बॉलिवूडचा सदाबहार अभिनेता अनिल कूपर आज (24 डिसेंबर) आपला 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. 24 डिसेंबर 1959 रोजी मुंबईतील टिळकनगरस्थित चाळीत पंजाबी कुटुंबात अनिलचा जन्म झाला होता. अनिलचे वडील प्रसिद्ध निर्माते सुरेंद्र कुमार असून त्याच्या आईचे नाव निर्मला आहे. अनिलचे शिक्षण मुंबईतील सेंट झेवियर कॉलेजमध्ये झाले. त्याचे मोठे भाऊ बोनी कपूर असून ते बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते आहेच. तर धाकटा भाऊ संजय कपूरसुद्धा एक अभिनेता आहे.
अनिलचे लग्न 1984 मध्ये सुनीता कपूरसोबत झाले. त्यांना तीन मुले आहेत. थोरली मुलगी सोनम कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तर दुसरी मुलगी रेहा कपूरने न्युयॉर्कमधून शिक्षण घेतल्यानंतर फिल्म प्रॉडक्शनचे काम सुरु केले. अनिलच्या मुलाचे नाव हर्ष आहे.
अनिलने आपल्या दमदार अभिनयाने अनेक पुरस्कार आपल्या नावी केले. दोनदा राष्ट्रीय पुरस्काराचा तो मानकरी ठरला. 2001मध्ये पुकार आणि 2008मध्ये गांधी माय फादर या सिनेमातील भूमिकांसाठी त्याला स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळाला.
याशिवाय तब्बल पाच वेळा फिल्मफेअर पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले.
1985 मध्ये फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता पुरस्कार (मशाल),
1989 मध्ये फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार (तेजाब),
1993 मध्ये फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार (बेटा),
1998 मध्ये फिल्मफेअर क्रिटिक्स सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार (विरासत),
2000 मध्ये फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता पुरस्कार (ताल)
अनिल कपूरच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला दाखवत आहोत त्याची काही खास छायाचित्रे. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा अनिलचा चित्रमयरुपी प्रवास...