आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘राजा हिंदुस्तानी’ आणि ‘धडकन’सारखे सुपरहिट चित्रपट देणार्या धर्मेश दर्शन यांच्याकडे ‘धडकन-2’चे दिग्दर्शन करण्याचा प्रस्ताव आला होता. मात्र, नफ्यात भागीदारी देण्याच्या मागणीवरून निर्मात्यांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. हा सिक्वेल नवीन कलावंतांना घेऊन मर्यादित बजेटमध्ये बनवावा, असे निर्माते जैन बंधूंना वाटत आहे. मात्र, आपल्या सध्याच्या स्टेटसबाबत भ्रमात असणारे धर्मेश यांनी बजेट, मानधन आणि नफ्याबाबत अव्यावहारिक अटी ठेवल्या.
दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांना आठ वर्षांनंतर दुसर्यांदा रुपेरी पडद्यावर आपले नशीब आजमवण्याची संधी मिळणार होती. मात्र, आजदेखील सिनेमाच्या 15 वर्षांपूर्वीच्या काळात जगत असल्याप्रमाणे धर्मेश यांच्या एका चुकीने या संधीवर पाणी फेरले. व्हिनस फिल्म्सचे जैन बंधू गणेश, चंपक आणि रतन जैन 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट ‘धडकन’चा सिक्वेल बनवण्याची तयारी करत होते. नवीन अभिनेत्यासोबत तयार करत असलेल्या ‘धडकन-2’ची पटकथा तयार झाली आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत याचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता होती. मात्र, त्यापूर्वीच धर्मेश यांनी जैन बंधूंकडे केलेली विचित्र मागणी त्यांचे आजपर्यंतचे करिअर पाहता योग्य वाटत नाही. त्यांनी जैन बंधूंकडे दिग्दर्शनाच्या मानधनासोबतच चित्रपटाच्या नफ्यामध्ये 35 टक्के भागीदारी मागितली होती.
धर्मेश यांची ही मागणी पूर्ण करण्यास निर्मात्यांनी असर्मथता दर्शवत हवेत न राहता जमिनीवर राहण्याचा सल्ला दिला. कारण ते पहिल्यासारखे दिग्दर्शक राहिले नाहीत. धर्मेश यांनी आतापर्यंतच्या आपल्या करिअरमध्ये एकूण सात चित्रपट बनवले. त्यामध्ये ‘राजा हिंदुस्तानी’ आणि ‘धडकन’ यांनी अनेक विक्रम मोडत यश मिळवले होते. उर्वरित पाच चित्रपट (लुटेरे, मेला, हां मैने भी प्यार किया है, बेवफा आणि आप की खातीर) फ्लॉप ठरले. 2006 नंतर त्यांनी निर्माता-दिग्दर्शक म्हणून एक हिंदी चित्रपटही सुरू केला होता, पण तो अपूर्णच राहिला. त्यानंतर त्यांनी पंजाबी चित्रपटाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बजेटच्या अडचणींमुळे हा चित्रपट शूटिंग सुरू होण्यापूर्वीच डबाबंद झाला.
‘राजा हिंदुस्तानी’च्या यशस्वी निर्मितीनंतर धर्मेश खूपच महाग दिग्दर्शक म्हणून ओळखले जाऊ लागले होते. शिवाय निर्मातेदेखील त्यांच्याच इशार्यावर चालू लागले. याच धरतीवर दर्शन सांगतात की,‘धडकन- 2’देखील यशस्वितेचे सर्व रेकॉर्ड मोडेल. मात्र, चित्रपट व्यवसायाशी सातत्याने संबंध असलेल्या व्हिनसच्या जैन बंधूंचा अंदाज होता की, नवीन कलाकारांमुळे हा चित्रपट सरासरी यश मिळवू शकतो. त्यामुळेच कमी बजेटवर चित्रपटाची निर्मिती करण्याचा त्यांचा विचार आहे. याबाबत दीर्घकाळ चर्चाही झाली. मात्र, यातून काहीच साध्य झाले नाही. सूत्रांच्या मते, आता जैन बंधूंनी दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांची या चित्रपटातून हकालपट्टी करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे सध्या नवीन अभिनेत्यांसोबत नवीन दिग्दर्शकाचादेखील शोध घेणे सुरू आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.