मुंबई - 70-80 च्या दशकात फारूख शेख यांच्या चित्रपटांनी आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. 25 मार्च 1948 रोजी गुजरातमध्ये जन्मलेल्या फारूख यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. याच काळात त्यांनी रंगभूमीवर अभिनयाला सुरुवात केली. इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक नाटकांमध्ये भूमिका केल्या. त्यांच्या याच अभिनयाच्या बळावर त्यांना ‘गर्म हवा’ हा पहिला हिंदी चित्रपट मिळाला. आपल्या पहिल्याच चित्रपटात त्यांना बलराज साहनी यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. साहनींच्या स्वाभाविक अभिनयाचा फारूख शेख यांच्यावर कायमस्वरूपी प्रभाव पडला. नंतरच्या काळात ‘शतरंज के खिलाडी’, ‘गमन’, ‘उमराव जान’, ‘चश्मेबद्दूर’, ‘लोरी’, ‘बाजार’ अशा अनेक महत्त्वपूर्ण चित्रपटांत त्यांनी अभिनय केला. नैसर्गिक सहजसुंदर अभिनय हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या भाषेला असलेली खास उर्दू ढंगाची अदब यामुळे त्यांची संवादफेक कमालीची परिणामकारक असायची.
रणबीर कपूरसोबत काम
अलीकडेच त्यांनी रणबीर कपूरच्या ‘ये जवानी है दीवानी’ आणि ‘क्लब 60’ या चित्रपटात त्यांनी काम केले होते. शेख यांनी दूरदर्शनवरही अनेक मालिकांमध्ये काम केले. ‘जी प्रधानमंत्री जी’ ही त्यांची मालिका अतिशय लोकप्रिय होती. ‘जीना इसी का नाम है’ हा शो त्यांच्या सहजसुंदर सूत्रसंचालनाने प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता.
‘क्लब 60’ मध्ये वयोमानानुसार भूमिका
अभिनेता वयानुसार जसा समृद्ध होत जातो तसे त्याच्या भूमिकेचे साचेदेखील बदलत जातात. शिवाय या भूमिका नेहमीच्या स्टारडमच्या परिघाबाहेरच्या असल्या तर त्या शेवटपर्यंत आपल्या सर्जनशील दृष्टिकोनातून साकारण्याचे कौशल्य असणारा कलाकारही दुर्मिळच. आपल्या उभ्या हयातीत हे कौशल्य साधणारे फारूख शेख यांचा कारकीर्दीतला शेवटचा चित्रपट म्हणजे ‘क्लब 60’. वय आणि अनुभवानुसार परिपक्व होत गेलेला फारूख शेख यांच्या ‘क्लब 60’ या चित्रपटातील नितांत सुंदर अभिनय चित्रपट संपला तरी मनात तसाच रेंगाळत राहतो हे शेख याचं फार मोठे यश आहे. तरुण मुलगा गमावलेला बाप ज्या ज्या मनोवस्थांमधून जातो, आपल्या पत्नीबरोबर एक अत्यंत दु:खी-रिकामपणाचं आयुष्य कसंबसं रेटू पाहतो ही अवस्था साकारताना मनात सुख-हास्याविषयीचा असलेला उपहास फारूख शेख ज्या ताकदीने उभा करतात त्याला खरंच तोड नाही. सारिका हसन त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत या चित्रपटात होत्या.
वर्षअखेरीस प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात या दांपत्याचा सोसायटीतील साठी उलटलेल्या नागरिकांच्या क्लबला नावे ठेवण्यापासून त्यांच्यामध्ये सहभागी होऊन त्यांची सुखदु:खं जाणून स्वत:च्या दु:खाची तीव्रता कमी करण्यापर्यंतचा प्रवास जितका मनाचा ठाव घेतो तितक्याच तीव्रतेने फारूख यांचा चित्रपटातील वावर, त्यांच्या डोळ्यांतून व्यक्त होणारा एकटेपणा, हताशपणा व तरीदेखील सावरण्यासाठी होणारी मनाची धडपड लक्षात राहते. रघुवीर यादव, सतीश शहा, टिनू आनंद यांसारखे कलाकार या चित्रपटात असले तरी फारूख यांचे एक स्वतंत्र अस्तित्व त्यांच्या भूमिकेतून जाणवत राहते. संजय त्रिपाठींचा हा दिग्दर्शनातील पदार्पणाचा चित्रपट होता. या चित्रपटाच्या जमेच्या बाजंूचा विचार करताना फारूख शेख हे स्वत: एक महत्त्वाची जमेची बाजू आहे हे नाकारता येणार नाही.