आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दमदार 'अर्धसत्य'चा दुसरा भाग येतोय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पोलिस, राजकारणी आणि माफियांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या एका कर्तव्यदक्ष पोलिस अधिकार्‍याची कशी ससेहोलपट होते याचे वास्तव दर्शन घडवणार्‍या 'अर्धसत्य' या चित्रपटाने 1983 मध्ये चांगलीच खळबळ माजवली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक गोविंद निहलानी आता या चित्रपटाचा दुसरा भाग 'अर्धसत्य 2' घेऊन येत आहेत. निहलानी यांनी सांगितले की, ही कल्पना बर्‍याच वर्षांपासून मनात घोळत होती. शेवटी निर्माते मनमोहन शेट्टी यांनी यात खरोखर रस दाखवल्यामुळे 'अर्धसत्य'चा दुसरा भाग तयार करण्याचा आम्ही घेतला.

कलात्मक व समांतर सिनेमा चळवळीच्या दुसर्‍या पिढीतील 'अर्धसत्य' या सिनेमाला तेव्हा समीक्षकांच्या कौतुकासह व्यावसायिक यशही मिळाले होते. ओम पुरी, अमरीश पुरी, स्मिता पाटील, नसिरुद्दीन शाह, सदाशिव अमरापूरकर, शफी इनामदार यांच्या त्यात मुख्य भूमिका होत्या. विवेकबुद्धीने काम करू इच्छिणार्‍या पोलिस अधिकार्‍याची मुख्य भूमिका ओम पुरी यांनी रंगवली होती.

'अर्धसत्य 2' च्या कथेबाबत गोविंद निहलानी यांनी सांगितले की, पहिल्या 'अर्धसत्य'ची कथा जेथे थांबते तेथून पुढे सिक्वलमधील कथा सुरू होईल. माफिया रामा शेट्टीचा खून करून अनंत वेलणकर (ओम पुरी) हा पोलिस अधिकारी तुरुंगात जातो असा पहिल्या चित्रपटाचा शेवट होता. आता शिक्षा भोगून म्हातारा झालेला हा पोलिस अधिकारी तुरुंगाबाहेर आल्यानंतर काय होते हे 'अर्धसत्य 2' मधून मांडण्यात येईल, असेही निहलानी म्हणाले. पोलिस दलाच्या कार्यपद्धतीवर बेतलेला भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सिनेमाच्या इतिहासातील मैलाचा दगड म्हणून 'अर्धसत्य' ओळखला जातो. या चित्रपटाला त्या वेळी अनेक पुरस्कारही मिळाले होते. 'अर्धसत्य 2' च्या पटकथेवर सध्या काम सुरू असून या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीस शूटिंग सुरू होईल, असे निहलानी यांनी सांगितले.

'पोलिस' या विषयाभोवती फिरणारे 'दबंग' व 'सिंघम' या चित्रपटांनी चांगला व्यवसाय केल्यामुळे 'अर्धसत्य 2'ला या वातावरणाचा फायदा होईल का, असे विचारले असता निहलानी म्हणाले की, आम्हाला कशाचाही फायदा करून घ्यायचा नाही. 'अर्धसत्य'चा दुसरा भाग तयार करण्याचे बर्‍याच दिवसांपासून मनात होते आणि 'अर्धसत्य 2' हा समकालीन विषयावरील चित्रपट कुठल्याही दक्षिणेकडील चित्रपटाचा रिमेक नाही तर आमची ही स्वतंत्र कथा आहे, असेही निहलानी यांनी स्पष्ट केले.

चक्रव्यूह में घुसने से पहले..

डी. ए. पानवलकर यांच्या 'सूर्य या कथेवर आधारित 'अर्धसत्य'ची पटकथा विजय तेंडुलकरांनी लिहिली आणि दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची 'चक्रव्यूह में घुसने से पहले' ही कविता यात थीम म्हणून वापरण्यात आली होती. या कवितेची शेवटची ओळ अशी होती- 'एक पलड़े में नपुंसकता, एक पलड़े में पौरुष और ठीक तराजू के काँटे पर अर्ध सत्य'.
गझनीनंतर आमीर काढणार ‘७ ओम अरिवू’चा हिंदी रिमेक
ओम पुरी पहिल्या पत्नीकडं जाताच दुसरीची पोलिसात धाव