आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: ११ डिसेंबरला उलगडणार दिलीप कुमार आणि पाकिस्तानी अभिनेत्रीच्या लव्ह स्टोरीचे रहस्य

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - हिंदी चित्रपटसृष्टीचे लिविंग लेजेंड दिलीप कुमार यावर्षी ११ डिसेंबरला आपला ९०वा वाढदिवस साजरा करणार आहेत. दिलीप कुमार यांचे चाहते या दिवसाची आतुरतेने वाट पाहात आहेत. कारण ११ डिसेंबरला दिलीप कुमार यांच्या आत्मकथेचे प्रकाशन होणार आहे. या पुस्तकात पेशावर ते मुंबईपर्यंतचा त्यांचा प्रवास आणि या प्रवासात अभिनेत्रींबरोबर त्यांना आलेले अनुभव त्यांच्याच शब्दात अधोरेखित करण्यात आले आहेत. पाकिस्तानी अभिनेत्री अस्माबरोबरचे नातेही या पुस्तकात उलगडण्यात आले आहे. ज्येष्ठ लेखिका आणि सायरा बानो यांची मैत्रीण उदयतारा नायर यांच्या मदतीने दिलीप कुमार यांच्या आत्मकथेला अंतिम स्वरुप देण्यात येत आहे.
आत्तापर्यंत तीन पुस्तके प्रकाशित
आत्तापर्यंत विनीता लांबा, संजीत नावरेकर आणि लॉर्ड मेघनाद देसाई या लेखकांनी दिलीप कुमार यांच्या आयुष्यावर पुस्तके प्रकाशित केली आहेत. मात्र ११ डिसेंबरला प्रकाशित होणारी ही संपूर्ण आत्मकथा असणार आहे. २०१३ साली हिंदी चित्रपटसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण होत असताना दिलीप कुमार यांच्या फिल्मी करिअरला ६८ वर्षे पूर्ण होणार आहेत. जवळजवळ ६०० पानांची ही आत्मकथा इंग्रजीत कॉफी टेबलबुकप्रमाणे असणार आहे. या पुस्कात दिलीप कुमार आणि त्यांच्या कुटुंबियांची एक्सक्लुझिव्ह छायाचित्रे प्रकाशित करण्यात येणार आहेत. हिंदी आणि उर्दूमध्येही हे पुस्तक वाचकांसाठी कमी किंमतीत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
यासाठी दिला होकार...
आत्मकथा प्रकाशित करण्यासाठी सुरुवातीला दिलीप कुमार तयार नव्हते. त्यांच्या मते, लोक आवडीने आणि उत्सुकतेने वाचतील असे त्यांच्या आयुष्यात काहीही घडले नाही. मात्र एका दिवंगत लेखकाच्या पुस्तकात स्वतःबद्दल चुकीची माहिती प्रकाशित झाल्याचे कळल्यानंतर ते खूप नाराज झाले. पत्नी सायरा बानो आणि काही जवळच्या मित्रांनी त्यांना याबद्दल माहिती दिली. इतिहासात चुकीची नोंद होऊ नये, म्हणून स्वतःच्या आत्मकथेवर काम करा, असा सल्ला पत्नी सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांना दिला. तीन वर्षांपूर्वी लेखिका उदयतारा यांनी दिलीप कुमार यांना आत्मकथा लिहिण्यासाठी विनंतीही केली होती. पत्नी सायरा बानो आणि लेखिका उदयतारा यांनी समजूत घातल्यानंतर दिलीप कुमार आत्मकथा लिहिण्यासाठी तयार झाले.
दोन भागात होणार पुस्तक प्रकाशित
आत्मकथा दोन भागांमध्ये प्रकाशित होणार आहे. आत्मकथेच्या पहिल्या भागात पेशावरपासून (आता पाकिस्तानात आहे) सुरु झालेली युसूफ खान उर्फ दिलीप कुमार यांची फिल्मी प्रवासाची कहाणी त्यांच्याच शब्दात आहे. तर दुस-या भागात अमिताभ बच्चन, सलीम खान, रमेश सिप्पी, यश चोप्रा, सुभाष घई, सायरा बानो आणि वैजयंती माला यांच्याबद्दलच्या अनुभवांबद्दल सांगण्यात आले आहे. या पुस्तकात दिलीप कुमार यांच्या लव्ह लाईफ आणि वादाचाही उल्लेख आहे का, असे उदयतारा यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, या पुस्तकात कामिनी कौशल, वहिदा रहमान, मधुबाला या अभिनेत्रींबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. सायरा बानो यांच्याबरोबर लग्नापूर्वी दिर्घकाळ सुरु असलेल्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितले आहे. पाकिस्तानी तरुणी अस्माबरोबरच्या नात्याविषयीसुद्धा लिहिण्यात आले आहे का, असे विचारल्यावर उदयतारा यांनी सांगितले की, आत्मकथेत अस्माबद्दल दिलीप कुमार काही बोलले नाही, मात्र सायराने तिच्याबद्दलचे अनुभव सांगितले आहे. अस्माबरोबर घालवलेला काळ दिलीप साहेबांसाठी सगळ्यात जास्त कष्ठदायक होता. अस्मा आणि दिलीप कुमार यांची पहिली भेट सुभाष घई यांच्या 'विधाता' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. आग्रामध्ये शुटिंगदरम्यान या दोघांच्या भेटी कशा वाढू लागल्या आणि ते कसे एकमेकांच्या प्रेमात पडले हे घई यांनी पुस्तकात सांगितले आहे.
आत्मकथेबरोबर डॉक्यूमेंट्रीसुद्धा होणार रिलीज
आत्मकथेबरोबर दिलीप कुमार यांच्या आयुष्यावर आधारित एक डॉक्यूमेंट्रीसुद्धा रिलीज होणार आहे. त्यांच्या बंगल्यात लावण्यात आलेल्या एका कॅमे-यात ही डॉक्युमेंट्री रेकॉर्ड होत आहे. या डॉक्यूमेंट्रीमध्ये दिलीप कुमार यांनी दिवंगत अशोक कुमार यांच्या घेतेलेल्या मुलाखतीलाही स्थान देण्यात आले आहे. या डॉक्युमेंट्रीची डीव्हीडी कमी किंमतीत त्यांच्या चाहत्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.