आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘लव्ह इन बॉम्बे’ हा चित्रपट 42 वर्षांनंतर आलाय प्रक्षेकांच्या भेटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 42 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला ‘लव्ह इन बॉम्बे’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. चित्रपटसृष्टीच्या 100 वर्षांच्या इतिहासात असे प्रथमच घडले असून हा एक विक्रम आहे. सत्तरच्या दशकातील स्टार जॉय मुखर्जी यांचा हा चित्रपट त्यांच्या निधनानंतर एका वर्षाने त्यांच्या मुलांनी प्रदर्शित केला. 1971 मध्ये बनलेल्या या चित्रपटाच्या विलंबाची कथा खूप रोचक आहे.

वाटरलूसारखा चित्रपट : मुखर्जी यांना हा चित्रपट 1970 मध्ये प्रदर्शित झालेल्या वाटरलू या सुपरहिट चित्रपटाच्या तोडीचा वाटत होता, असे जॉय मुखर्जी यांच्या पत्नी नीलम यांनी सांगितले. याच्या निर्मितीसाठी त्यांनी संपूर्ण संपत्ती पणाला लावली. कर्जदारांनी त्यांच्यावर तक्रारी दाखल केल्या. पण ते जिवंत असताना हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.

रुपेरी पड्यावरच करायचा होता प्रदर्शित : मंजोय मुखर्जी यांनी सांगितले की, 80 ते 90 च्या दशकात त्यांनी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी प्रयत्न केले, पण अपयश आले. 2000 मध्ये जेव्हा सॅटेलाइट प्रीमियर संकल्पना उदयास आली तेव्हा मी प्रदर्शनाविषयी बोललो, पण त्यांनी नकार दिला. त्यांना हा चित्रपट मोठय़ा पडद्यावरच प्रदर्शित करायचा होता.

प्रिंटबद्दल सांगितले नाही?
चित्रपटाची प्रिंट कोठे ठेवली आहे हे त्यांनी शेवटपर्यंत कोणालाच सांगितले नाही. वडिलांच्या निधनानंतर मंजोय यांनी जेव्हा व्यवहाराची धुरा सांभाळली तेव्हा कागदपत्रात एका कोल्ड स्टोरेज माहिती मिळाली. तेथे या चित्रपटाचीच प्रिंट असल्याचे सांगण्यात आले. जॉय या ठिकाणी वर्षातून एकदा येत व स्वत:समोर प्रिंट्सची स्वच्छता करून घ्यायचे.

10 महिन्यांच्या कष्टानंतर प्रदर्शन : मंजोय मुखर्जी यांनी सांगितले की, एव्हिटेल या स्टुडिओमध्ये चित्रपटाचे निगेटिव्ह साफ केल्यानंतर 30 टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचे आढळले. प्रिंटची सफाई सात महिन्यांपर्यंत चालली. आवाजाचा दोष दुरुस्त करण्यासाठी तीन महिने लागले व चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला. 42 वर्षे जुना चित्रपट विकत घेण्यास कोणी पुढे येत नव्हते. केवळ एचएमव्ही सारेगामाने संगीत प्रदर्शनाची तयारी दर्शवली. पीव्हीआरच्या मदतीने चित्रपट प्रदर्शित होऊ शकला.