आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलविदा: तीन पिढ्यांचा प्राण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुनील दत्त व नूतन यांचा ‘खानदान’ 1965 मध्ये पडद्यावर आला होता. या ‘खानदान’च्या आधी ‘खानदान’ या नावाचे दोन चित्रपट पडद्यावर आले होते. या दोन ‘खानदान’पैकी 1942चा ‘खानदान’ हा प्राणचा चित्रपट. या चित्रपटात ते नायक होते व 1965 च्या ‘खानदान’मध्ये खलनायक. प्राण यांच्या चित्रपटांचा विचार करताना एकाच नावाने दोनदोनदा निर्माण झालेले अजून काही चित्रपट आठवतात. एक चित्रपट 1956 चा आनबान. अजितने यात नलिनी जयवंतबरोबर नायकाची भूमिका केली होती. प्राण या चित्रपटात दोघांसमोर खलनायक म्हणून उभे होते. त्यानंतर 1972ला आनबान नावाचा आणखी एक चित्रपट आला, यात राजेंद्रकुमार व राखी यांच्यासमोर प्राण यांनी एक चरित्र भूमिका केली होती.


1955ला शेखर आणि नलिनी जयवंत यांची भूमिका असलेला एक चित्रपट आला होता चिंगारी. 1989ला याच नावाचा आणखी एक चित्रपट आला होता. यामुळे शेखर व नलिनी जयवंत यांच्या जमान्याला मागे टाकून 1989च्या चिंगारीमध्ये संजय खान व लीना चंदावरकर यांच्याबरोबरही प्राण यांनी भूमिका केली होती.


1958ला एक चित्रपट आला होता राजतिलक. वैजयंतीमाला, पद्मिनी व जैमिनी गणेशन यांची या चित्रपटात भूमिका होती. त्यांच्यासोबत प्राण या चित्रपटात होते. त्यानंतर धर्मेंद्र, हेमामालिनी, रीना रॉय यांच्याबरोबर 1984 च्या राजतिलकमध्ये ते होते.


प्राण यांनी दोनदोन चित्रपटांत त्यांनी केलेल्या एकाच भूमिकेच्या काही आठवणी अशाच स्मरणीय आहेत. 1942ला खानदान हा प्राण याचा चित्रपट आला. तो लाहोरला निर्माण झाला होता. फाळणीनंतर प्राण 1948 साली भारतात आले. आल्याआल्याच गृहस्थी या चित्रपटात त्यांना भूमिका मिळाली आणि गृहस्थीबरोबरच बरसात की एक रात, विरहन, चुनरिया, जिद्दी हे त्यांचे चित्रपट आले. या चित्रपटांपैकी बरसात की एक रात, बिरहन हे त्यांचे चित्रपट फाळणीच्या आधी पाकिस्तानात निर्माण झाले होते. आणि पाकिस्तानी चित्रपट हिंदुस्थानात येऊन येथे प्रदर्शित झाले होते. या चित्रपटांत ते नायक होते. पण लाहोरहून मुंबईला आल्यानंतर मुंबईतील चित्रपटांनी मात्र लाहोरच्या चित्रपटांतील नायकाचा चेहरा एकदम पुसून टाकला. आणि त्यांना खलनायकाचा चेहरा दिला.


1948च्या ‘जिद्दी’, ‘गृहस्थी’ व ‘चुरनिया’ या तीन चित्रपटांतून मुंबईच्या चित्रपटांतील त्यांच्या खलनायकाची वाटचाल सुरू झाली. 1948चा ‘गृहस्थी’ हा चित्रपट 1963 साली ‘घर बसा के देखो’ या नावाने नव्याने निर्माण झाला तेव्हा तिवारी, बी. एम. व्यास, मदनपुरी, अन्वर हुसेन, सिद्धू यांसारखे काही खलनायक आपल्या चित्रपटात उदयाला आले असले तरी या चित्रपटाचे दिग्दर्शक किशोर साहू यांच्या डोळ्यांसमोर या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी यापैकी एकाही खलनायकाचा चेहरा आला नाही. 1948 च्या ‘गृहस्थी’मधील प्राण यांच्या खलनायकाचा चेहराच त्यांच्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा आला आणि या भूमिकेत 1962च्या ‘घर बसा के देखो’मध्ये त्यांनी त्यांना पुन्हा रिपीट केले. त्यांचे हे रिपिटेशन म्हणजे त्यांच्या एका गाजलेल्या भूमिकेचा त्यांनी दिलेली आणखी एक रिटेक होता.


‘मालकीन’मधील खलनायक
प्राण यांनी आपल्या एका गाजलेल्या भूमिकेचा असाच आणखी एक रिटेक दिला. 1951ला त्यांचा एक चित्रपट आला होता. ‘मालकीन’. त्या काळातला आपल्या चित्रपटातला एक हास्यअभिनेता गोप या चित्रपटाचा निर्माता होता. 1949च्या ‘पतंगा’ या चित्रपटानंतर त्याची व याकूबची जोडी आपल्या चित्रपटातील एक विनोदी जोडी म्हणून चांगलीच लोकप्रिय ठरली होती. आपल्या या जोडीची लोकप्रियता कॅश करण्यासाठी गोपने आपल्याबरोबर याकूबलाच घेऊन हा चित्रपट निर्माण केला होता आणि त्या दोघांबरोबर प्राण यांनी या चित्रपटात खलनायक रंगविला होता. त्या काळात हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय ठरला होता. गोपचे बंधू राम कमलानी यांनी 1966 साली हा चित्रपट ‘बिरादरी’ या नावाने नव्यानेच निर्माण केला. गोप व याकूब हे दोघेही तेव्हा आपल्यात राहिलेले नव्हते. यामुळे ‘मालकीन’मधील त्यांची जागा ‘बिरादरी’त मेहमद व कन्हैयालाल यांनी घेतली होती. पण प्राण यांच्या खलनायकाची जागा घेणारा अन्य कोणीही कलावंत तेव्हाही आपल्या चित्रपटात नव्हताच. यामुळे ‘मालकीन’मधील दुर्गा खोटे, सज्जन, नुतन यांची जागा ‘बिरादरी’त ललिता पवार, शशी कपूर, फरियाल यांनी घेतली असली तरी प्राण यांची जागा मात्र कोणाला घेता आली नव्हती. ‘मालकीन’मधील आपल्या भूमिकेचा आणखी एक रिटेल त्यांनी ‘बिरादरी’त दिला होता.


कपूरांसोबतचा अभिनय
1947ला कपूर घराण्यातील दुस-या पिढीची वाटचाल राज कपूरबरोबर आपल्या चित्रपटात सुरू झाली. या वाटचालीत राज कपूरपाठोपाठ शम्मी कपूर व शशी कपूर हे कपूर घराण्यातील आणखी दोन कलाकार चित्रपटांत उदयाला आले. प्राणनी कपूर घराण्यातील या दुस-या पिढीचा जमानादेखील पाहिला आणि या पिढीबरोबर काही चित्रपटात भूमिकादेखील केल्या. राज कपूरबरोबर ते ‘आह’, ‘जिस देश में गंगा बहती है’, ‘चोरीचोरी’ यासारख्या काही चित्रपटात चमकले. ‘बॉबी’त त्याच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी भूमिका केली. शम्मी कपूर यांच्या ‘अ‍ॅन इव्हिनिंग इन पॅरिस’, ‘ब्रह्मचारी’ यासारख्या अनेक चित्रपटांत प्राण यांनी खलनायक रंगविला होता. ‘तुमसा नाही देखा’त शम्मी कपूरबरोबरची प्राण यांची खलनायकगिरी ख-या अर्थाने सुरू झाली. नासीर हुसेन या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. या चित्रपटाची कथा त्यांनी त्यानंतर ‘जब प्यार किसीसे होता है’, ‘फिर वही दिल लाया हूँ’ या चित्रपटात रिपीट केली. ती रिपीट करताना ‘तुमसा नहीं देखा’तला शम्मी कपूरचा नायक या दोन्ही चित्रपटांत त्यांनी बदलला होता. ‘तुमसा नही देखा’तल्या शम्मी कपूरच्या नायकाची जागा ‘जब प्यार किसीसे होता है’मये देव आनंदने घेतली होती, तर ‘फिर वही दिल लाया हूँ’त जॉय मुखर्जीने. पण नायक बदलताना ‘तुमसा नहीं देखा’तला प्राण यांचा खलनायक काही नासीर हुसेननी या दोन्ही चित्रपटात बदलला नव्हता. ‘तुमसा नही देखा’मधील शम्मी कपूरबरोबरचा आपला खलनायक प्राण यांनी ‘जब प्यार किसीसे होता है’मध्ये देव आनंद व ‘फिर वही दिल लाया हूँ’मध्ये जॉय मुखर्जीबरोबर जसाच्या तसा साकार केला.


माय- लेकी, पिता-पुत्रांसोबत अभिनय
तीन पिढ्यांतील कपूरांबरोबर भूमिका करीत असताना चित्रपट व्यवसायातील काही घराण्यांच्या दोन-दोन पिढ्याही त्यांनी पाहिल्या आणि या दोन पिढ्यांबरोबर भूमिकाही केल्या. प्राण यांच्याबरोबर भूमिका करणा-या दोन पिढ्यांतील कलावंतांचा विचार करत असताना हमखास आठवते ती चित्रपट व्यवसायातील मायलेकीची एक जोडी, नसीम व सायराबानोची. मेहमूदचे वडील मुमताजअली यांच्याबरोबर त्यांनी काम केले. सुनील- संजय दत्त, धर्मेंद्र-
सनदी देओल या पिता-पुत्रांसोबत अनेक चित्रपटांत प्राण यांनी केलेल्या भूमिका गाजल्या.