक्षेपण : 59 व्या फिल्मफेअर पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रक्षेपण आज 26 जानेवारी रोजी सोनी वाहिनीवर करण्यात येणार आहे.